सुश्री वर्षा बालगोपाल
विविधा
☆ = आषाढी अमावस्या = ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
आज आषाढी अमावस्या! आषाढाचा शेवटचा दिवस!
आषाढघन अोथंबायच्या थांबून श्रावणसरींच्या हाती आपला वसा देणारा निसर्गाचा अद्भूत खेळ!!याच अमावस्येला लोक दिव्याची अवस म्हणतात तर कोणी गटारी अमावस्या म्हणतात.व्यक्ती तितक्या प्रवृत्ती त्यामुळे नक्की काय म्हणायचं? दिव्याची••••• का गटारी•••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं!
या दिवशी छान पुरणाची दिंड करतात. किंवा हल्ली कणकेची दिंड करून ती डाऴफळादारखी शिजवतात.आणि मग स्त्रियांना दुसरा उद्योगच नसल्याप्रमाणे त्या खायला अजून काही वेगवेगळंया पदार्थांची रेलचेल करतात. मग अशावेळी श्रावण सुरू होणार म्हणून नको इतके ढोसून गटारात पडून गाढवावरून धिंड ••••• कि घरच्या लक्ष्मीच्या हातची दिंड ••••• हे ज्याचे त्याने ठरवायचे !
उद्यापासून श्रावण सुरू होणार.सणांची उत्सवांची रेलचेल राहणार. त्यासाठी लागणाऱ्या समया निरांजने देवापुढे ठेवायची साधने घासून लखलखीत करायची. मग ही अमावस्या जाऊन प्रकाश यावा म्हणून हे दिवे उजळायचे•••• कि तुमच्या अंगातील दिवे पाजळायचे•••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं!
ह्या उजळलेल्या ज्योती किती समाधान शांती देत असतात ते खरं तरं अनुभवायचं असतं. पण या ज्योतीच्या प्रकाशात न्हायचं•••• कि मनाची अमावस्या करून घेऊन गटारगंगेत पडायचं? ••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !
दिप उजळून दिव्याचा झगमगाट दिव्याचे तेज हे सारे आनंदाने पाहून तमसो मां ज्योतिर्गमय प्रार्थना करून दिपोज्योती नमोस्तुते म्हणायचं••••• कि श्रावण येणार या नावाखाली बार किंवा चार मंडळींची टोळकी जमवून चिअर्स गीते म्हणायची••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !
आपले संस्कार आपली संस्कृती नेहमी आपल्याला चांगले शिकवत असते. त्याचे स्मरण या अशा उत्सवाच्या सणाच्या निमित्ताने करायचे असते. मग अशा छान क्षणी त्याप्रमाणे संस्कारांची दिवाळी साजरी करायची••••• कि मदिरापानाचे सोहाळे करत संस्कृतीचे दिवाळे काढायचे•••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !
त्यावरून आजच् दिव्याचं महत्व जाणून दिव्याची आरास करायची किंवा दिव्याची रोषणाई करायची ••••• कि हातात बाटली ग्लास घेऊन मदिरेची षोषणाई करायची?••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !
दिवे लाऊन अंधारावर मात करून त्यावर अधिराज्य गाजवायचे?••••• कि स्वत:ची शुद्ध हरखून झिंगत राहून घाणेरड्या अंधारात अंग माखायचं? ••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !
आधुनिक जगातआपण सारेच वावरत आहोत. काळाप्रमाणे चालायला सगळ्यांनीच शिकलं पाहिजे. पण त्याबरोबर चांगल्या वाईटाचा विचार करणारी सारासार बुद्धीही जागृत ठेवली पाहिजे. ज्या त्या वेळेचे महत्व काय आहे हे जाणले पाहिजे आणि मग अशावेळी ज्योतीने ज्योत लावून प्रेमाची गंगा वाहण्याचा मिळालेला संदेश जपायचा ••••• कि पेल्याला पेला लावून गटारगंगा दाखवणारा मार्ग धरायचा?•••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !
निसर्गाने दिलेले दोन दिवे•••• सूर्य आणि चंद्र! कालचा अंधार सूर्याच्या पहिल्या किरणाने निघून जातो आणि चंद्राच्या तेजाने अंधारही अंधार वाटत नाही म्हणून या दोन्ही दिव्यांचे आभार मानायचे•••• कि दिव्यांची गरजच नाही म्हणत स्वत: होऊन उजेड विरहित दरीत उडी मारायची ••••• हे ज्याचं त्यानं ठरवायचं !
पण मला वाटते दिवे जरी उजळत असले तरी त्यावर पण सारखे वापरून चिकटपणा घाण याचा थर जमा होत असतो. हे सगळे साफ करायला पाहिजेच म्हणजे येणारा प्रकाश काजळी विरहित प्रकाशणारी ज्योत ही अधिक तेजोमयी शांत होत असते.म्हणून देवापुढचे ,मनातले , ज्ञानाचे सारे दिवे आज धुवून लख्ख करूया आणि चांगले चकचकीत करून त्यात आशेचे तेल कर्तृत्वाची वात लाऊन हे दिप प्रज्वलीत करू या!
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈