विविधा
☆ आरसा… ☆ श्री मनोज कुरंभटी ☆
मनुष्य प्राणी जन्माला आल्यापासून तो ज्या काही वस्तूंच्या संपर्कात येतो आणि जी वस्तू परिचयाची होते, त्यातली महत्वाची वस्तू म्हणजे आरसा.
मुलं रडायला लागलं की त्याला नादी लावण्यासाठी त्याला आरसा दाखवतात , त्यावेळी स्वतःचे प्रतिबिंब कुतूहलाने पाहत असताना त्याचे रडणे थांबते, ही आरश्याची जणू पहिली ओळख. प्रथम ते लहान मुलं ते प्रतिबिंब बघून घाबरले असेल पण नंतर त्या प्रतिबिंबाला बघून खुदकन हसते. त्यानंतर जणू आरसा त्याच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनून जातो.
स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळताना माणूस त्या प्रतिबिंबित व्यक्तिमत्वाशी इतका समरस होऊन जातो की दिवसभरात किती वेळा माणूस त्याचे प्रतिबिंब न्याहाळत असेल सांगता येत नाही.
आरश्यासारखी प्रामाणिक वस्तू नसेल, जे आहे ते स्पष्टपणे दाखवतो. आरश्यात सौंदर्य जसे खुलून दिसते तसे व्यक्तीमत्वामधील दोषही, आहे तसेच दाखवले जातात. चेहऱ्यामधील सौंदर्याची तफावत अथवा कमतरता पण स्पष्ट केली जाते. घरामधील महत्वाची वस्तू आणि अविभाज्य घटक म्हणून आरश्याचे स्थान आहे.
माणसाच्या उत्क्रांतीत आरश्याचे स्थान कधी आले असेल?असे म्हणतात, ‘माणूस तळ्याच्याकाठी पाणी पिण्यासाठी वाकला होता त्यावेळी संथ पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब त्याला दिसले. त्या वेळेपासून त्याला कुतूहल निर्माण झाले आणि स्वतःचे प्रतिबिंब बघावे ह्या निकडीतून आरशाचा शोध लागला असावा.
काचेच्यामागे मुलामा चढविल्यानंतर जो चकचकीतपणा आला, त्यात बघणाऱ्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसले, ते बघून आरश्याची निर्मिती झाली असावी. ज्या माणसाने आरश्याचा शोध लावला, तोही स्वतःचे प्रतिबिंब बघून खुदकन हसला असेल .असा हा आरसा लहान बाळापासून अगदी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांचा लाडका झाला.
बालपणात तसे आरश्याकडे दुर्लक्ष होत असेल पण वयात येताना तो एकदम जवळचा वाटू लागतो. किशोर वय असो वा तारुण्याचा काळ आरश्यात स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळत केश रचना करणे, पेहेराव करणे, आरश्यात स्वतःला न्याहाळत स्वतःचे व्यक्तिमत्व कसे खुलले हे बघत राहणे, अश्या गोष्टी जणू अंगवळणी पडतात. त्यात तरुणींचा तारुण्यकाळातील खुपसा वेळ आरश्यापुढेच जात असेल.
‘दर्पण झूठ न बोले’ ह्या उक्तीप्रमाणे, जसे आहे तसे प्रतिबिंब आरसा दाखवत असतो. त्यामुळे एखादी सौंदर्यवती आरश्यापुढे स्वतःच्या सौंदर्याने मोहून जाते तर साधारण चेहऱ्याची व्यक्ती आरश्याकडे पाहत स्वतःचे सौंदर्य अधिकाधिक खुलवण्याचा विचार करत असते. आरश्यात दिसणाऱ्या प्रतिमेने माणसं आनंदतात तसेच चेहऱ्यावरील डाग बघून अस्वस्थही होतात. वाढत्या वयाच्या खुणा दर्शविणाऱ्या सुरकुत्या आणि पांढरे केस बघून मन चिंतीत होते. मग त्यावर तरुण दिसण्याचे उपायही आरश्यात पाहूनच केले जातात, जणू वृद्धत्वाच्या पाऊलखुणा पुसून टाकण्याची एक धडपड. त्याच आरशाच्या साह्याने सौंदर्य खुलवत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असताना वाढत्या वयासोबत होणारा शारीरिक बदल स्वीकारण्याची मानसिकता मात्र वाढीस लागत नाही. आरश्यात चेहऱ्याचे वास्तव दर्शन होत असताना ते टाळणे असंभव पण तरीही स्वतःच्या व्यक्तिमत्वावर अफाट प्रेम करण्याची सवय आरश्यामुळेच लागते.
खरं तर सुंदर चेहरा अथवा सौंदर्य दाखवणे हाच आरश्याचा उपयोग नाही. आहे ते आहे तसे प्रतिबिंबित करणे हे आरश्याचे प्रामाणिक कर्तव्य. जेव्हा आहे तसे स्वीकारण्याची सवय लागते अथवा प्राप्त परिस्थितीचा स्विकार केला जातो त्यावेळी असलेले प्रतिबिंब अथवा प्रतिमा आपलीशी वाटू लागते.
आरसा हा व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब दाखवत असताना, त्या प्रतिमेकडे पाहत आपण स्वतःवर खुश होत असतो. काही वेळा आरश्यापुढे पाहत स्वतःमधील आत्मविश्वास जागृत करता येतो. Self Talk हा मानसशास्त्रातील महत्वाचा घटक आहे, ज्या योगे माणूस स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो. काही वक्ते त्यांच्या उमेदीच्या काळात आरश्यापुढे उभे राहून भाषणाचा सराव करत. आजही प्रेसेंटशन स्किल सुधारण्यासाठी आरश्याचा वापर करतात.
‘आरसा हा सर्वोत्तम मित्र आहे, कारण आपण जेव्हा दुःखी असतो त्यावेळी तो कधीच हसत नाही.’
कधीकधी हाच आरसा जणू तुमची साथ सोबत करत असतो. विचार करा, घरात एकटेच असाल आणि एकटेपण जाणवत असेल अश्यावेळी नकळत आपण आरश्यापुढे उभे राहतो.
कवि गुलजार म्हणतात,
“आईंना देख कर तसल्ली हुई।
हमको इस घर में जानता है कोई।।”
आरसा भलेही माणसाचे बाह्य सौंदर्य प्रतिबिंबित करत त्याला खुश करत असेल पण सौंदर्य काय फक्त तेवढेच आहे? शारीरिक सौंदर्याइतकेच मनाचे सौंदर्य महत्वाचे. चांगला स्वभाव, आनंदी स्वभाव, नितळ, निर्व्याज आणि संवेदनशील मन ह्या बाह्य सौंदर्याप्रमाणे महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आरश्यात प्रतिबिंबित होत नाहीत पण त्या मानसिक सौंदर्यामुळे जाणवणारा आत्मविश्वास चेहऱ्यावर दिसतो आणि तो प्रतिमेत परिवर्तित होतोच.
समोरची जिव्हाळ्याची आणि प्रिय व्यक्ती,काही वेळेस आरश्याप्रमाणे प्रामाणिकपणे तुमचे गुण आणि दोष न्याहाळत असतात. त्या गुण दोषांचे समर्पक प्रतिबिंब त्याच्या प्रामाणिक मतानुसार परिवर्तित करत असतात. अश्यावेळी ते स्वीकारण्याचा, मनाचा मोठेपणा हवाच.
“आयुष्यात असे लोक जोडा की जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि आरसा बनतील.
आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.”
आपल्या प्रिय व्यक्तीच नाही तर आपल्या सभोवतालचे लोकही जणू आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असू शकतात. ही सभोवतालची माणसं काही फक्त बाह्य व्यक्तिमत्वाने प्रभावित होत नाहीत तर तुमचा चांगुल स्वभाव, तुमचे वागणे, बोलणे, बोलण्यातील मार्दवता, प्रेमळ भाष्य आणि निष्पाप मन ह्या अंतर्गुणांनी प्रभावित होत असतात आणि त्यांचा प्रतिसाद त्यांच्या वागणुकीतून दिसत असतो. जणू आपल्या वागण्याचे प्रतिबिंब समोरच्या माणसाच्या वागणुकीतून व्यक्त होत असते.
जे. कृष्णमूर्ती समर्पक शब्दात म्हणतात,
“समोरची व्यक्ती हा जणू तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा होय, तुमचे प्रतिबिंब त्यात दिसत असते.”
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं।पूर्णात्पूर्णमुदच्यते।।
पूर्णस्य पूर्णमादाय। पूर्णमेवावशिष्यते।।
ह्या उपनिशदातील उक्तीप्रमाणे थोडा वेगळा विचार केला तर,
“पूर्ण आकार धारण करून,
पूर्ण आकारात राहून,
पूर्ण आकाराला स्पर्श न करणे,”
ही किमया असणारा हा ‘आरसा’.
© श्री मनोज कुरुंभटी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈