☆ विविधा ☆ आजची मी….’बघ कस समाधान मिळत ते’ ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆
ए सखी, गृहिणी म्हणून कामाचा उरका पाडताना, तू करतेस का ग हे?
करत नसशील तर बघ करून…. ‘बघ कस समाधान होत ते’!!
सखी…पोरं, बाळ, नवरा सर्वांचा नाश्ता, डबे आटोपून, तव्यावर शेवटची भाकरी टाक!
टम्म फुगलेली तव्यावरची भाकरी तशीच ताटात घे…त्याच तव्यावर मेथी किंवा पालेभाजी पटकन परतायची…आणि गरम भाकरी सोबत पटकन खा!नाश्ता म्हणून!! बघ कस समाधान मिळत ते!
भाजीच हवी असही नाही, नुसत गरम भाकरीवर तूप, मीठ, तिखट लाव, आणि मजेत भाकरी खा बघ कशी अंगी लागेल. तुही स्वतःला नाश्ता करायची सवय लावून घे न… आणि सांग कस समाधान मिळत ते!
केर झाला, फरशी झाली, धुण झालं, सगळं स्वच्छ झालं, पूजाही झाली, आणि इतर सगळी सकाळची काम आटोपून घड्याळात बघ एक वाजलाय…. सखी घे ताट आणि चौरस पण सात्विक आहार घे! कंटाळा करू नकोस. फळभाजी, पालेभाज्या, कोशिंबिरी, चटण्या खायच्या. उरकायच म्हणून जेवण उरकू नकोस ह! दही अन ताक पोटाला शांत करत, ते घ्यायला विसरू नकोस, एकटीच असतेस घरी म्हणून भरभरही खाऊन सम्पऊ नकोस. अन्नाचा आस्वाद घेत, शरीर स्वास्थ्यासाठी जे उत्तम त्याचा विचार करत खा! जेवण झाल्यावर चार शेंगदाणे व गूळ तोंडात टाकायला विसरू नकोस… HB च्या गोळ्या का घ्यायच्या ग?? गुळाचा खडा तोंडात टाक बघ कस समाधान मिळत ते!
दुपारी एखाद अख्ख फळ तू खा… स्वतःसाठी, सर्वाना फळ कापून देताना… स्वतःला किती घेतेस? येतंय का लक्षात? म्हणूनच म्हणते फलाहार पोटाला शांत करतो.. मग अस शांत झाल्यावर बघ, कस समाधान मिळत ते!
तुझे आवडते छंद जप, वर्तमानपत्र वाच. रोज काहीतरी लिहीत जा. व्यक्त हो, दाबून ठेऊ नकोस तुझ्या भावना. घरातली कशी सगळी माहिती तुला असते, तशी बाहेरची, वातावरणाची, राजकारणाची, घडामोडीची माहिती तुला मिळत गेली की तुझ्या ज्ञानात आणखी भर पडेल… तुझा आत्मविश्वासही वाढेल. मग बघा कस समाधान वाटत ते!
सखी… संध्याकाळी चहा झाला की ४० मिनिटं तरी चालून ये हं! चयापचय, रक्ताभिसरण व्यवस्थित व्हायला हवं न? आणि हाच व्यायाम आपली ऊर्जाही वाढवतो, संध्याकाळी चणे फुटाणे टाक तोंड हलवायला! बघ कस समाधान होत ते!
रात्री लवकरच सगळं आवरत जा, स्वयंपाक वगैरे, कारण रात्री लवकर जेवण केलं की पचतही व्यवस्थित. झोपताना एक कप कोमट दूध पी, बघ कस समाधान होत ते!
खाण्याचं, व्यायामाच, मनशक्तीच तंत्र संभाळलस तर का दुखतील पाय? का होईल HB कमी? का होईल calcium कमी? का येईल थकवा? का येतील दुखणी सांग ना?
अगदी झोपताना एका आसनावर ध्यानस्थ हो, सगळ्या शंका, कुशंका , चिंता, भय, विचार सोडून दे आणि ध्यानावर लक्ष केंद्रित कर!
त्या परमानंदासारखं आनंद दुसरा नाही!
हीच ध्यानातील शांतता तुला शांत झोप येण्यास मदत करेल, तूझं आत्मबळ वाढवेल, तुझी शारीरिक व मानसिक ऊर्जा वाढवेल….
आता तरी स्वतः साठी जगून बघ, ‘मुक्तछंदी’! सर्वाना वेळ देताना, काढ स्वतःसाठी वेळ! तुझ्या दैनंदिन कामाच्या यादीत, ही सुद्धा यादी नोट करून घेच अन……
…. मग बघ कस समाधान मिळत ते!
© सौ अश्विनी कुलकर्णी
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈