सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

आठवणीने विसरा…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परवाच माझी मैत्रिण सांगत होती कि तिच्या कोणालातरी अल्झायमर झालाय. आता त्यांना कोणी आठवत नाही.त्यामुळे त्या कोणाला अोळखत नाहित.•••• वगैरे वगैरे•••• आणि मग विसरणे हे एवढ्या भयंकर थराला जाऊ शकते असे कळल्यावर अंगावर सर्रऽऽऽकन काटा आला.

मग विचार आला का हा असा आजार निर्माण झाला असेल? मग त्यावर उपाय म्हणून स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय सांगितले जातात. बदाम खा•••• अक्रोड खा•••• वगैरे उपचार सांगितले जातात;आणि शेवटपर्यंत प्रयत्न केले जातात.पण शक्यतो अशा व्यक्तींना परत फारसे काहिच आठवत नाही.

आता डॉक्टर तज्ञ यावर अनेक उपाय सांगतात पण मला उगीचच एक विचार डोक्यात आला•••• मनुष्य केव्हा एखादी गोष्ट विसरतो? तर एखाद्या गोष्टीला खूप दिवस झाले असतील; त्या गोष्टींशी पुन्हा पुन्हा संपर्क येत नसेल तर मनुष्य ती गोष्ट विसरून जातो. जसे लहानपणी घोकून घोकून पाठ केलेली स्तोत्रे गाणी आपल्याला आता आठवत नाहित पण कोणी म्हणायला सुरुवात केली तर अधून मधून ते आपल्याला आठवू लागते. याच्या उलट जर आपण कधी कोणाशी भांडले असू एखाद्याने आपला अपमान केला असेल किंवा एखादी चांगली घटना घडली असेल तरी ती गोष्ट आपल्याला काही केले तरी विसरता येत नाही. कोणाचा प्रेमभंग झाला असेल तर ते प्रेम त्याला विसरणे शक्य नसते; आणि मग असे वाटले ज्या गोष्टी अापण अगदी मनावर घेतो ज्या गोष्टींमुळे आपल्या हृदयाला काळजाला थरार जाणवला असेल अशा गोष्टी आपण कधीच विसरत नाही.

मग ज्यांना विसरण्याचा आजार झालाय त्यांचे काय? तर ते लोक फार भावूक असावेत.प्रत्येक गोष्ट ते मनावर घेत असावेत. म्हणूनच सगळ्याच गोष्टी ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग हे लक्षात ठेवण्याचे पोते ताणून ताणून भरले की मग काही गोष्टी अगदी तळाशी जाऊन बसतात.काही गोष्टी  इतर गोष्टिंच्या मधे जाऊन बसतात.मग त्या गोष्टी कितीही महत्वाच्या असल्या तरी वेळेवर त्या आठवत नाहित. मग ही एक प्रकारची सवय लागून जाते; आणि त्याचे रुपांतर अशा भयंकर रोगात होत असावे.

त्यामुळे मला यातून मार्ग काढताना जाणवले जर आपण अगदी महत्वाचे आहे तेच लक्षात ठेवले आणि जे अनावश्यक आहे,ज्याने आपल्याला त्रास होईल अशा गोष्टी जाणिवपूर्वक विसरल्या तर? म्हणजे कोणी आपल्याशी भांडले असेल कोणी आपल्याला त्रास दिला असेल तर असे प्रसंग आपण विसरायला शिकले पाहिजे. म्हणजेच जाणिवपूर्वक किंवा आठवणीने विसरणे हा रोग नसून ती एक कला आहे. आणि हिच कला प्रत्येकाने अंगिकारायला पाहिजे असे वाटते.

म्हणजे बघा हं•••• जर आपण ज्या गोष्टी महत्वाच्या नाहित त्रासदायक आहेत अशा गोष्टी पुढच्या क्षणी विसरायचे ठरवले तर मनामड्ये चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला जागा शिल्लक राहिल. एक वाईट गोष्ट विसरली कि पुढच्या दहा चांगल्या गोष्टिंसाठी जागा होईल. मग चांगल्या गोष्टी आठवत राहिल्या तर मन प्रसन्न राहिल. अर्थातच त्यामुळे आरोग्य चांगले राहिल••••

आपण आपल्या घरातूनही जुने फाटके कपडे काढून फेकून देतो तेव्हा नवे चांगले कपडे ठेवण्यासाठी कपाटात जागा होते. घरातील जुन्या वस्तू जेव्हा बाहेर काढतो तेव्हा नव्या वस्तूंचा उपभोग आपल्याला घेता येतो•••• तसेच आपण आठवणीने काही गोष्टी विसरू या.म्हणजे चांगल्या गोष्टी आपोआपच लक्षात राहतील.मग म्हणूया खरच विसरणं ही एक कला आहे•••• ती आत्मसात करू या•••••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments