मराठी साहित्य – विविधा ☆ आणि तो जाड होऊ लागला… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ आणि तो जाड होऊ लागला… – लेखक – अज्ञात ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आणि तो जाड होऊ लागला…
माणूस भुकेची किंमत न करता अन्नाची किंमत करायला लागला आणि तो जाड होऊ लागला.
अनलिमिटेड थाळी किंमत वसूल होऊन वर थोडीफार खाण्याचा प्रयत्न करू लागला.
एका वेळच्या भुकेची गरज एक रोटी असताना महागडी भाजी संपविण्यासाठी जास्तीची रोटी आणि राईस मागवून खाऊ लागला.
महागड्या डिशेस खाण्याच्या नादात भरपूर लोणी तुपात घोळलेले पदार्थ बिनदिक्कत चापू लागला.
घरचा स्वयंपाक शिल्लक राहिला तरी चालेल पण हॉटेलमधली डिश चाटून पुसून संपवू लागला.
पैसे खर्च झाले तरी चालेल पण बायको माहेरी गेल्यावर पदार्थ घरी करायचे कष्ट न करता, बाहेर जाऊन खाणे श्रेयस्कर समजू लागला.
मिसळ खायला पाव आणि पाव संपवायला अनलिमिटेड तर्री हाणू लागला.
हॉटेलमध्ये संध्याकाळी भरपूर खाल्ले तरी रात्री घरी पोळीभाजी खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखे वाटत नाही म्हणून रात्री सुद्धा घरी आडवा हात मारून जेवू लागला.
हॉटेल हि गरजेची सुविधा असणे विसरले गेले आणि चैन हि माणसाची नित्य गरजेची सवय बनली.
नुसतेच खाणे बदलले असे नाही तर खाण्यानंतर चहा किंवा कॉफी बरे वाटू लागले.
जेवताना कॉल्डड्रिंक मानाचे होऊ लागले.
पूर्वीच्या जेवणाच्या ताटावरच्या गप्पा हॉटेलमधल्या टेबलावर घडू लागल्या आणि गप्पांच्या वेळे बरोबर खाण्याची बिलेही वाढू लागली.
आम्ही दोघांनी मिळून कैरीचं लोणचं केलं किंवा आम्ही दोघांनी मिळून पापड केले असे कामाचे सहचर्य कुणाकडूनच कधी ऐकू आलं नाही.
कामाच्या विभागणीत स्त्री पुरुष समानता आलेली फार क्वचित दिसली पण आळशीपणामध्ये मात्र स्त्री पुरुष समानता हटकून आली.
स्वयंपाक बिघडला म्हणून घरी बायकोला घालून पाडून बोलणारे महाभाग हॉटेलमध्ये जे समोर येईल ते माना डोलवून डोलवून खाऊ लागले आणि निषेधाची वाक्य बाहेरच्या वहीत नोंदवून ठेऊ लागले.
किंवा अगदीच घरगुती किंवा साधे हॉटेल असेल तर त्या बदल्यात दुसरा पदार्थ फुकटात मिळवू लागले.
हळूहळू स्वयंपाकाची कला घरांमधून नाहिशी होते कि काय अशी भिती वाटू लागली आहे.
कुणाला घरी जाऊन भेटणे या पेक्षा हॉटेलमध्ये भेटणे जास्त प्रशस्त वाटू लागले आहे.
कुणाच्या घरी जाणं झालंच तर चहाच्या ऐवजी कोल्डड्रिंक्स आणि नाश्त्याच्या ऐवजी ब्रँडेड चिवडा लाडू किंवा सामोसे आणि पॅटिस ऑफर होऊ लागले आहेत.
गरमागरम पोहे पाच मिनिटात करून आपुलकीने पुढ्यात ठेवणारी आईची पिढी आता पंचाहत्तरीची झाली आहे.
या गल्लोगल्ली उघडलेल्या हॉटेल्सनी तसेच महागड्या आणि स्टायलिस्ट हॉटेल्सनी आपली खाद्य संस्कृती पूर्णपणे बदलू लागली आहे.
महाराष्ट्रीय पदार्थ तर हळूहळू विस्मरणात जाऊ लागले आहेत.
कुरड्या पापड्या भुसवड्या भरल्या मिरच्या पंचांमृत आता गौरीच्या जेवणापुरत्याच आठवणीत राहिल्या आहेत आणि त्या सुद्धा ऑर्डर देऊन मागवाव्या लागत आहेत.
फोडणीची पोळी फोडणीचा भात आताशा पूर्णपणे दिसेनासाच झाला आहे.
कुणाच्याही घरी जाऊन वहिनींच्या हातची हक्काने खायची पिठलं भाकरी आता शेकडो रुपये देऊन विकत मिळू लागली आहे.
कुणाच्या घरी हक्काने जेवायला जायची सोयच राहिलेली नाही, खिशात पैसे नाहित म्हणून आलेला दिसतोय अशी शंका सुद्धा घेतली जाऊ लागली आहे.
आमच्या पिढीतल्या सर्व वहिनींना स्वयंपाक येतो याची सगळ्यांनाच खात्री आहे पण मुलांच्या पिढीमध्ये मात्र सगळंच जरा अवघड आहे.
आता सुखी संसारासाठी विवाहेच्छूक स्त्री पुरुषांसाठी किंवा नवपरिणीत जोडप्यांसाठी एकत्रित पाककलेचे वर्ग सुरू करणे अनिवार्य होऊ लागले आहे असे मला वाटते.
स्वतःपुरतातरी स्वयंपाक दोघांनाही करता यायला हवा असे माझे मत आहे.
लेखक : अज्ञात
संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈