श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ विविधा ☆ आठवणीच्या जुन्या पुलावर (ललित लेख) भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
(मागील भागात आपण पाहिले
—-नंतर एकदा मला भेटायला तू वाट चुकवून आलीस आणि निराळीच होऊन गेलीस. तू मुळी तुझी उरलीच नाहीस. तू मला वेढलंस आणि थरथरत्या खोल जळी मला ओढलंस. त्यानंतरच्या किती भेटी… अंधार्या रात्री. चांदण्या रात्री. समुद्राकाठी. पुळणीवती. तळ्याकाठी …. किती तरी भेटी. कधी नि:शब्दशा. कधी अखंड वटवटणार्या या भेटी… आता इथून पुढे ——)
`आठवते का सांज तुला ती पाऊसओली.
भिजलेल्या रंगात आपुली ओळख झाली.’
आणि ती रात्र आठवते तुला? समुद्र संथ होता. चुरगळल्यासारखा लाटा दिसत होत्या. आकाश उत्कट, अधिरे, झाल्यासारखे चुंबनोत्सुक वाटत होते. पिवळ्या चंद्राच्या झिरझिरित पुळणीवरची भुसभुशित रेती न्हाऊन निघाली होती. भुरा अंधार होता आणि होतो फक्त तू… आणि मी… आणि माझ्याजवळची तू… कशी?
`सर्वांगाने सुख भोगावे
कसे तुला ते पुरते ठाऊक
स्पर्शातुन भिनविसी फुलांचे
तू रंगी-बेरंगी कौतुक.’
त्यादिवशी मी तुला म्हंटलं होतं,
`असे मोकळे हसल्यावर तू, जे न तुझ्यातून दुजे वेगळे
दिल्या –घेतल्यावाचून काही तुला मलाही मिळते सगळे’
आणखी एक रात्र . प्रीतीच्या त्या गाढ क्षणी, तू आकाशच जसे पापण्यत मिटून घेतलेस आणि मी त्यात एक चांदणी होऊन लुकलुकलो. त्यावेळी असण्यामधली अथांगता मी अनुभवली.
हळूहळू तू धीट होत गेलीस. म्हणालीस,
‘आभाळ झुकले तळ्यात रे,
तुझे हात माझ्या गळ्यात रे
स्वप्न पाहू लागे दिठी,
तुझी माझी गाठ मिठी
जागी झाली फुले कळयात रे ,
तुझे हात माझ्या गळ्यात रे’
तर मी तुला म्हणालो,
`हा जीव तुझ्यावर जडला
मी मिटूनी घेतले डोळे
पाऊस फुलांचा पडला.’
खरंच! तू नुसतीच कुजबुजलीस त्या अंधारी आणि रहस्य कळले. शब्दांना नसला अर्थ तरीही कळले सारे कळण्याच्या पलिकडले.
पण हे खरंच होतं का? नसावं! नाहीचमुळी! तो मला झालेला आभास होता. एकदा मला मिठीत बुडवीत म्हणाली होतीस,
`तुझ्यासवे राहीन उपाशी नकोच वैभव नको मला घर
फिरेन मीरानात मजेने तुझ्या संगती रानफुलांचे पिऊनी चांदणे
निजेन अन मी खडकावरती’
अन श्वासांचे शब्द माझिया, ‘वेडीकुठली…’
तू वेडी की मीवेडा? त्यावेळी तू आणि मी दोघेही म्हणालो होतो,
`प्रीत माझी तुझी एक गाणे
गात जाणे, गात जाणे, गात जाणे’
पण पुढे मात्र मला एकट्यालाच हे गाणे गात जावे लागले. तू अलगद निघून गेलीस पुढे… एकटीच … मिटून घेतले होते मी माझ्यात तुला. सर्वस्वाचा पहारा ठेवला होता. पण माझ्या या सर्वस्वाच्या पहार्यातून तू निसटून गेलीस. खुशीने? की नाईलाजाने?
एका रात्री मी तुला जाम पिडलं होतं. खूप चिडवलं होतं मी तेव्हा तुला. तू अगदी रडवेलीशी झालीस. म्हणालीस,
`छळून घे रे छळणार तेवढे… मी गेल्यावर स्मरशील का रे?’
तुझी – माझी वाट वेगळी होण्याची चाहूल तुला त्याचवेळी लागली होती का? नंतरच्या रात्री तू मला सांगूनच टाकलंस,
‘थांबणार नाही रात्र, आता होईल पहाट
आहे होणार वेगळी तुझी माझी वाट
तोवर हे स्वप्न बघू, रात्र सरायची आहे
नको सोडवूस मिठी, रात्र सरायचीआहे.’
तोच होता का निरोपाचा क्षण… ती निरोपाची मिठी होती का?
‘तू म्हटले थांब तरी, थांबली न रात्र मुळी’
त्यानंतर … दु:खाला वसतीला मी ऊर दिला. त्या निर्दय नियतीला सूर दिला. मनात आलं,
`ही हार कुणाची, ही जीत कुणाची?
आसवात (ही) हसण्याची ही प्रीत कुणाची?’’
वाटेसारखे हे भागधेय समोर आले, तशी तुला म्हंटलं,
`त्याचे त्याला देऊन टाक, बाकी ठेवू नकोस काही.
मला देणार होतीस जे, त्याचा हिशेब होणार नाही.’
अभाळाने लाजावे, पृथ्वीने बघत रहावे, असे काही देणार होतीस. पण राहीलंच ते… राहू दे…
‘गाण्यामधून वहात राहील आभाळवेडी तुझी खूण…
वृत्ती-वृत्ती जपत राहील तुझ्या डोळ्यांमधले ऊन…
तू खरंच सांग एकदा … तुला आठवतय हे सारं? की काही बाही? की काहीच नाही? शेवटचा निरोप घेताना तू म्हणाली होतीस,
येईन एकदा पुन्हा
पल्याड काळोखाच्या जाण्याआधी
घेऊन अंगभर ओळख
सगळ्या फुलत्या खुणा
येईन एकदा पुन्हा
घुंगुरवाळ्या पाण्यापाशी…’
मी वाट बघतोय. आसासून वाट बघतोय. त्या क्षणाची …
समाप्त
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈