श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ आम्हीं तो चिरंतनाचें पाईक…  ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“सर, तुमच्या शिबिरात आल्यावर आमच्या मुलाला सकाळी लवकर उठायची सवय लागेल ना?”

“सर, आमची मुलगी झोपेतून उठल्यावर अंथरुणाची घडी सुध्दा घालत नाही. तिला ती सवय लागेल ना?”

“सर, हा आमचा मुलगा भाज्याच खात नाही. हॉटेल मधलं सगळं बरोब्बर खातो. पण घरचं जेवणच नको असतं त्याला. भाज्या नकोत, फळं नकोत, आणि उपदेशही नकोत असं आहे त्याचं. तुमच्या सोबत आला तर तो भात-वरण-पोळी-भाजी खाईल ना?”

“सर, धांदरटपणा अन् विसराळूपणा कमी व्हावा म्हणून आमच्या मुलाला तुमच्या कॅम्पला पाठवायचंय बघा. “

‘अनुभूती’चे वारे वाहायला लागले आणि नोंदणी सुरु झाली की, असे कितीतरी फोन रोज सुरु होतात.

उन्हाळी शिबिरं, छंद वर्ग आणि सहली यांचा खरा उद्देश कोणता, अन् पालकवर्ग त्याकडं कोणत्या दृष्टीनं पाहतो आहे, यातलं अंतर दिवसेंदिवस वाढतच चाललंय असं वाटतं. आपल्या मुलांना आपण नेमकं काय द्यावं आणि आपल्या मुलांनी नेमकं काय शिकावं, याची खरोखरंच नेमकी जाणीव पालकवर्गाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नदीचं मूळ शोधण्याइतकं कठीण होऊन बसलं आहे. घरचं जेवण करण्याची अन् बटाटा सोडून बाकीच्या भाज्या खाण्याची सवय लागावी यासाठी उन्हाळी शिबिर लागतं? कमाल वाटते मला.

“मोबाईल फोन नसेल तर मी जाणार नाही त्या सहलीला. ” इति वय वर्षे १५..

“आई, तुला माहितीये ना, मला एसी लागतो. एसी असेल तरच जाईन मी ट्रेकला. “असं एका मुलानं घरी ठणकावून सांगितलं. (आता महाराजांच्या गडकोटांवर एसी कुठून आणायचा?)

“त्याला नं कालवलेला भात लागतो पानात. रोज पनीर लागतं. सकाळी एक डबल ऑम्लेट आणि एक बॉईल्ड एग लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमोडची आणी गरम पाण्याची आंघोळीची सोय हवी. तुमच्या कॅम्पमध्ये या गोष्टी मिळतील ना?” असाही एका आईचा फोन होता.

काही जण तर इतके धन्य असतात की, त्यांचा शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर जाहीर नागरी सत्कारच केला पाहिजे. एका पालकांचा चौकशीसाठी फोन आला. “मुलं रोज कुठं कुठं राहणार आहेत, काय खाणार आहेत, किल्ल्यावर कोणत्या ठिकाणी आहेत याचं जीपीएस लोकेशन तुम्ही पालकांना दर तासातासाला पाठवलं पाहिजे. त्याशिवाय आम्हाला कळणार कसं?” हे ऐकताच मी धन्य झालो.. पण समोरुन सुलतानढवा चालूच राहिला.

“गडाच्या पायथ्याला राहणाऱ्या माणसांच्या हातचं जेवायचं म्हणताय. पण ते ऑईल कुठलं वापरतात, धान्य कुठलं वापरतात हे तुम्ही माहिती करुन घेता का ? ते लोक सॅनिटायझर तरी वापरत असतील का? स्वयंपाकाला कुठलं पाणी वापरत असतील? आणि अल्युमिनियम च्या भांड्यातच अन्न शिजवत असतील. म्हणजे ते अजूनच अनहेल्दी.. कशी पाठवायची आमची मुलं?” मी शांतपणे हा तोफखाना अंगावर घेत राहिलो. समोरचा दारूगोळा संपल्यावर फोन ठेवून दिला.

पिझ्झा हट अन् मॅकडॉनाल्ड्स संस्कृतीत वाढलेल्या अन् मिसळ खाताना बोटांना तर्रीचं तेल लागतं म्हणून टिश्यू पेपरचं डबडं शेजारी घेऊन बसणाऱ्यांना सह्याद्रीची मुलुखगिरी स्वतः करणं फार अवघड आहे.

“तुम्ही रोज रात्री पुण्यात मुक्कामी येणार ना?” हा प्रश्न तर माझ्यासाठी “गिटार वाजवून झाल्यावर रोज तारा काढून ठेवायच्या ना?” असा होता. यावर मला नेमकं काय उत्तर द्यावं हेच सुचेना. असे शेकडो फोन अन् चित्रविचित्र प्रश्न.. ! डोकं चक्रावून जातं..

या माणसांच्या जगण्याच्या कल्पना तरी काय आहेत, अन् रोजचं आयुष्य ही माणसं कशी जगत असतील, या विचारानं मन अस्वस्थ व्हायला लागतं. आज नुकतीच वयात येऊ घातलेली यांची मुलं पुढं जगतील कशी? जगाशी जुळवून घेतील कशी? यांना माणसं जोडता येतील का? दुर्दैवानं करिअर मध्ये बॅडपॅच आला तर काय करतील? असे प्रश्न पडायला लागतात. अशा कितीतरी जणांना “अनुभूती तुमच्या मुलांसाठी योग्य नाही. त्याला दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमाला पाठवा. ” असं सांगून नकार द्यावा लागला. कारण, “अनुभूती” हा आम्हीं आखलेला कार्यक्रमच वेगळा आहे. त्याचा बाजच वेगळा आहे. त्यात इतिहास आहे, शौर्य आहे, धाडस आहे, संस्कृती आहे, सामाजिक बांधिलकी आहे, जिव्हाळा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीयत्व आहे.. !

प्रभाव ही फार विलक्षण गोष्ट आहे. ती विकतही मिळत नाही आणि कुणाकडून उसनीही घेता येत नाही. आपल्याला आयुष्यात उत्तम यश मिळवायचं असेल, चांगलं व्यक्तिमत्त्व घडवायचं असेल तर, त्यासाठी उत्तम प्रेरणा हवी. आणि उत्तम प्रेरणेचा मार्ग प्रभावाच्या पोटातूनच जातो. तो प्रभाव निर्माण करणारा कार्यक्रम म्हणजेच ‘ अनुभूती’… !

खेडोपाडी राहणाऱ्या, वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या माणसांचं आर्थिक स्थैर्य भक्कम नसेलही. पण, त्यांचं त्यांच्या परंपरेशी आणि सांस्कृतिक पूर्वपीठिकेशी असलेलं नातं अजूनही कणखर आणि मजबूत आहे. चार-चार शतकांपासून ही माणसं गडांवर नांदलेली.. यांच्या पूर्वजांनी कदाचित महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेलं असेल. एखाद्या मोहिमेत हाती समशेर धरली असेल. शत्रूच्या आक्रमणांना अन् तोफगोळ्यांना तोंड देत यांनी गड झुंजवला असेल. कुणास ठाऊक.. पिंपळाचं झाड शेकडो वर्षं जुनं असलं तरी त्याच्या प्रत्येक पानाची वंशावळ, कारकीर्द अन् चरित्र कुणी लिहीत बसत नाही. ह्या माणसांच्या पूर्वजांचंही असंच आहे.

ब्रिटिश राजवटीत गड किल्ल्यांच्या अस्तित्वावरच जी संक्रांत येऊन बसली, ती काही केल्या हटायलाच तयार नाही. त्यामुळं, पिढ्या न् पिढ्या गडावर जगलेल्या या परिवारांना देशाच्या स्वातंत्र्यानंतरच खरी दृष्ट लागली. गडाच्या वस्तीकऱ्यांनाच गड सोडावे लागले. ऐतिहासिक वास्तू संरक्षित म्हणून घोषित व्हायला लागल्या. पण आज पन्नास वर्षांहून जास्त काळ उलटून गेला तरीही महाराजांच्या गडांवरची दैवतं उन्हा-पावसाचे तडाखे खात उघड्यावरच आहेत. मग त्यात कितीतरी मारुतीराय आहेत, गणपती आहेत, शिवलिंगं आहेत.

शिवाजी महाराजांच्या काळात रोजच्या रोज पुजली जाणारी देवालयं आज भग्न अवस्थेत पडली आहेत. कितीतरी गडांवर भग्नावस्थेतले नंदी आहेत. रोज संध्याकाळी देवाला दिवा लावायलासुध्दा माणसं राहिली नाहीत, सणावारांना नैवेद्य नाही. आज त्यांच्याबद्दल कुणाच्या काय भावना आहेत?

अशाच एका गडावर मुलांना घेऊन गेलो होतो. शिवाजी महाराजांनीच बांधलेला किल्ला. गडाच्या घेऱ्याशी आम्ही उभे होतो. मी गडाच्या बांधणीविषयी मुलांशी गप्पा मारत होतो. मागून पाच सात जणांचं एक टोळकं आलं. आमच्यापाशी थांबलं. त्यांना मागचा पुढचा संदर्भ काहीच ठाऊक नव्हता. सहावीत शिकणाऱ्या एका छोट्या मुलानं “पण महाराजांनी इथंच का बरं किल्ला बांधला असेल?” असा प्रश्न विचारला. मी काही उत्तर देणार तेवढ्यात “महाराज नाही, छत्रपति शिवाजी महाराज असं म्हणायचं. समजलं का?” असं त्यांच्यातल्या एकानं दरडावलं अन् खिदळत पुढं गेले. थोड्या वेळानं आम्ही चढणीच्या एका टप्प्यावरच्या मारुतीपाशी थांबलो. (हजारो माणसं गडावर येतात. सेल्फी काढून निघून जातात. पण हे मारुतीराय मात्र अजूनही उपेक्षितच राहिले आहेत. ) बघतो तर, ही मंडळी मारुतीपाशीच जेवायला बसलेली. मोबाईल फोनवर “पाटलांच्या बैलगाड्यानं घाटात केलेला राडा” सुरु होता. गौतमी पाटील बाई कशा नाचतात, याच्या सुरस कथा सुरु होत्या. अन् जेवणाच्या डब्यात अंड्यांची भुर्जी होती… ! हे सगळं मारुतीपाशी.. !

कितीतरी किल्ल्यांवर प्लॅस्टिकच्या बाटल्यांची अन् पिशव्यांची रानं माजली आहेत. कागदी प्लेट्स, कागदी कप, वेफर्सची पाकीटं पडलेली असतात. “संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. ” असं आज्ञापत्रात म्हटलंय, ते कितीजणांनी वाचलंय ? गडकिल्ले हे प्रेरणास्थान आहे की पर्यटन स्थळ आहे ? याचा निर्णय व्हायला हवा. “आम्ही गडांवर जातो” हे सांगणं सोपं आहे. पण तिथं जाऊन आम्ही काय केलं, कसे वागलो हेही सांगितलं पाहिजे. महाराजांची दौलत राखायची म्हणजे नेमकं काय करायचं ? हे समाजाला सांगायला हवं.

“हर हर महादेव” या गर्जनेचा अर्थ समजून घेताना उगवत्या पिढीला त्यांची जबाबदारी शिकवण्याचं सुध्दा दायित्व आहेच ना. म्हणूनच, “अनुभूती” येणाऱ्या एकाही मुलाकडं प्लॅस्टिकचं काहीही सापडणार नाही. प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कागद गडांवर न्यायचेच नाहीत, हा नियम गेली १८ वर्षं ‘अनुभूती’ नं कटाक्षाने पाळला आहे. उलट, गड किल्ल्यांवर असा कचरा दिसला तर, तो गोळा करुन पायथ्याला आणण्याचं काम सुध्दा मुलांनी केलं आहे.

“महाबळेश्वर, खंडाळा, पाचगणी आलो होतो म्हणून सहज फिरता फिरता प्रतापगडावर आलो. कांद्याची गरमागरम भजी खाल्ली, चहा घेतला आणि आता निघालो परत. ” अशी कितीतरी माणसं तिथं रोज भेटतील. पण तिथं राजांनी अफजलखानाशी युद्ध करताना जी योजना केली होती, त्याचा नकाशा लावलेला आहे, तो कुणी पाहत नाहीत. किंबहुना त्यांच्या ते गावीही नसतं. ढालकाठीपाशी जाऊन फोटो काढणं एवढंच डोक्यात असतं. कुल्फी खात खात तटावरून फिरायचं अन् नंतर कुल्फीची काडी तिथंच फेकून द्यायची, ही लोकांची स्वाभाविक सवय आहे. बुरुजांच्या जंग्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या खुपसणं, हे तर कॉमन आहे.

पुस्तकी शिक्षण घेऊन साक्षर होता येईल. पण आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व जतन करण्याच्या साक्षरतेचं काय? तिथल्या निसर्गाच्या जोपासनेचं काय ? तिथल्या लोकजीवनाचं काय ? याचा विचार आणि भान घडत्या पिढीच्या मनात रुजवलं पाहिजे.

एखाद्या गडाच्या पायथ्याच्या वस्तीतल्या अंगणात रात्री जा. तिथली भाकरी-भाजी अन् वाफाळत्या भाताचं जेवण करा, आणि आकाशाकडं बघत बघत तिथंच अंगणात पथारी पसरून ताणून द्या. पडल्या पडल्या जी झोप तिथं लागते ना, तिला ‘सुखाची झोप’ म्हणतात. दुपारच्या सुमारास बांधावरच्या एखाद्या आंब्याच्या झाडाखाली बसून तर बघा. सूर्य उतरणीला लागला की, त्याच्या केशरी प्रकाशात एखाद्या ओढ्यात मनसोक्त डुंबून बघा. ऑनलाईन गेम्स खेळण्यापेक्षा एखाद्या वाडीतल्या मुलांसोबत कोंबड्या पकडून डालग्यात कोंबण्याचा खेळ खेळून बघा. रात्री मारुतीच्या देवळात भजनाला जा. तुम्हाला असं काहीतरी नक्की गवसेल, जे कदाचित शब्दांत व्यक्त करता यायचं नाही. पण जो आनंद आणि समाधान तिथल्या वास्तव्यात मिळेल, तो कुठल्याही मॉलमध्ये नाही मिळणार, हे नक्की.

असा आनंद, उत्साह घरबसल्या मिळणार नाही. त्यासाठी घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडायला हवं अन् मोकळेपणानं स्वतःला निसर्गाशी जोडता यायला हवं. आपलं शहरी शहाणपण सोडून देऊन प्राणी, पक्षी, झाडं, वेली, जंगलं, लेणी, मंदिरं यांच्या सानिध्यात रहायला हवं. आपल्या मुलांना मुक्त करुन पहा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला बहराची जी नवी पालवी फुटेल ना, ती शब्दातीत असेल…!

(चित्र साभार फेसबुक वाल – श्री मयुरेश उमाकांत डंके)  

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानस तज्ज्ञ, संचालक- प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे. 

मो 8905199711

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments