श्री सुबोध अनंत जोशी

?  विविधा ?

☆ आपुलकीची पुस्तके ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

तसं पाहिलं तर, पुस्तके ही निर्जीव भौतिक वस्तू आहे. मुद्रित  मजकूर असलेल्या कागदांची बांधणी करून तयार झालेली वस्तू म्हणजे पुस्तक.विविध आकारप्रकाराची निर्जीव वस्तू.ही वस्तू पुस्तकाच्या बाजारात विकली जाते, विकत घेतली जाते;दुकानातून, ग्रंथालयातून, स्टॉल मधून वितरित होते. त्याचा उपयोग संपल्यावर किंवा त्याचा उपयोग न केल्यावर  या वस्तूची रद्दी होते. काही पुस्तकाच्या जिवांवर वितरक, प्रकाशक  क्वचित् लेखक पैसे मिळवतात. पुस्तकांचे जिवावर मोठ-मोठी ग्रंथालये उभी राहतात. पुस्तकाच्या प्रदर्शनात कमाई करणारे प्रकाशक भेटतात;क्वचित् लेखकही असतात. हौशी लेखक प्रसिद्धीच्या आशेने, अपेक्षेने  अधिकाधिक पुस्तकांना प्रसवतात.अशा पुस्तकांचे गठ्ठे  ग्राहकांची वाट पाहत असतात. डिजिटल, ऑनलाइन पुस्तके, डमी पुस्तके, पीडीएफ आवृत्ती, कॉपीराईट  असे कितीतरी शब्दप्रयोग पुस्तकांच्या दुनियेत चलनी नाण्याप्रमाणे प्रचलित असतात.

 वरील मजकूर बव्हंशी तिरकस,तिरसट,सिनिकल दृष्टीने लिहिला गेला आहे.कारण पुस्तकाला निर्जीव मानलं गेलं तर असंच लिहिलं जाईल. पुस्तकाला सजीव तरी कसे म्हणता येईल? सजीवतेच्या व्याख्येत पुस्तक बसत नाही. ते कधी श्वास घेतं का? ते स्वतःहून इकडून तिकडे फिरते का?  पुस्तकाला पुनरुत्पादनाची शक्ती आहे का? पुस्तकाला पाच संवेदनापैकी एक तरी संवेदना आहे का? या सर्वांची उत्तरे नकारार्थी आहेत. असे असूनही पुस्तक असे काही आहे की ते आपल्या मनाला जिवंतपणा देते, पुस्तक असे आहे की ते स्वतः अलिप्त राहून अशी कांहीं प्रक्रिया घडवून आणते,की त्यामुळे पुस्तकवाचनाचा परिणाम संजीवनीसारखा होतो. या कारणामुळेच पुस्तके भौतिक निर्जीव वस्तू रहात नाही. पुस्तकविक्रेत्याला पुस्तक वस्तू वाटेल,परंतु पुस्तकप्रेमीला ती सजीव वाटेल.  पुस्तकप्रेमीच्या द्रृष्टीने पुस्तकातला मजकूर ही  अक्षरांचे एका मागून एक ठेवलेले डबे नसतात. पुस्तक हे अक्षरे, शब्द, वाक्य,त्यामधील अर्धविराम, पूर्णविराम,स्वल्पविराम या सर्वांसोबत सर्व  वाचकांच्या मनासमोर असे एक जिवंत काव्य, सळसळते विश्व निर्माण करते की त्यामुळे वाचकांचे मन तळापासून ढवळून निघते.ही प्रक्रिया कशी असते याचा उलगडा करण्याचा प्रयत्न कांहीं समीक्षकांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी केला आहे.

 या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे वाचक प्रतिसाद सिद्धांत(Reader Response Theory) आणि वाचन ग्रहण सिद्धांत.पुस्तक म्हणजे संहिताच (Text) असते. ही संहिता  एक स्तरीय नसते; ते जाळेच असते आणि या जाळ्यात वाचक अडकतात किंवा अडकवून घेतात.  आयसरने प्रतिपादन केल्याप्रमाणे साहित्यकृतीच्या संहितेत काही रिकाम्या जागा असतात. अर्थात्, त्या वाचक आपल्या बुद्धीनुसार भरून टाकतो.आयसरच्या मते वाचनाचा प्रत्येक क्षण हा भूतकाळातील स्मृती आणि भविष्यकाळातील अपेक्षा यांच्यात  जे द्वंद्व   उभे राहते त्याच्या संबंधित असते.  आयसरने म्हटले आहे की  प्रत्यक्षात   या गोष्टी संहितेत नसतात.  वाचकाने त्या भरायच्या असतात.

जौशच्या  मते आपल्या काही कलाकृतीच्या संदर्भात काही अपेक्षा असतात.  ही अपेक्षांची क्षितिजे( Horizon of Expectations) नेहमी बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक काळात वाचकांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात.जौशच्या मते वाचकसमूह संहितेचा अर्थ लावतो.पॉल स्टिकर याने वाचनप्रक्रिया कशी विकसित होते याचे विवेचन केले आहे.वाचक हा वाचन करताना तीन अवस्थातून जातो.पहिल्या अवस्थेत वाचक संरचनात्मक संबंधाचा(Configuration) विचार करतो. दुसऱ्या अवस्थेत साहित्यकृतीच्या अर्थात्मक भागाचा (Recofiguration) विचार केला जातो. आणि तिसऱ्या अवस्थेत वाचकाला स्वतः विषयीचे ज्ञान,आत्मज्ञान(Self-understanding) यांचे आकलन होते.  अमेरिकन समीक्षक स्टॅनले फिश याने Is There a Text in This Class? या पुस्तकात वाचकवर्गाची  किंवा वाचक समूहाची   कल्पना मांडली.

या सर्व सिद्धांतानुसार असे दिसते की कांहीं समीक्षक वाचकाच्या वैयक्तिक प्रतिसादाला महत्त्व देतात;बहुसंख्य समीक्षक वाचकसमूहाला महत्त्व देतात.मराठी समीक्षक प्रा.रा.ग.जाधव यांनी साहित्याचे परिस्थिती विज्ञान(Ecology of Literature) ही संकल्पना मांडली.साहित्यकृती ही सजीव आहे आणि साहित्य ही समुदायवाचक कल्पना आहे असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

एक गोष्ट स्पष्ट आहे की वैयक्तिक वाचक असो किंवा वाचकसमूह असो, पुस्तकाला वाचक भेटल्यावर पुस्तक हे सजीवतेकडे वाटचाल करू लागते. यासंदर्भात अमेरिकन समीक्षकांनी म्हटले आहे की पुस्तकाला त्याचा वाचक मिळेपर्यंत कोणतेही पुस्तक हे अनेक पुस्तकांपैकी एक असते.पुस्तकाला वाचक भेटल्यावर मात्र वाचनातून सौंदर्यभाव निर्माण होतो आणि सौंदर्यभाव हा अत्यंत सुंदर असा चमत्कार आहे आणि त्याचे स्पष्टीकरण ना मानसशास्त्र करते,ना  कोणती समीक्षा करते.(  A book is a thing among things,a volume lost among the volumes that populate the indifferent universe until it meets its reader, the person destined for its symbols. What then occurs is that singular emotion called Beauty,that lovely mystery which neither psychology nor criticism can describe  ).वाचकाला जो सौदर्यानुभव येतो ते एक गूढ आहे असे म्हटले आहे आणि ते खरेही आहे.वाचकाला जो आनंद मिळतो त्यासंबंधी  प्लेटो,अॅरिस्टाॅटल,वर्डस्वर्थ,कोलरिज,टी एस.ईलियट,आय.ए.रिचर्ड तसेच संस्कृत वैय्याकरणी मम्मट  अशा अनेकांनी आपले सिद्धांत प्रतिपादन केले आहेत.त्या सर्वांचा हाच निष्कर्ष आहे की साहित्यवाचनातून असे काही मिळते की त्यामुळे वाचकांच्या मनाचे उन्नयन होते.पुन्हा एकदा हेच सिद्ध होते की पुस्तकाला वाचक भेटल्यावर पुस्तक निर्जीव राहत नाही.

यापुढे जाऊन असे म्हणता येईल की काही पुस्तके ही वाचकसमूहाला किंवा वैयक्तिक वाचकाला आपलीशी वाटतात. या आपलेपणाच्या कारणाचाही शोध घेता येईल. समाजशास्त्रात Kinship of  Spirit हा एक सिद्धांत आहे.या सिद्धांताप्रमाणे काही गोष्टी कॉमन असतील,तर  एखादे ठिकाण,व्यक्ती,वस्तू याकडे आपले मन ओढ घेते.(An inherent attraction and liking for a particular person, place or a thing, often based on some commonality).

लेखक आणि पुस्तक यांचाच विचार केला तर लेखकाला त्याच्या स्वतःच्या पुस्तकाबद्दल आपुलकी वाटणे हे अगदी नैसर्गिक आहे. नीराद चौधरी यासारखे लेखक अपवादात्मकच म्हणावे लागतील. याचे कारण असे की निराद चौधरींच्यामते लेखकाची पुस्तके ही त्याची  प्रौढ झालेली मुलेच(Grown up Children) असतात आणि एकदा पुस्तक लिहून झाले की त्या पुस्तकाचा आणि लेखकाचा संबंध तुटतो. असा विचार करणारा निराद  चौधरी हा एखादाच असेल. बहुतेक लेखक हे आपल्या पुस्तकांना आपली आवडती मुलेच मानत असणार यात शंका नाही.

वाचकाच्या बाबतीत बोलायचं झाले तर वाचकही सर्व पुस्तकांच्या बाबतीत तटस्थ राहू शकत नाही. काही पुस्तकांचेबाबतीत त्याला काहीच वाटणार नाही. काही पुस्तकांचेबाबतीत थोडे काही  वाटेल आणि काही पुस्तकांचेबाबतीत मात्र त्याला खरोखरीच आपलेपणा वाटेल आणि तीच पुस्तके त्या वाचकाची, सह्रदय वाचकाची आपुलकीची पुस्तके होतात.

पुस्तकातल्या अनुभवाशी आपल्या आयुष्यातील अनुभव काही वेळा जोडले जातात किंवा या उलट होऊ शकते.एक वाचक म्हणून आपण पुस्तकातल्या व्यक्ती, प्रसंग आपल्या आयुष्यातल्या व्यक्तींशी, प्रसंगाशी कळत नकळत जोडतो आणि या कारणामुळे ते पुस्तक आपलेसे होेते.कांही अनुभव खूप नाजूक असतात, दिसत नाहीत पण जाणवतात. एखादे पुस्तक वाचल्यावर मन ‘पर्युत्सुक’ होते,

ते का होते, कसे होते याची चिकित्सा नंतर करायची. कदाचित ‘जननान्तरसौह्रदानि” पूर्वजन्मसंस्काराची आठवण होत असेल का? या जन्मातली,सुदूर भूतकाळातील आठवण येत असेल का?

आयुष्याच्या सांदीकोपऱ्यात असंख्य सुखदुःखे, संकटे, अडचणी हा सगळा गोमकाला  जमलेला असतो.पुस्तक वाचताना, आपल्या आयुष्यातील त्या प्रसंगासारखे असणारे प्रसंग वाचनात आले तर आपण त्या पुस्तकाशीही जोडले जातो. ना.सी फडके यांचा ‘हरवली म्हणून सापडली’, या नावाचा एक लघुनिबंध आहे.किल्ली हरवली म्हणून ती शोधण्यासाठी लेखक फडके माळावर जातात आणि  तिथल्या अनेक वस्तू पाहून ते गतकाळातल्या आठवणीत रमून जातात. एखादे पुस्तक वाचताना आपल्या आयुष्यात हरविलेल्या गोष्टी आपल्याला सापडू शकतात. याबाबतीत  माझा वैयक्तिक अनुभव मी सांगू शकेन.

काही समीक्षकांनी वाचकसमूहाचा विचार केला असला तरी वाचन ही पूर्णपणे खाजगी बाब आहे असे मला वाटते. पुस्तकाचे सार्वजनिक  अभिवाचन असले तरी श्रवण हे खाजगीच आहे आणि आपल्या वाचनाची आवडनिवड आपल्याला जोखता येते आणि त्यातूनच आपली वाटणारी पुस्तके निवडता येतात.

माझ्या किशोरवयात कुमारवयात सुंदर पुस्तके वाचायला मिळाली.पाठ्यपुस्तके तर इतकी सुंदर की अजूनही ती डोळ्यासमोर येतात. चांदोबासारखी मासिके फेर धरून नाचतात. किशोरवयात वाचलेली साने गुरुजींची “सुंदर पत्रे”आठवतात.  महाविद्यालयात शिकत असताना राम गणेश गडकरी,केशवसुत, देवल इत्यादींच्या साहित्यकृती वाचलेल्या होत्या. प्रौढ वयात वाचलेले आरती प्रभू, कुसुमाग्रज,  तेंडुलकर,महेश एलकुंचवार,रवींद्र पिंगे,चिं.वि.जोशी असे कितीतरी साहित्यिक. हे सर्वच आवडते लेखक.परंतु आपुलकीची पुस्तके कोणती? असं विचारलं तर आवडता लेखक हाच निकष लावता येणार नाही.खरे तर आपुलकीचे असे निकष असतात का?असले तर कोणते?आपुलकीची पुस्तके पूर्वी वाचलेली आहेतच.ती परत एकदा वाचून या प्रश्र्नांची उत्तरे कदाचित देता येतील.

ले. सुबोध अनंत जोशी

सांगली

मो 9423661068.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments