श्री तुकाराम दादा पाटील

0 ☆ विविधा ☆ आठवणींच्या साठवणी…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

आयुष्याचा सारीपाट मांडून आपल्याला खेळवणारी नियती काही मजेचे, काही कठीण, खडतर,खेळ मांडून सारखी खेळवत असते. जोजवत  असते, वाढवत असते, घडवत असते. अचानकपणे ती बदलून जाते. चकीत करते. गुपचुपपणे लुटायला एकांतातील अत्यानंद देते. खूप मजा वाटते तो लुटताना. लोकाना वरून काहीच कळत नाही. पण भोगणा-याच्या काळजात लुटलेला व भोगलेला आनंद मावता मावत नाही. ही दिशाभुलीची मजा दिर्घकाळ टिकणारा आठवणींचा नयनमनोहर तलावच बनून जाते. मग त्या तळ्याकाठी वाढलेल्या गर्दसावलीच्या डेरेदार झाडाखाली किती काळ कसा फुलपाखरा सारखा निघून व हरवून जातो तेच कळत नाही. प्रतेक आठवण एक नवासरंजाम घेवून येते. आकंठ आनंदात न्हाऊ घालते. उनपावसातल्या श्रावण धारांचा लपाछपीचा खेळ मांडून आपल्यातच गुंतवून ठेवते. म्हणूनच आठवण कायमची आठवणीत रहाते. कधी बगल देवून निघून गेली तर परतून लगट करायला हटकून येते. अशा आठवणींचा तजेलदारपणा‌ कधीच शेळपटत नाही. ती आठवण आठवणारालाही कायम आपलेसे करून टाकते.

अशा आठवणींच्या साठवणीनाच जीवनाचे चैतन्यमय न संपणारे कोठार समजायला काय हरकत आहे.

हे कोठर कुलूप लाउन कधीच बंद करून ठेवता येत नाही. हवे तेव्हा खाडकन उघडून हव्या त्या आठवणींची मजा मनसोक्त लुटता येते. किंवा तिच्यातील कटूता आठवून एकलेपणातील आक्रोश मांडून आपल्याच अश्रूं सोबत वाहून ही जाता येते. वास्तवाशी सांगड घालून एखादी नवीन समस्या सहजतेने सोडवता येते. हेच आठवणींचे खरे सामर्थ्य आहे. म्हणूनच आठवणींचे मोल सर्वाधिक आहे. त्या आपल्या सोबत कायम असतात. कधीच हरवत नाहीत. सढळ हातानी वापरून सरतही नाहीत. त्याचा साठा कायम वाढतच जातो.

आठवणींचा समृद्ध साठा ज्यांच्याकडे आहे तो जगातील खराखुरा सर्वात गर्मश्रीमंत असे मी समजतो. तुमचे या बाबतचे मत काय? हे विचारण्याचा आगवूपणा मी नक्कीच करणार नाही. किंवा तुमची एखादी खाजगीतली आठवण सांगा असा. आग्रह ही धरणार नाही.पण तुमच्या आठवपाखराना  मनाच्या कैदखान्यात नका ठेऊ डांबून. त्यांना  मुक्तता द्या, मुक्तपणे वावरायला, संचार करायला. कारण त्याच तुमच खरं ऐश्र्वर्य चिवचिवाट करून जगाला सांगतील. तुम्हालाही आत्मिक

समाधान देतील. आठवणी वाटचाल करणा-या आयुष्याच्या वाटाड्या असतात. अस्वस्थ मनाला रिझवायला आठवणीसारखा दुसरा खेळगडी नाही. जपा त्यांना आपले मार्गदर्शक म्हणून.

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments