☆  विविधा ☆ आळी मिळी गुप चिळी ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

लहानपणी छोटेमोठे कित्येक गुन्हे केले आणि ते लपवण्यासाठी आळी मिळी गुप चिळी हे शस्त्र बिनबोभाट वापरले.घड्याळ फुटलं,बरणीतला खाऊ संपवला,कधी शाळा सुटल्यावर परस्पर मैत्रीणीकडे खेळायला गेलो,कधी वहीत लाल रंगातला शेरा मिळाला, कधी वर्गाच्या बाहेर ऊभं राहण्याची शिक्षाही भोगावी लागली…पण सगळे अपराध कबुल करायलाच हवेत कां?  काही अवश्यकता नाही .”आळी मिळी गुपचिळी..” हेच मस्त. मला वाटते ,अभिनयकला ही जन्मजात देणगी प्रत्येकालाच मिळालेली असते. म्हणूनच “मला काय माहीत?” “मी काय केले.?.”असे निरागस भाव चेहर्‍यावर वागवून आळी मिळी गुप चिळी यशस्वी करता येते… पण एक प्रसंग मात्र खूप कठीण होता.

माझे आजोबा म्हणजे अतिशय शिस्तीचे.नीटनेटके.  स्वच्छता ,टापटीप वाखाणण्यासारखी असली तरी अत्यंत त्रासदायक. वस्तुंच्या जागा ठरलेल्या. एक पेन्सील जरी इकडची तिकडे झाली तरी त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटायचे नाही. मग त्यांच्या कोर्टात आरोपी म्हणून आम्हाला ऊभं रहावं लागायचं… किरकोळ शिवणकामासाठी लागणारी आजोबांची एक सुई होती.सांगितलं तर खोटं वाटेल, अतिशयोक्ती वाटेल! ती एकच सुई ते ३३वर्ष वापरत होते..वापरुन झाल्यावर लहानशा दोर्‍यासकट ते सुताच्या गुंड्यात टोचून ठेवत. त्याचीही विशीष्ट पद्धत होती आणि विशीष्ट जागाही…

एक दिवस मला काय बुद्धी झाली कोण जाणे! आजोबा घरात नसताना मी रूमाल शिवण्यासाठी ती सुई घेतली.

माझा मावसभाऊ रंजन होताच तिथे. त्याने मला फटकारलेही. भांडणच ऊकरुन काढलं आणि त्याच्याशी वाद घालता घालता ती सुई तुटुनच गेली…बाप रे!!

आता काय होणार? खालच्या मजल्यावर माझी मैत्रीण रहायची .तिच्याकडे धावत गेले.तिला सर्व सांगितले.

ती म्हणाली ,”हात्तीच्या! इतकी काय घाबरतेस..ही घे सुई.

आणि ठेवून दे तिथे..सुयांसारख्या सुया…काही कळणार नाही आजोबांना..आळी मिळी गुप चिळी…

रंजनने जमेल तशी ती गुंड्यात खोचून जागच्या जागी ठेवलीही..तेव्हढे बंधुप्रेम दाखवले त्याने….

ही आळी मिळी गुप चिळी मात्र आजोबांच्या मृत्युपर्यंत टिकून राहिली.मैत्रीणीच्या सुईने ३३वर्षांची परंपरा सांभाळली…

पण आज आठवण झाली तरी वाईट वाटतं. अपराधीही वाटतं. महत्व वस्तुचं नसतं.शिकवणीचं असतं.

संस्काराचं असतं. सांभाळणं, जपणं, बारीकसारीक गोष्टींबाबतही निष्काळजी नसणं,जबाबदारी जाणणं, हा मौल्यवान संस्कार आजोबांच्या वागणुकीतून ,अगदी सहज रुजला होता….

धन्यवाद!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

१६/१०/२०२०

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments