सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ आठवणीतला क्षण… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

तो फेब्रुवारी महिना होता. बाहेर उन मी मी म्हणत होते. आम्ही गावी चाललो होतो. अन्शीच्या घाटातून गाडी वळणे घेत जात होती. शिशिराचे आगमण झाल्यामुळे पानगळ चालू होती. झाडांची पाने गळून झाडे नुसत्याच फांद्याबरोबर झुलत होती. येरवी गर्दहिरव्या घनदाट झाडीतून न दिसणारी घरे तुरळक दिसत होती. भोवताली गर्द झाडी आणि कुठेतरी ओहळातून शेतीसाठी तयार केलेले वाफे नजरेस पडत होते.  पहावे तिकडे घनदाट जंगल ,उंच डोंगर ,  कुठेतरी उतारावर दिसणारे चार घरांचे खेडे. उदरनिर्वाहासाठी केलेली भातशेतीची छोटी छोटी

वाफाडी .मुख्य रस्त्यावरून आत जंगलात  पायवाट जाताना दिसली की, लक्षात येते तिथे लोकवस्ती असेल. मनात विचार आला इतक्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेऊन कसे रहात असतील इथले लोक ?

गायींचे कळप रस्त्याच्या कडेने धुळ हुंगताना दिसत होते. त्यांच्या मागे कुणी राखणदार दिसत नव्हता.घनदाट झाडीतून पाखरांचे विविध आवाज कानावर पडत होते. आमची गाडी घाटातून वर आली तेंव्हा रस्त्याच्या कडेला एक चौदा-पंधरा वर्षाची मुलगी हातात रानफुलांचा हार घेऊन उभी दिसली.आम्ही गाडी थांबवताच तिचा चेहरा आनंदानी खुलला .तीने गाडी जवळ येऊन हातातील हार घेण्यास आम्हाला विनवू लागली. इतक्या रखरख उन्हात ती हार विकण्यास उभी होती. मला तिचे कौतुक वाटले. म्हणावे असे चांगले कपडे अंगावर नव्हतेच. तिच्या कपड्यावरून तिची गरिबी जाणवत होती.

हार पुढे करून ती आम्हाला विनवू लागली,” दहा रूपयाला हाय!घ्या यकच राहिलाया “.

मी तिला विचारले ,” इथे घर तर दिसत नाही. तू कुठे रहातेस?”.

तिने झाडीतून दुर बोट दाखवत एक घर दाखविले आणि स्मितहास्य करत म्हणाली  “तिथं “.

नंतर मी विचारले, “हा हार कुणी गुंफला “.

तीने लगेच सांगितले  ,मी फुलं आणून दिली. आणि आजीनं हार बनवला. मी शाळेत जायाच्या आधी फुलं आणून ठेवती.आजी हार बनवून देती . शाळेतनं आल्यावर रोजच मी हार इकायला इथं उभी रहाती .आईला तेवढीच मदत ह्युती खर्चाला “

ती मोठ्या धैर्याने बोलत होती. ती पुन्हा कविलवाणी होऊन आम्हाला आम्हाला हार घेण्यास विनवू लागली.मी तिला विस रूपये देवून  तिच्या कडून हार घेतला.  लगेच ती दहा रूपये परत करू लागते मी म्हटले  “राहुंदे ठेव तूला”.

पैसे पाहून तिचा चेहरा आनंदात उजळतो. ती खूप आनंदी होते.

आम्ही पुढे निघून गेलो. पण त्या मुलीचा गोड, आनंदी चेहरा कितीतरी वेळ नजरेत रेंगाळत राहिला. लोक रोज हजारानी पैसे कमावतात पण समाधानी नसतात. तो हार विकून विस रूपये मिळताच तिचा चेहरा आनंदानी फुलून गेला.  उन्हातान्हाचे ,घनदाट जंगलातून गेलेल्या रस्त्यावर हार विकून मिळालेल्या दहा-विस रूपयांचे पण केवढे  ते समाधान ! केवढा आनंद! .आपण किती पैसे कमावले तरी आपला हव्यास संपत नाही. त्या निरागस , गरीब ,  कोवळ्या वयातील  मुलीला आपली आजची गरज भागली या कल्पनेनेच किती आनंद झाला.  खरा आनंद हाच असेल का ?आपल्या मुलांना आपण किती  खाऊ   महागाची खेळणी आणून दिले , तरीपण त्यांच्या मागण्या बंद होत नाहीत . वाढत्या वयासोबत त्यांच्या मागण्या सुध्दा वाढत जातात. पण प्रतिकूल परिस्थितीतून मिळालेले दहा-विस रूपये पण किती आनंद देतात हे त्या मूलीकडे पाहून कळले.

आम्ही घरी पोहचेपर्यंत तो  रान फुलांचा हार सुकून गेला . पण त्या मुलीच्या चेहर्‍यावरचा आनंद तसाच ताजाटवटवीत राहून कितीतरी दिवस मनात रेंगाळत

राहीला आणि त्या रानफुलांचा गंध मनाला सुखावत राहिला.

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments