सौ. सुचित्रा पवार

☆ आनंदाचे डोही… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

मॉर्निंग वॉकवरून येताना गणपती मंदिरा जवळ रथ बाहेर काढलेला बघून एकदम मन आनंदाने उसळले.एक नवचैतन्य सळसळले.का बरं असं होत असावं ?माझाच मला मी प्रश्न विचारला.एखादी गोष्ट आपल्या बालपणाशी निगडित असली की आपण खूप आनंदी होतो.कारण त्या गोष्टीमागे,गोष्टीसोबत बऱ्याच घटना,बऱ्याच आठवणी निगडित असतात.एखादी मोत्यांची माळ सुटत जावी तशी आठवणींची लड सुटत राहते न आपण प्रफुल्लित होतो.उत्सव म्हणलं की चैतन्य,उत्साह,आनंद,परंपरा,ऊर्जा आणि गजबज.कोणताही सार्वजनिक उत्सव माणसांनी याचसाठी चालू केला की दररोजच्या त्याच त्या रुटीन मधून वेगळेपणा जगावा,सर्वांनी एकत्र येऊन आनंदी क्षणांची देवाणघेवाण करावी आणि जगण्यासाठी नव ऊर्जा प्राप्त व्हावी.मरगळलेपणा जाऊन उत्साह यावा,नवचैतन्य यावे.वेगळा आहार- विहार करावा अन अगदी सर्वच तळागाळातील शेवटच्या घटकाचे समाजमन देखील आनंदी व्हावे.

गणेश चतुर्थी आली की तासगाव संस्थानच्या गणपती मंदिरातला गणपतीचा तीन मजली लाकडी रथ बाहेर काढला जातो व स्वच्छ केला जातो.गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते व या रथातून श्रींची मिरवणूक काढली जाते.त्यासाठी पंचधातूच्या धातूची मूर्ती मंदिरातून बाहेर काढली जाते.

उत्सवाच्या अगोदर ठिकठिकाणी गणपती मूर्तींचे स्टॉल लागले जातात.वेगवेगळ्या आकाराच्या,रूपाच्या,रंगांच्या आकर्षक लोभस मूर्ती पाहून  मन हरखून,भान हरपून जाते.सजावटीच्या वेगवेगळ्या साहित्याचा बाजार भरतो.

श्रीमंत भाऊसाहेब पटवर्धन गणपतीपुळेच्या सिद्धी विनायकाचे निस्सीम भक्त होते.त्यांना गणपतीने दृष्टांत देऊन तासगावचे मंदिर बांधून घेतले व पूजा करायला सांगितले.त्यानुसार त्यांनी तासगावात सांगली रस्त्यावर पूर्वाभिमुख मंदिर बांधले.इथला गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो असा समज आहे.मंदिराच्या पुढं दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरे आहेत.सम्पूर्ण बांधकाम विशिष्ट दगड-चुन्यातील असून स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.राजवाड्यातील दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जना प्रित्यर्थ इथे मोठी रथयात्रा भरते.कोरोनाची दोन वर्षे सोडली तर अखंड अडीचशे वर्षांची परंपरा इथल्या यात्रेला आहे.

रिमझिम पाऊस,उन्हाचे मधूनच डोकावणे,हिरवेगार पीक,कडधान्याची काढणी,मळणी,विशिष्ट प्रकारचे गवततुरे,गवतफुले,भिरभिर रंगीत फुलपाखरे,वातावरणातील अनामिक चैतन्यआणि त्यासोबत येणारा गणपती उत्सव आणि त्या अनुषंगाने होणारी लगबग मला बालपणीच्या सगळ्या आठवणीत घेऊन जाते.

उत्सव…गणेश प्रतिष्ठापना,त्यासाठी लागणारी पाने,फुले..मग घरोघरी गौरी,त्यासाठी लागणारा फुलोरा शोधण्यासाठी सगळ्या गावंदरी पालथ्या घालणे,गौरींची घरोघरींची सजावट बघायला जाणे,सार्वजनिक मंडळाचे देखावे बघायला जाणे,त्यांनी ठेवलेले फुकटचे पिक्चर बघायला जाणे,गौरींचे कान उघडायला काटवटी, पराती जोरजोरात करकर वाजवणे,जत्रेसाठी घरोघरी पाहुण्यांचे आगमन सर्वच आठवते न मन  उल्हसित होते.

आमच्या गल्लीत रमेश (आमच्या भाषेत रमशा)गणपती करतो अगदी दहावीत असल्यापासून त्याने शाडूच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली.बेंदराच्या अगोदरच तो माती भिजवून चिखल करून मूर्तीच्या तयारीला लागायचा.दुपारी शाळेतून आलं की तो मूर्ती बनवताना,रंगकाम करताना आमचे तास न तास हरवणे सगळं आठवतेय.लहानपणी गणपतीची सर्वात लहान मूर्ती सव्वा रुपयाला मिळायची.रात्री आणायला गेलं की मग एकच रुपयाला.सव्वा दोन रु,पाच रुपये,दहा रुपये अशी मूर्तींची किंमत असायची.सर्वात महाग गणपतीमूर्ती पंचवीस रुपयाला मिळायची.

पण सर्वजण घरोघरी लहान मूर्तीच आणत.खरेतर दिवळीपूर्वीचे सर्व सण निसर्गाच्या वेगवेगळ्या रुपांच्या संगतीने पार पडतात;अर्थात भौगोलिक परिस्थितीनुसार मग देवाला नैवेद्यही तसाच शेती भातीशी निगडित असतो.आमच्याकडे गौरीला शेपूची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य असतो.पाच दिवस घरोघरी आरती करायला जायचे.चुरमुऱ्याचा प्रसाद खायचा.दोन दिवस सलग सुट्टी असायची.ओढे,विहिरी,तळी जिकडे तिकडे पाणी असायचे.पाचव्या दिवशी विहिरीत ओढ्यात घरगुती गणपतीचे विसर्जन करून मनात अपार उत्साह भरून माणसे आपापल्या कामाला लागायची.घरातून एखादा माणूस गावाला गेल्यासारखे जीवाला हुरहूर लागायची  गणपती विसर्जनानंतर.

आता काळ बदललाय.साधेपणा जाऊन दिखाऊपणा आलाय,सार्वजनिक मंडळाचे स्वरूप देखील बदललंय. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती,रासायनिक रंगामुळे उरल्या सुरल्या स्वच्छ पाण्याचे साठे प्रदूषित होत आहेत. नद्या,तलाव प्रदूषित होत आहेत,पण त्याची कुणाला फिकीर नाही.जो तो आपापल्या नादात आहे.

मला निसर्गाबरोबर रहायला आवडते.आम्ही आम्हाला परवडेल अशी शाडूची मूर्ती आणतो.यावर्षी तर ठरवलंय की पुढील वर्षी धातूची मूर्ती आणायची अन तीच पुजायची.मातीचा छोटा गणोबा कुंभारवाड्यातून आणून सोबत त्याचेही पूजन करायचे व त्याचेच विसर्जन करायचे.

आराशीला तर आम्ही कधीच थर्माकोल वापरत नाही त्यामुळं दिव्याची रोषणाई आणि कृत्रिम फुलांच्या माळा वापरून परत ते सर्व काढून बांधून ठेवतो.

तुम्हालाही एक विनंती.जमले तर शाडूचीच मूर्ती आणा आणि पर्यावरण रक्षणात खारीची भूमिका बजवा.येणारा गणेशोत्सव तुम्हा सर्वांना आनंददायी,आरोग्यदायी ठेवो हीच मंगल, शुभ कामना.

मंगल मूर्ती मोरया ss

गणपती बाप्पा मोरया ss

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments