श्री शरद दिवेकर
विविधा
☆ आज किती दिवसांनी… ☆ श्री शरद दिवेकर ☆
आज किती दिवसांनी आलास तू घरी ! सकाळी तुझी चाहुल लागली मला. खरं तर रोज तुझी चाहुल लागली की मी लगेचच दार उघडतो. पण आज अंमळ उशीराच उघडलं दार.
दार उघडून तुला घरात घेतलं, थोडंसं न्याहाळल्यासारखं केलं आणि लगेच दुसर्या कामाला निघून गेलो. तुला वाईट वाटलं असेल थोडं. कारण मी रोज असं करत नाही. तुला घरात घेतलं की तुझा चेहरा तरी नीट बघतोच, तुझ्या अंतरंगात देखील डोकावतो बहुधा.
जवळ जवळ रोजच येतोस तू. क्वचित कधीतरी येत नाहीस. त्या दिवशी देखील असं वाटतं की तू आला असशील. पण दार उघडावं तर तू नसतोसच बाहेर. मग हिरमोड होतो मनाचा. मग मनाला समजवावं लागतं.
गेले काही दिवस तुझी आठवणही फारशी येत नव्हती. कारण सवय झाली होती तू नसण्याची. विचार करतच होतो की तुला घरात घ्यायचं की नाही याचा, की घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद करायचे ! पण नक्की काही ठरत नव्हतं. अन आज अचानक उगवलास धूमकेतूसारखा.
द्विधा मनःस्थिती होण्याचं कारणही तसंच आहे. पन्नास पंचावन्न वर्षांचा ऋणानुबंध आहे आपला. तुझं व्यक्तीमत्वही याला कारणीभूत आहेच. तुझी माझी सर्वच मतं काही पटत नाहीत. खरं तर एकांगी किंवा एकपक्षी मतं असतात तुझी. तरीही तुझ्याऐवजी दुस-या कोणाचा विचार मनात नाही आला एवढ्या वर्षांत.
आता आज पुन्हा आला आहेस घरी. तर येत जा रोज.
रोज माझ्या घरी येणारा महाराष्ट्र टाइम्स
© श्री शरद दिवेकर
कल्याण
मो 70457 30570, ईमेल – [email protected]
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈