श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ उगवतीचे रंग – अभिव्यक्ती स्वातंत्र्य… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होतो. जेव्हा प्रमुख वक्त्यांचे भाषण सुरु झाले तेव्हा त्यांनी मर्यादा सोडून बोलणाऱ्या आजच्या राजकारण्यांवर टीका केली. खरोखरच राजकीय नेते म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. पण त्याचे भान काही अपवाद सोडले तर आज कुठेही दिसत नाही. ते उपरोधिकपणे म्हणाले ‘ विद्या विनयेन शोभते ‘ असे एक संस्कृत सुभाषित आहे. पण बोलणाऱ्यानी एवढी खालची पातळी गाठली आहे की ते म्हणतील, ‘ ही कोण आणि कुठली विद्या ? कुठला विनय ? ‘ रोजच्या बातम्या पाहिल्या आणि त्यात राजकारण्यांनी केलेली विधाने पाहिली की याचे प्रत्यंतर येते. बातम्या सुद्धा बघू नये असे सुजाण नागरिकांना वाटत असल्यास नवल नाही.
याच व्यासपीठावरून आणखी एक वक्त्या बोलल्या. त्यांनी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक विधान केले. त्या म्हणाल्या, ‘ सुरुवातीला मला सावरकरांबद्दल प्रचंड आदर होता पण आता तो कमी झाला आहे. ‘ त्याचे कारण त्यांनी सांगितले की राहुल गांधी जर सातत्याने सावरकरांवर टीका करत असतील, तर त्यांच्या हातात काहीतरी पुरावे असल्याखेरीज ते तसे बोलणार नाहीत. आणखी एक वक्ते उभे राहिले ते म्हणाले की या बाई बोलल्या त्यात नक्कीच तथ्य आहे. आपल्याला सावरकरांच्या विरोधात कोणी बोललेलं आवडत नाही कारण तशा प्रकारची विधानं त्यांच्याबद्दल आपण ऐकलेली नसतात. पण म्हणून ते खोटं आहे असं मानायचं कारण नाही. महात्मा गांधींनी आपण केलेल्या चुकांची कबुली ‘ माझे सत्याचे प्रयोग ‘ या पुस्तकात दिली आहे. अशी कबुली देण्यासाठी फार मोठे मन लागते. याच व्यासपीठावरून मग दाभोलकर, पानसरे आणि गौरी लंकेश यांनी विरोधाची भूमिका घेतली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का ? देश धार्मिक हुकूमशाहीकडे, फॅसिस्ट वादाकडे झुकतो आहे अशी विविध विधाने केली गेली.
दाभोळकर, पानसरे किंवा गौरी लंकेश यांच्या हत्येचे समर्थन कोणीच करणार नाही आणि करू नये. कोणी वेगळी भूमिका मांडली तर त्यांची हत्या करणे हे कधीच समर्थनीय ठरू शकत नाही. ती निषेधार्हच गोष्ट आहे.
विशेष म्हणजे सावरकरांबद्दल वरीलप्रमाणे विधाने करणाऱ्या व्यक्ती या जेष्ठ साहित्यिक किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या होत्या. त्यांच्याकडून अशा प्रकारची विधाने ऐकणे हे आश्चर्यचकित करणारे आणि धक्कादायक वाटले. उथळ विधाने करणारी आणि सावरकरांच्या जीवनकार्याचा फारसा अभ्यास न करणारी एखादी व्यक्ती सावरकरांच्या विरोधात बोलते म्हणून तिचे म्हणणे खरे मानून सावरकरांचा त्याग, देशभक्ती या सगळ्याच गोष्टींवर बोळा फिरवायचा का याचा बोलणाऱ्यांनी विचार करायला हवा. महात्मा गांधींनी आपल्या ‘ माझे सत्याचे प्रयोग ‘ या आत्मचरित्रात आपण केलेल्या चुकांची कबुली दिली आहे म्हणून ते महान होत नाहीत किंवा सावरकरांनी स्वतःच्या चुकांबद्दल असे काही लिहिले नाही म्हणून ते लहान होत नाहीत. सावरकर,गांधी, नेहरू, सरदार पटेल, डॉ आंबेडकर, म. फुले यांच्यासारख्या व्यक्ती मुळात महान आहेत. या सगळ्या महापुरुषांनी आपल्या जीवन कार्यातून काय संदेश दिला हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हल्ली कोणीही काहीही बोलावे असे झाले आहे. ज्यावेळी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा समारंभात आपण भाषण करतो, तेव्हा लोकांपुढे कोणता आदर्श ठेवायचा हा खरंतर ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ज्यावेळी आपण महापुरुषांबद्दल बोलतो, त्यावेळी त्यांचे दोषदिग्दर्शन न करता त्यांच्या गुणांवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मला वाटते. गुणग्राहकता आपल्याजवळ असली पाहिजे. महापुरुष हे देखील शेवटी माणसेच असतात. त्या त्या परिस्थितीत निर्णय घेताना त्यांच्या हातून कदाचित काही चुका होऊ शकतात. पण म्हणून त्यांच्या महत्वाच्या कार्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे दोष किंवा चुकाच आपण दाखवत राहायच्या हे कितपत योग्य आहे ? अलीकडे महापुरुषांच्या कार्याचे, गुणांचे गुणगान करण्यापेक्षा त्यांच्यातील दोष दाखवण्याचा जो पायंडा पडत चालला आहे, तो भविष्यकाळाच्या दृष्टीने घातक आहे. पुढच्या पिढ्यांसमोर आपण आदर्श ठेवायचा की दोष दिग्दर्शन करायचे ? स्वा. सावरकर असोत, गांधी किंवा नेहरू असोत या सगळ्या महापुरुषांनी देशासाठी प्रचंड त्याग केला आहे, अपार कष्ट, तुरुंगवास सोसला आहे. अमुक एका महापुरुषावर टीका केली म्हणजे तो लहान होत नाही किंवा त्याच्या कार्याचे महत्व कमी होत नाही.
पुलं हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत विनोद कसा असतो हे दाखवून दिले. नाट्य, संगीत, अभिनय, दिग्दर्शन, लेखन इ कलेच्या विविध प्रांतात सहज संचार करणारा अवलिया म्हणजे पुलं. याच पुलंवर मध्यंतरी एक चित्रपट येऊन गेला. ‘ भाई -व्यक्ती आणि वल्ली ‘ या नावाचा. आपल्यापैकी बऱ्याच पुलं प्रेमींनी तो पाहिला असेल. पण या चित्रपटातून पुलंचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समोर येण्याऐवजी सतत धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे पुलं अशीच व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येते. कदाचित वस्तुस्थिती तशी असेलही आणि दिग्दर्शकाला काय दाखवायचे याचे स्वातंत्र्यही नक्कीच आहे. पण इथे पुन्हा माझ्यातील शिक्षक जागृत होतो. समाजापुढे आपण काय ठेवतो आहोत याचा विचार नक्कीच करायला हवा असे मला तीव्रतेने वाटते. वाईट गोष्टी लगेच उचलल्या जातात. चांगल्या गोष्टी रुजवायला वेळ लागतो. उतारावरून गाडी वेगाने खाली येते. वर चढण्यासाठी कष्ट पडतात. आपल्याला समाजाची गाडी प्रगतीच्या दिशेने न्यायची असेल तर योग्यायोग्यतेचा विवेक ठेवायलाच हवा. अर्थात माझे हे विचार आहेत. सगळ्यांनाच आवडतील असेही नाही याची जाणीव मला आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच !
पण जाता जाता आणखी एक सुदंर सुभाषित सांगून समारोप करू या. या सुभाषितात सुभाषितकार म्हणतो
विद्या ददाति विनयं, विनयाद याति पात्रतां ।
पात्रत्वात धनमाप्नोति, धनात धर्मं तत: सुखम ।।
ज्या व्यक्तीला खरोखरीच ज्ञानप्राप्ती झाली आहे, अशी व्यक्ती विनयशील म्हणजे नम्र असते. कुठे कसे वागावे हे अशा व्यक्तीला सांगावे लागत नाही. विनम्रतेतून योग्यता किंवा पात्रता अंगी येते. त्यातूनच मग धनाची प्राप्ती करण्यायोग्य व्यक्ती होत असते. धनाचा उपयोग करून मनुष्य धार्मिक कार्य संपन्न करू शकतो आणि त्यातूनच त्याला आनंद प्राप्त असतो. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. यात अर्थातच ज्ञानप्राप्तीचे आणि त्या खऱ्या ज्ञानप्राप्तीतून अंगी येणाऱ्या गुणांचे महत्व अधोरेखित केले आहे.
© श्री विश्वास देशपांडे,
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈