श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ विविधा ☆ आठवणीच्या जुन्या पुलावर (ललित लेख) भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
(१९६०-६४चा काळ, हा माझ्या कॉलेज जीवनाचा काळ. ते वय रोमँटिक कल्पनेत रमण्याचं. तसंच त्या काळातील सामूहिक मनवरही रोमँटिसिझमचाच पगडा होता. म्हणूनच की काय, कुसुमाग्रज, बोरकर, शांता शेळके यांच्या कवितांची, विशेषत: प्रेमकवितांची मनावर विलक्षण मोहिनी होती. प्रत्यक्ष प्रेमाचा अनुभव घेणारे फार थोडे. प्रेमाच्या कल्पनेवर प्रेम करणारे माझ्यासारखे खूपच खूप…. नव कवितेने त्या काळात कुतूहल निर्माण केले असले, तरी तरी युवा मनात ती काही तितकिशी रुजली, स्थिरावली नव्हती. युवा मन सफल-विफल प्रेमाची गीते गाण्यात, विरहाचे दु:ख सोसण्यात आणि उसासे सोडण्यात दंग. या अशा रोमँटिक जीवनाबद्दल कुतुहक, प्रेम, आकर्षण वाटण्याच्या काळात आणि वयात, मंगेश पाडगावकरांचे धारानृत्य, जिप्सी, छोरी, उत्सव असे काव्यसंग्रह हाती लागले. त्यातील प्रेमकवितेबद्दल इतकं प्रेम, आकर्षण, आस्था, जिव्हाळा वाटू लागला, की त्यातल्या किती तरी कविता, अवतरणे पुन्हा पु्न्हा वाचू लागलो. एकमेकींना वाचून दाखवू लागलो. त्या भावनांशी तादात्म्य पावता पावता, एक ललित लेख मनात साकारत गेला आणि मनातच राहिला. नुकतीच 10 मार्चला पाडगावकरांची जयंती झाली. त्या निमित्ताने त्यांच्या कविता पुन्हा नव्याने वाचता वाचता, कधी तरी लिहिलेला आणि मनाच्या तळात राहून गेलेला हा लेख उसळून वर आला आणि पुन्हा गद्धेपंचविशीत घेऊन गेला.)
? ? ? ?
किती दिवस… महिने… वर्षे उलटली. जुन्या आठवणींच्या पुलावरून येरझारा चालू आहेत. पण तिकडच्या टोकाला आहेस ना तू? उदास व्याकुळ डोळे काय बघताहेत? आठवते तुला ती अखेरची भेट? क्षणभर हातात घेतलेले हात… त्या स्पर्शाची संवेदना अजूनही अंगभर थरथरते आहे. त्या पुलावरून जात जात किती मागे पोचलोय मी. अगदी बालवयात पोचलोय.
आठवते आहे ती बालपणीची शाळा. शाळा कसली? चार खिडक्या असलेले चौकोनी खोकेच. भल्या पहाटे (आठ वाजता) शाळा सुरू व्हायची. प्रार्थना, मग कर्कश्य आवाजातला मास्तरांचा हुकूम. ‘काढा पाट्या..कुठाय उजळणी…चला दाखवा.’ माझी पाटी कोरी. मग खवचट चष्म्यातून रोखून बघणारी भिंगे…. नि माझ्या हातावर सपासप पडणारे वेत. मी किती वेळ मुसमुसून रडत राहिलो, मलाच कळले नाही. मग मऊ हाताच्या स्पर्शाने जाग आली. भुरे, सोनेरी केस असलेल्या, निळ्या डोळ्याच्या मुलीच्या हाताचा तो स्पर्श होता. मी तिला नाव विचारले. ती म्हणाली, `नाव? छोरी… हात पुढे कर’ आणि हातावर पडली नाजुक दातांनी तोडलेली कैरीची फोड. तिचीआंबट-गोडी अजूनही जिभेवर ताजी आहे. अजूनही स्वप्नात तिचे सोनेरी कुंतल भुरभुरतात आणि
अजून घेते टिपुनि वेदना
‘ नजर तिची ती निळी खोडकर…
गिरकी घेते मनी कलाबूत तिच्या स्वरांची
नाव? छोरी… हातपुढे कर.’
बालणीची आणखी एक आठवण. भातुकलीच्या खेळात गंमत वाटायची, तेव्हाचे ते दिवस…. पावसाच्या चिंब वेळी होड्या सोडण्याचा खेळ… तू म्हणालीस, ‘माझी होडी पुढे गेली… तुझी मागे..’ नंतर पुढे जाणार्या होडीबरोबर तूही पुढे निघून गेलीस. मी किनार्यावर. नि:स्तब्ध… निश्चल… असहाय्यसा.
बघता बघता तू बालिकेची किशोरी आणि किशोरीची नवतरुणी झालीस. जसे फूल फुलावे तशी उमलत राहिलीस. गंध उधळत राहिलीस. कधी तू दिसायचीस लाल फुलांनी झुलणारी डाली, कधी वाटायचे तू असशील वादळवारा. आपल्या श्वासांनी उधळशील सार्या वृत्ती सैरावैरा. कधी भासायचे,
‘पार्थिव आणि अपार्थिव यांच्यामधले झिळमिळणारे क्षितीज सुगंधाचे तू’
तुझी किती रुपे, वास्तवातली आणि माझ्या कल्पेतलीही…. या दोन्ही रुपांची किती सरमिसळ झालीय माझ्या मनात. माझ्या मनमंजुषेत ती सारीच रुपे, वास्तवातली आणि कल्पनीतलीही मी अगदी जपून ठेवलीत. तुझ्याबद्दल वेगळे काही नव्यानेच जाणवले आणि तुझी ओळख नव्यानेच झाली.
‘तेव्हाची ती पहिली ओळख अपुली
बोलायाचे खूपच होते
तुला… मलाही…
परंतु मौनाने मौनच धरले हृदयाशी
अन शब्दांची झाली पळसफुले
पिवळ्या जर्द उन्हाने भरलेली.
नंतर एकदा मला भेटायला तू वाट चुकवून आलीस आणि निराळीच होऊन गेलीस. तू मुळी तुझी उरलीच नाहीस. तू मला वेढलंस आणि थरथरत्या खोल जळी मला ओढलंस. त्यानंतरच्या किती भेटी… अंधार्या रात्री. चांदण्या रात्री. समुद्राकाठी. पुळणीवती. तळ्याकाठी…. किती तरी भेटी. कधी नि:शब्दशा. कधी अखंड वटवटणार्या या भेटी.
—-क्रमश: भाग 1
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈