प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

☆ विविधा ☆ आजच्या विदयार्थ्यांसमोरील आदर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ☆ प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे ☆ 

(14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956)

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील विदयार्थी काळ हा अतिशय महत्वाचा असतो. या काळात आपण जे शिकतो जे अनुभवतो, ज्या प्रेरणा आपल्याला मिळतात त्याचा उपयोग आपल्या पुढील आयुष्यात  होत असतो. अशा  काळात आपल्या समोर आदर्श असणे हे आवश्यक असते. विदयार्थ्यांसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, विद्याव्यासंग, सामाजिक, राष्ट्रीय कार्य, विदवत्ता,उत्तम आदर्श आहे. जगातील सर्वच विदयार्थ्यांच्या  समोर बाबासाहेब हे एक आदर्श आहेत.

१  विद्येचे महत्व

आजच्या काळात विद्येला  खूप महत्व आहे. त्यावर वेळ व पैसा मोठयाप्रमाणात खर्च केला जातो. विद्येबद्दल बाबासाहेबांचे  विचार हे क्रांतिकारी आहेत. बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्वाचे  साधन आहे. तुम्हाला जर  स्वतःला बदलायचे, समाजाला बदलवायचे असेल तर शिका. बाबासाहेब शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा असा संदेश देतात. विद्या हा मानवी जीवनाचा  पाया असून ते मानवाच्या सर्वांगीण विकासाचे  साधन आहे. बाबासाहेब म्हणतात  मी मोठा कसा झालो  असे जर मला कोणी विचारले तर मी सांगेन शिक्षणाच्या संस्काराने.  बाबासाहेबानी आपल्या  जीवनात शिक्षणाला  खूप महत्व  दिलेलं आहे. त्यासाठी अपार  मेहनत केलेली  आहे. ज्या प्रमाणे पोटात  अन्न नसेल तर व्यक्ति अशक्त होतो त्याचप्रमाणे जर शिक्षण  नसेल तर व्यक्ति लाचार होतो त्याचे जीवन पशुसम होते अशा अचूक व साध्या  सोप्या पद्धतीने त्यांनी शिक्षणाचे महत्व  पटवून दिले आहे. त्यामुळे  विदयार्थ्यांनी ही शिक्षणाचे महत्त्व ओळखुन  विद्या संपन्न करण्यासाठी झटलं पाहिजे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी ही अपार मेहनत, ध्येयनिष्ठा ठेवून विद्या मिळवली पाहिजे.

तुमच्याकडे विद्या असेल तरच तुम्हाला मान सन्मान मिळेल असा उपयोगी व विकासाचा मार्ग बाबासाहेब दाखवतात.

२ विद्येबरोबरच शील असले पाहिजे

नुसते विद्वान  होऊन उपयोग नाही तर विद्ये बरोबर विदयार्थ्यांच्या  अंगी शील असले पाहिजे, असे बाबासाहेब आवर्जून सांगतात.

शिकलेल्या लोकांमध्ये शील नसेल तर समाजाचा राष्ट्राचा नाश होईल मग नुसत्या शिक्षणाचा उपयोग काय? त्यामुळे विदयार्थ्यांनी विद्येबरोबरच शील ही जोपासले पाहिजे. शील म्हणजेच नीतिमत्ता चांगले वाईट समजणे, वाईटापासून  दूर राहणे. आपल्या  हातून चांगले कार्य कसे होईल हा विचार सदैव विदयार्थ्यांनी केला पाहिजे असा मोलाचा संदेश बाबासाहेब देतात. हा संदेश किती महत्वाचा आहे हे आपण आजूबाजूची  परिस्थिती पहिली की लक्षात  येते. व्यसन, वाईट संगत,अमली पदार्थ  सेवन, यात काही तरुण गुरफटलेले दिसून येतात त्यामुळे विदयार्थ्यांनी वाईट कृत्यापासून दूर राहून, वाचन, लेखन,गायन, वादन, चित्रकला, नृत्य,  क्रीडा, असे छंद जोपासले पाहिजेत.

शिकलो म्हणजे सर्व झाले असे नसून केवळ पदवी मिळवणे म्हणजेच शिक्षण  नव्हे तर विदयार्थ्यांनी रचनात्मक कार्य केले पाहिजे.

जे तो शिकणार  आहे त्याचा उपयोग केवळ आपल्यापुरता न होता  समाजहितासाठी  झाला पाहिजे असे ही बाबासाहेब  आवर्जून सांगतात.

३ अजन्म विद्यार्थी

बाबासाहेब हे अजन्म विद्यार्थी होते. रात्रभर जागून अखंड अठरा अठरा  तास ते अभ्यास  करीत असत. वाचन, लेखन  करीत असत. कोलंबीया विद्यापीठाने  knowledge of symbol ज्ञानाचे उपासक  म्हणून  त्यांचा गौरव केला आहे. विदयार्थी  भूमिका घेऊन सतत काहीतरी शिकत राहणे, एखाद्या विषयाचा  पाठपुरावा करणे, एखाद्या विषयाचा  खोलवर अभ्यास करणे, सतत वाचन करणे, लेखन करणे हे गुण बाबासाहेबांकडून  विदयार्थ्यांनी घेतले  पाहिजेत. विविध विषयावर अपार मेहनत घेऊन त्यांनी विविध ग्रंथ प्रकाशित केले आहेत. काहीवेळा आपण ही अर्धवट माहिती घेतो व तिलाच खरे मानून चालतो त्यामुळे अपुरे विद्यार्जन करून काही उपयोग नाही तर योग्य शिक्षण घेऊन आपली योग्यता सिद्ध केली पाहिजे. बाबासाहेबांचा हा मोलाचा संदेश  असून विद्या घेत असताना विदयार्थ्यांनी आपल्या अंगी कोणती कौशल्य आहेत याचा विचार करून आपले क्षेत्र  निवडले पाहिजे व त्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले पाहिजे. आता मला शिकण्याचा उपयोग नाही असे न म्हणता सतत शिकत राहिले पाहिजे. ते शिक्षण पुस्तकीच असेल असे नाही तर बऱ्याच नवीन गोष्टी, तंत्रज्ञान येत असते ते शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.कोरोना काळात या पूर्वी कधीही ज्याचा फारसा विचार केला नाही अशी ऑनलाईन शिक्षण पद्धती आपण शिकली त्यातील तंत्रे समजून उपयोगात आणली म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याचा आपल्याला फायदाच झाला.

४  संघर्ष

बाबासाहेबाचा शैक्षणिक  प्रवास हा अतिशय खडतर असा होता. गरिबी, जातीय अवहेलना  अपमान, पुरेशी साधने  नसणे  परंतु अशा ही स्थितीत त्यानी आपली जिद्द सोडली नाही. आणि ज्या देशात त्यांना  अपमानकारक  वागणूक मिळाली त्याच  देशाची राज्यघटना  त्यांनी  लिहिली. हे सर्व घडू शकले  ते त्यांच्या  तील प्रबळ इच्छाशक्ती, ध्येयनिष्ठा, अपार  मेहनत करण्याची तयारी,चिकाटी, जिद्द  धाडसीपणा, स्वाभिमान, महत्वकांक्षा, यामुळे.

अपमानाला त्यांनी  मेहनतीने  उत्तर दिले. आणि विविध विषयातील 32  पदव्या मिळवल्या. यातून आपल्याला एक शिकवण  घेता येईल की एखाद्याकडे जिद्द असेल मेहनत  करण्याची तयारी असेल तर तो आपल्या कार्यात यशस्वी  होईलच. त्यामुळे आपण गरिबी, पुरेशी साधने नसणे अशा  गोष्टीचा विचार न करता त्यावर मात करून मला पुढे कसे जाता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करून आपले ध्येय गाठले पाहिजे.

५  पुस्तक प्रेमी, वाचन प्रेमी

विद्यार्थीदशेत असताना पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पुस्तकांचा  उपयोग करूनच अभ्यास  करावा लागतो. वाचनामुळे आपल्या विचारात प्रगल्भता येते.

बाबासाहेबांचे पुस्तकांवर  प्रचंड  प्रेम  होते. पुस्तकांसाठी बंगला  बांधणारे एकमेव बाबासाहेब असतील. मुंबई दादर येथे त्यांनी राजगृह  नावाने खास पुस्तकासाठी घर बांधले होते. आजही तिथे आपणास ग्रंथ पहावयास  मिळतात. पुस्तक वाचण्यासाठी ते जेवायचे ही विसरून जातं असत.परदेशात  असताना वेळ वाया जावू नये म्हणून ते ग्रंथालयात चोरून पावाचे तुकडे खातअसत. इतके प्रेम त्यांचे पुस्तकांवर होते.

बाबासाहेब म्हणतात ज्ञानची भूक भागावी म्हणून  मी पोटाची भूक मारून अनेक ग्रंथ खरेदी केले आहेत. तुमच्याकडे जर दिन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या व एक रुपयाचे पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल आणि पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल. सहजसोप्या भाषेत बाबासाहेब आपल्याला पुस्तकांचे महत्व  सांगतात.त्याचे अनुकरण  आपण विद्यार्थी दशेपासूनच केले पाहिजे. जशी आपल्याला पुस्तके मिळतील तसा  संग्रह केला पाहिजे.

वाढदिवसाच्या निमित्त असो, या कोणीही आपल्या भेट देणार असो  अशावेळी  आपण पुस्तके देण्याची विनंती  केली पाहिजे. शालेय वयापासूनच वाचनाची  आवड जोपासली  पाहिजे व विविध  विषयावरची  पुस्तके वाचली पाहिजेत.वाचनालयाचे  सभासद  होऊन तेथील  पुस्तके वाचली पाहिजेत. वाचन करीत असताना  त्यातील महत्वाचे  मुद्दे आपल्या  वहीत उतरून घेण्याची सवय लावली पाहिजे. अशी सवय विदयार्थ्यांनी ठेवली तर पुढे तुम्हाला  याचा खूप चांगला उपयोग होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बावीस हजारापेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह होता.22हुन अधिक विविध विषयावरील संशोधनपर पुस्तके बाबासाहेबानी लिहिली आहेत.लोकांनी माझी अवहेलना  केली पण पुस्तकांनी मला ज्ञान  दिले. अशाप्रकारे विदयार्थ्यांनी ही आपला स्वतःचा  पुस्तक संग्रह करून त्याचा जास्तीजास्त उपयोग ज्ञान  मिळवण्यासाठी, समाजातील प्रश्न समजून घेण्यासाठी,विषयाचे  आकलन होण्यासाठी केला पाहिजे.

अशाप्रकारे विविध गुणांची खाण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले पाहिजे. विद्या, शील, संघर्ष, सतत शिकण्याचा ध्यास  वाचनप्रेम, पुस्तकांचा सहवास, विद्ववता जिद्द, चिकाटी स्वाभिमान, याचा आदर्श  आपण सर्व विदयार्थ्यांनी घेतला पाहिजे. कठोर परिश्रम करून उच्च शिक्षण घेतले पाहिजे व आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या उन्नतीसाठी तसेच समाजाच्या व राष्ट्राच्या  उन्नतीसाठी  केला पाहिजे. अशा या थोर महामानवाला कोटी कोटी प्रणाम.

ज्ञानवंत प्रज्ञासुर्य

करितों वंदन तुम्हा

उज्वल होवोत  दिशा

आदर्श तुमचा आम्हा

© प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

नवी मुंबई

7738436449

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments