श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ आषाढस्य प्रथम दिवसे… – लेखक – कै. आचार्य अत्रे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. त्याची आठवण झाली की कविकुलगुरू कालिदासाच्या ‘मेघदूता’मधल्या ‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्र्लिष्टसानु। वप्रक्रिडापरिणतगज: प्रेक्षणीयं ददर्श’ या अमर पंक्ती ओठावर खेळू लागतात आणि आकाशातल्या मेघाकडे सहज डोळे वळून कारण नसतानाही मेघदूतातल्या यक्षाप्रमाणे आपले हृदय एकदम व्याकूळ होते. (‘आनंदी ही विकल हृदयी पाहता मेघ दूर, तो कैसा हो प्रियजन मिठी ज्यास देण्या अधीर?’) भारतीय मनावर कालिदासाचे इतके सूक्ष्म संस्कार उमटलेले आहेत की, मानवी जीवनात अशी कोणतीही भावना किंवा अनुभव नसेल की, जिच्या उत्कट अवस्थेत रसिक आणि सुसंस्कृत माणसाच्या मुखातून कालिदासाची एखादी अन्वर्थक ओळ आपोआप उचंबळणार नाही. सौंदर्याच्या दर्शनाने आणि संगीताच्या श्रवणाने चांगला सुखी माणूससुद्धा अस्वस्थ होतो. त्याच्या मनाला एकदम कसली तरी हुरहुर वाटू लागते. त्याबरोबर ‘रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य शब्दान्। प्र्युत्सुकी भवति यत्सुखिनोऽपि जन्तु:।।’ या ओळीचे एकदम स्मरण होते. अगदी फाटक्यातुटक्या कपडय़ांत एखादी सुंदर तरुणी चाललेली बघून ‘सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यम्। मलिनपि हिमांशोर्लक्ष्म लक्ष्मीं तनोति। इयमधिकमनोज्ञा वल्कलेनापि तन्वी। किमिवहि मधुराणां मण्डन नाकृतीनाम्?’ (‘जातीच्या सुंदराला काहीही शोभते!’) या पंक्ती कोणाच्या मुखातून बाहेर पडत नाहीत? लाखात एक अशी एखादी लावण्यवती बालिका पाहिली म्हणजे ‘हे न हुंगलेले फूल, हे न हात लावलेले कोवळे पान आणि हा न आस्वाद घेतलेला मधु, परमेश्वरानं कोणासाठी निर्माण केला आहे?’ ‘न जाने भोक्तारं कमिह समुपस्थास्यति विधि: !’ हाच विचार कालिदासाप्रमाणे आपल्या मनात येत नाही काय? मनुष्याच्या भोवती ऋतुचक्राचे भ्रमण तर एकसारखे चाललेले असते. पण त्यामुळे निसर्गाच्या आणि भावनेच्या सृष्टीत जे आंदोलन होते, त्याचे मनोज्ञ स्पंदन कालिदासाच्या काव्याखेरीज इतरत्र कुठे प्रतीत होणार?
सांसारिकांच्या मन्मथाला उपशांत करणारा ‘प्रचंडसूर्य: स्पृहणीयचंद्रमा:’ असा तो निदाघकाल, कामीजनांना प्रिय असणारा ध्यानगम, ‘प्रकामकामं, प्रमदाजनप्रियं’ असा शिशिर आणि हातात भ्रमराचे धनुष्य नि आम्रमंजिरीचे बाण घेऊन प्रेमीजनांची शिकार करण्यास येणारा वसंत योद्धा यांचे अद्भुतरम्य वर्णन कालिदासाखेरीज जगात दुसऱ्या कोणत्या कवीने केले आहे? कालिदास हा श्रृंगाराचा तर सम्राट आहेच. स्त्री-पुरुषांच्या अंत:करणाचे सूक्ष्म व्यापार कोमल कौशल्याने चित्रित करण्याची त्याने कमाल केली आहे! तथापि पुरुषांपेक्षाही स्त्रीहृदयातील प्रणयाच्या लपंडावाचे त्याला जेवढे आकलन आहे, तेवढे शेक्सपिअरलादेखील नसेल. स्त्रिया प्रेम कशा करतात? कालिदास सांगतो, ‘स्त्रीणामाद्यं प्रणयवचनं विभ्रमो हि प्रियेषु’ (स्त्रीची कांताजवळी पहिली प्रेमभाषा विलास।) आपल्या प्रियकराला बघण्याची त्यांची इच्छा असते. पण लाजेने वर डोळे उचलवत नाहीत. ‘कुतूहलवानपि निसर्गशालिन: स्त्रीजन:’; तथापि, विनय आणि लज्जामुग्ध अशा भारतीय स्त्रीच्या कोमल श्रृंगाराचे जे अपूर्व सुंदर चित्र ‘शाकुंतल’मध्ये कालिदासाने रेखाटले आहे, त्याला जागतिक वाङ्मयात तुलना नाही. पाहा. ‘वाचं न मिश्रयति यद्यपि मद्ववोभि:। र्कण ददात्यभिमुखं मयि भाषमाणे’- पण मराठीतच त्याचा भावार्थ सांगितलेला बरा. तो राजा दुष्यंत म्हणतो, ‘मी बोलत असताना ती मधेच बोलत नाही. मी काय बोलतो ते ती एकते. ती माझ्याकडे बघत नाही. पण माझ्याखेरीज दुसरीकडेही बघत नाही. ती आपले प्रेम प्रकटही करीत नाही किंवा लपवीतही नाही. पायाला दर्भाकुर रुतला म्हणून ती थांबते आणि हळूच चोरून माझ्याकडे पाहते. काटय़ाला पदर अडकला म्हणून तो सोडवण्याचे निमित्त करून ती थांबते. अन् पुन्हा मला नीट न्याहाळून बघते!’ वाहवा! जगातले सारे प्रेमाचे वाङ्मय एवढय़ा वर्णनावरून ओवाळून टाकावे असे वाटते. आणि गंमत ही की, श्रृंगाराच्या गगनात एवढय़ा उत्तुंग भराऱ्या मारूनही कालिदासाने भारतीय संस्कृतीच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत! किंबहुना कन्या, पत्नी आणि माता या तीन उदात्त अवस्थेतच स्त्री-जीवनाचे साफल्य आहे हे दाखविण्यासाठी त्याने ‘अभिज्ञानशाकुंतल’ हे अमर नाटय़ लिहिले. कन्या ही आपली नव्हे. ‘अर्थोहि कन्या परकीय एव।’ पत्नीचे कर्तव्य काय? तर- ‘गृहिणी सचिव: सखीमिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ।’ विवाहित स्त्रीचे एवढे वास्तववादी आणि काव्यमय वर्णन जगात कोणत्या कवीने केले आहे? एवढेच नव्हे तर पतीवर प्रेम करणाऱ्या स्त्रीने आपल्या पतीबरोबर सतीच गेले पाहिजे. कारण अचेतन निसर्गाचा तोच कायदा आहे. ‘शशिना सह याति कौमुदी। सहमेघेन तडित्प्रलीयते’( चंद्राच्या मागे कौमुदी जाते, मेघाच्या मागे वीज जाते. ) असा ‘सतीचा उदात्त आदर्श’ त्याने ‘कुमारसंभवा’त चितारलेला आहे. सारांश- राजाच्या अंत:पुरापासून तो पर्वताच्या शिखरापर्यंत, गृहस्थाच्या संसारापासून तो अरण्यातील ऋषींच्या आश्रमापर्यंत कालिदासाच्या प्रतिभेने मोठय़ा विश्वासाने आणि विलासाने संचार केलेला आहे. संस्कृत भाषा ही तर देवांची भाषा आहे! इतकी समृद्ध आणि सुंदर भाषा जगात दुसरी कोणतीही नसेल. पण या देवभाषेचे ‘नंदनवन’ या पृथ्वीतलावर जर साक्षात कोणी निर्माण केले असेल तर ते कालिदासाने! कालिदास हा भारताचा एकमेव सर्वश्रेष्ठ महाकवी समजला जातो. त्याच्यानंतर म्हणूनच नाव घेण्यासारखा दुसरा कवीच सापडत नाही.
‘पुरा कवीनां गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास:।
अद्यापि तत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव।।’
एकदा कवींची गणना करताना कालिदासाच्या नावाने करांगुली मोडल्यानंतर अंगठीच्या बोटासाठी त्याच्या तोडीच्या दुसऱ्या कवीचे नाव काही सापडेना. म्हणून ‘अनामिका’ हे त्याचे नाव सार्थ ठरले. भारतामध्ये अशी एकही प्रादेशिक भाषा नाही, की जिच्या वाङ्मयाला कालिदासाच्या शेकडो सुभाषितांनी भूषविले नाही. ‘मरणं प्रकृति: शरीराणाम्। विकृतिर्जीवितमुच्यते बुधै:’, ‘भिन्नरुचीर्हि लोका:’, ‘एकोहि दोषो गुणसंनिपाते’, ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’, ‘विषमप्यमृतं क्वचित् भवेत्’, ‘निसर्ग फलानुमेय: प्रारंभा:’, ‘शरीरनिपुणा: स्त्रिय:’, ‘परदु:खं शीतलं’, ‘कामी स्वतां पश्यति’, ‘अति स्नेह: पापशंकी’, ‘भवितव्यता खलु बलवती’, ‘नीचैर्गच्छत्युपरि च दशां चक्रनेमिकमेण’.. अशी किती म्हणून सांगायची?
जवळजवळ दोन हजार वर्षे झाली तरी महाकवी कालिदासाचे काव्य आणि नाटय़ काश्मीरातल्या एखाद्या रमणीय सरोवरात उमललेल्या मनोहर कमलाप्रमाणे उन्मादक आणि आल्हाददायक वाटते. भारतीय संस्कृतीमध्ये जे जे म्हणून सत्य, शिव आणि सुंदर आहे, त्या त्या सर्वाचा अद्भुतरम्य समन्वय कालिदासाच्या वाङ्मयात झाला आहे. म्हणून वाल्मीकी आणि व्यास यांच्या बरोबरीने कालिदासाचे नाव घेतले जाते. प्राचीन भारतीय संस्कृतीची तीन विविध स्वरूपे या तीन महाकवींनी प्रकट केली आहेत. भारताचे नैतिक सामर्थ्य ‘रामायणा’त आढळते, तर ‘महाभारता’त भारताच्या बौद्धिक बलाचा परमोत्कर्ष दृष्टीस पडतो. अन् कालिदासाच्या वाङ्मयात भारतीय जीवनातील सौंदर्याच्या विविध विलासांचा देदीप्यमान साक्षात्कार घडतो. म्हणून श्री अरविंद म्हणतात की, वाल्मीकी, व्यास आणि कालिदास यांच्या व्यतिरिक्त भारतामधले सारे वाङ्मय नष्ट झाले तरी भारतीय संस्कृतीची काहीही हानी होणार नाही. हिमालय, गंगा, काश्मीर किंवा अजिंठा यांचे दर्शन ज्यांनी घेतले नाही, त्यांचे भारतीयत्व ज्याप्रमाणे अपूर्ण मानले जाते, त्याप्रमाणे कालिदासाचे ‘मेघदूत’ किंवा ‘शाकुंतल’ ज्याने वाचले नसेल, त्याच्या भारतीयत्वात फार मोठा उणेपणा राहिला आहे असे समजावयाला हरकत नाही. भारतीय जीवनात कालिदासाचे स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे. कारण वाङ्मयाचा अमर सिद्धांत त्याने सांगून ठेवला आहे की, ‘भाषेची पार्वती नि अर्थाचा परमेश्वर यांचा समन्वय झाल्यावाचून चिरंतन साहित्य मुळी निर्माणच होत नाही!’ म्हणून त्या पार्वती-परमेश्वरालय कालिदासाच्या काव्यात वंदन करून हे त्याचे स्मरण संपवू.
वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।
जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ॥
लेखक : कै. आचार्य अत्रे
संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈