सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
२० मार्च, आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस! २००६ ते २०१२ या काळात संयुक्त राष्ट्रांनी एक मोहीम चालवली. २०११ मध्ये या दिवसाची कल्पना मांडली. आणि २०१३ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. याचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. यात लोकांना आनंदाचे महत्व पटवणे. आपले काम करताना आपण आनंदी असलो तर त्याचे होणारे फायदे प्रत्यक्ष दाखवले गेले. त्याच प्रमाणे विविध वेळी, विविध ठिकाणी आपण आनंदी मनोवृत्ती ठेवली तर कोणते फायदे होतात ते सांगितले गेले. त्या साठी कोणत्या कृती कराव्यात हेही सांगितले गेले. मानवी विकासासाठी आनंद किती महत्त्वाचा असतो याचेही महत्व विषद करण्यात आले.
हे सगळे करण्याची आवश्यकता का वाटली असेल? याचा विचार केला तर काही लोकांची मते, किंवा कामाच्या ठिकाणी आनंदी असणे, घरात आनंदी असणे याचा फारसा स्वीकार केला गेला नव्हता. जे आनंदी दिसत असत त्यांना नावे ठेवली जायची. आनंदाने किंवा हसऱ्या चेहऱ्याने काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे त्यांना कोणतीच गंभीरता नसते, ते कोणतेही काम नीट करू शकणार नाहीत असेही गैरसमज होते. कोणतेही काम गंभीरतेने, तणावपूर्ण केले तरच ते प्रामाणिकपणे व व्यवस्थित होते. असेही गैरसमज होते. प्रत्यक्षात काही निरीक्षणे, अनुभव व काही सर्व्हेक्षण केल्यावर असे लक्षात आले, की आनंदी मनाने काम केले तर ते अधिक चांगले होते. आणि करणाऱ्यालाही त्याचा आनंद मिळतो. आनंदाचा संबंध कल्याण व एकूण जीवनातील समाधानाशी जोडलेला असतो. ज्यांची आनंदाची पातळी जास्त असते त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असते. त्यांचे सामाजिक संबंध मजबूत असतात. प्रतिकूल परिस्थितीला ते तोंड देऊ शकतात.
आनंदाची कोणतीही ढोबळ व्याख्या करता येत नसली तरी त्यात सकारात्मकता ही भावना, उद्देशाची व परिपूर्णतेची भावना अशी मनाची स्थिती दिसून येते. अर्थात प्रत्येकाची आनंदाची व्याख्या व ज्यातून आनंद मिळतो या विषयी दृष्टिकोन भिन्न असतो. आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हा आनंद बदलत असतो. हा एक वेगळाच विषय आहे.
पण आनंदी राहिल्याने आपल्या कडून समोरच्याला नक्कीच आनंद मिळतो. त्याच्या पर्यंत त्या आनंद लहरी पोहोचतात. खरे तर ही आनंदाची भावना प्रत्येक सजीवात असते. आणि तो व्यक्त करण्याची किंवा ते आनंदी आहेत हे ओळखण्याची पद्धत वेगळी असते. हा आनंद पण असा असतो, तो आपल्याला मिळावा असे वाटत असेल तर तो दुसऱ्यांना द्यावा लागतो. म्हणजे आपला आनंद द्विगुणित होतो. आणि मग आनंदी आनंद गडे, जिकडे तितके चोहिकडे असे होऊन जाते.
आजच्या आनंदाच्या दिवसाच्या उत्सवात आपणही सहभागी होऊ या! स्वतः आनंदी होऊन इतरांनाही आनंदी करु या!
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈