सुश्री सुनिता गद्रे
☆ आधुनिक गुराखी… सौ.सुवर्णा कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆
आत्ताच्या पिढीला “गुराखी” हा शब्दही माहीत नसेल. पण श्रीकृष्ण कथा ऐकली असेल तर श्रीकृष्ण गुरं हाकायला रानात जात असे आणि त्याच्या बासरी वादनाने गाई गुरं मंत्रमुग्ध होऊन आवाजाच्या मागे मागे जात वगैरे आपण वाचलेलं आहे.
पण आता ना इतकी गुरं ढोरं राहिली, ना कृष्ण अन् त्याची बासरी.
पण इथे ऑस्ट्रेलियात मात्र विस्तीर्ण पसरलेली कुरणं, हजारोनी गुरं ढोरं.
पण ती हाकायला माणसंच नाहीत. इतकी वर्ष मोटार सायकल वर बसून तीन चार माणसांकडून 3000 हेक्टर वर हे काम करून घ्यायचे. .पण शांतपणे चरणा-या गुरांना ऊंच सखल प्रदेशातून फिरताना बरेच वेळा मोटर सायकल वरून गुराखी पडायचे, गुरं दगावायची. सोबत एखाद दोन कुत्रीही सोबतीला द्यायला लागायची. हे सगळं ड्रोननी टाळलं गेलं. एका कळपातून हाकून मूळ जागी परत आणणे, परत दुसरा कळप असे करता करता दूर दूर जावं लागणा-या दुचाकीस्वार गुराख्यालाच घरी जेवायला येता यायचं नाही. ऊंच सखल प्रदेशातून फिरताना बरेच वेळा मोटर सायकल वरून गुराखी पडायचे, गुरं दगावायची. हे सगळं ड्रोननी टाळलं गेलं.
मग आणले हेलीकाॅप्टर… पण ते प्रकरण तसं खर्चिक. श्रीमंत मालकांनाच ते परवडायचं.
आपल्या भारतात आत्ता आत्ता कुठं तुरळक ड्रोनचा वापर शेतीत औषधं फवारणीसाठी होऊ लागला आहे. बाकी सगळे ड्रोन हे एकतर भारतीय सैन्याचे नाहीतर लग्नाच्या रिसेप्शनच्या शूटींगचे.
पण इथे जगात प्रथमच एकाने ड्रोननी गुरं हाकायची ठरवली, त्यासाठी साॅफ्टवेअर तयार करवून घेतली आधी ती उडवून प्राणी दिलेल्या कमांड ऐकतात का ते तपासलं आणि हळूहळू त्याचा वापर वाढवत वाढवत हजारोंचा कळपच्या कळप हॅक् हॅक् न करता, पाठीवर दंडुका न मारता , हवा तसा, हव्या त्या दिशेला, थांबा म्हणलं की थांबणारा, घराकडं चला म्हणल्यावर मुकाट माघारी फिरणारा असा Drone चा भन्नाट वापर सुरू केला आहे. शेतक-यांना त्याचा उपयोग कसा करायचा याचं प्रशिक्षण देत आहे. हातासरशी गेलाच आहे ड्रोन 35 मीटर ऊंच तर कुठे पीक किती वाढलं आहे, पाणी आहे शेतात की घालायला हवंय हे सगळं एका जागेवरून ठिम्म न हालता ड्रोनवरील हातसफाईने करत आहे. गुरांची संख्या पण मोजता येते, आसपास एखादा कोल्हा आला तर त्याला हा ड्रोन हुसकावतो सुध्दा. हेलीकाॅप्टरच्या आवाजापेक्षा गाईंना ड्रोनचा आवाज सुसह्यही वाटतोय. त्यांना ड्रोनचा आवाज ऐकला की वाटतं कुठला तरी किडा गुणगुणतोय.
आता पुढचा प्रयोग हे सगळे आख्या जगातून जिथे कुठे इंटरनेट, GPS आहे अशा कुठूनही करता यायला पाहिजे याची चाचपणी सुरू आहे.
या प्रयोगशील शेतक-याची एकच व्यथा आहे ती म्हणजे त्यांचे संरक्षण खाते, सरकार पटापटा परमिशन देत नाही. खरेतर सरकारही अजून ह्या बद्दल तितके जागरूक नाही शिवाय अशा वापरास ऊठसूट परवानगी दिली तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोनचा गैरवापर तर होणार नाही ना हे अजमावून पाहात आहे.
पण एकंदरीत उपयोगिता बघता, हळूहळू का होईना पिझ्झा डिलीव्हरी साठी ड्रोनच्या वापरापेक्षा ह्या अशा उपयुक्त कांमासाठी, जिथे आधीच मनुष्यबळ खूप कमी आहे आणि चराऊ कुरणं नजर ठरत नाही इतकी दूर आहेत, तिथे परवानगी द्यायच्या विचारात सरकार आहे. हेक्टरी फक्त एक डाॅलर खर्च येत असेल तर शेतकरी आग्रह धरणारच ह्या सुविधेचा. पैसा, वेळ, श्रम वाचणा-या या सुविधेचा लाभ हळूहळू वाढणार आणि ” Technology – शाप की वरदान ” अशा निबंध लिहीणा-यांना
” वरदान ” मुद्दा पटवायला हा एक किस्सा लिहीता येणार .
गाईंच्या गळ्यातील घंटांचा मंजूsssळ नाद,
सांज ये गोकुळी,
धूळ उडवीत गाई निघाल्या
असं काही नसलेल्या देशात
ड्रोन हाच गुराखी!
— समाप्त —
लेखिका – सुवर्णा कुलकर्णी
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈