डॉ. जयंत गुजराती
विविधा
☆ उन्हाचे दिवस… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆
फाल्गुनाचा उल्लास सरला की उन्हाची काहिली सुरू होते. आसमंत तापत जातं. सावली हवीहवीशी वाटायला लागते. सूर्याच्या झळा जीव नकोसा करून टाकतात. माठाचे पाणी प्यायलो तरी तहान भागत नाही. हाश्शहुश्शचे चित्कार उमटायला लागतात. घामाच्या धारा टिपल्या जातात, तरीही पुन्हापुन्हा येणाऱ्या. वाऱ्याची मंद झुळूक सुखावणारी वाटू लागणारी. वळवाचा पाऊस गारांसह आला तर तोही हवाहवासा.
चैत्र पालवी नुकतीच झाडांच्या फांद्यांवर फूटु पाहणारी. लाल पिवळे कोंब उलून येणारे. शिशिरात झडून गेलेला पालापाचोळा नवं रुप घेऊन अवतरण्याच्या तयारीत. नूतन वर्षाचा प्रारंभ बरंच काही नवीन नवीन घडवत होणारा. चैतन्याचा स्त्रोत खळाळणारा. उत्सवाचं गाणं गुणगुणण्याचे निसर्गाने ठरवलेलं. निसर्ग बेलगाम. स्वत:ची श्रीमंती मुक्तपणे उधळण्यास आतुर असलेला. शिशिराची कात टाकून नवीन कलेवर धारण करून नूतन संवत्सराचे आगमन साजरे करणारा. एक मनस्वी कलाकार.
निसर्गाचे यौवनात पदार्पण झाले की मनुष्यही त्यापासून वेगळा राहू शकत नाही. तोही वसंताच्या आगमनाचे स्वागतच करतो. चैत्री पाडव्याला गुढी उभारून नव्या युगाला कवेत घेण्यास उत्सुक होतो. निसर्गाने भरभरून दिलेले धान खळ्यावरून दारी आलेले. केलेली मेहनत फळाला आलेली. दोन पाच कवड्या हाताशी येणार याची चाहूल सुखावणारी. कोठारे उतू गेली की समाधानाची लकेर डोळ्यात चमकणारी. मुलीला उजवायचं असतं. घरच्या लक्ष्मीसाठी थोडंथोडकं का होईना हिरण्य घ्यायचं असतं. तिचा राबता हात सोन्याच्या कंकणांनी सुशोभित करायचा असतो. तिलाही समाधानाचे दोन क्षण गवसून द्यायचे असतात. मग बहावा फुलतो. सोनेरी स्वप्नांच्या राशी घेऊन.
तप्त उन्हाच्या झळा शमविण्यासाठीच जणू मोगरा उमलतो. शुभ्र व गंधित. आसमंत दरवळून सोडणारा. हातात घेतला तर त्याचा गंध हातांनाही आपलेसे करणारा. वेडावून टाकणारा. अल्प काळासाठी का होईना आपलं अस्तित्व जाणवून देणारा. तयाचा वेलू गेला गगनावरी असं ज्ञानरायांनाही भूरळ घालणारा मोगरा. कधी देवादिकांच्या शिरी स्थानापन्न होणारा वा रमणींच्या केशकलापात विसावणारा. पाकळ्या पाकळ्यांतून ताजेपणाचे विभ्रम सादर करणारा. वसंता बरोबर ग्रीष्मातही टिकून राहणारा मोगरा. एक शीतल व सुगंधित शिडकाव्याचे मूर्तिमंत स्वरूप. त्या निळ्या आभाळातील किमयागाराचे कसे मानू आभार!!
मोगरा तसा एकटा नसतो सोबत रातराणीला ही त्याने आणलेलं. चैत्र वैशाखाच्या वणव्यात पामर मानवाला हळुवारपणाचा दिलासा देण्यासाठीच ही योजना परमेश्वराने केली असावी. रात्रभर फुलून येणारी रातराणी लावीन वेड जीवा या स्वप्नातल्या कळ्यांसह सोबत देत राहते.
पळस फुलांचा केशरी बहर ओसरू लागला की गुलमोहोर आपले रक्तवर्णी रूप घेऊन उभा ठाकतो. फांदीफांदीवर आपल्या जखमा घेऊन आलेला. चिरंतन काळापासूनच्या वेदना उघड करणारा. आतापर्यंत जपून ठेवलेली ठसठस फांदीफांदीतून व्यक्त करणारा. कुठून कसा मोकळा होऊ या घालमेलीत एक अख्खं वेदनांचे झाडच उभे ठाकलेले. तप्त ग्रीष्मातच फुलून येण्याचं प्राक्तन. दुपारची उन्हे सरली की पायाशी सडा ओल्या जखमांचा. सगळंच दुखणं रितं करून टाकण्याचे जणू ठरवलेले त्याने आणि त्यासाठी निवड केली ग्रीष्माचीच. होरपळलेल्या क्षणांचा ही बहर होऊ द्यावा ही संकल्पना तडीस नेणारा गुलमोहोर. एक घायाळ रूतणारं, खुपणारं काव्य.
उन्हाचे दिवस तापू लागले की अवघं जग थंडाव्यासाठी आसुसलेलं. उन्हाच्या झळा वाहू लागल्या की कडूनिंबाची सावलीही गोड वाटू लागते. अंमळ विसाव्यासाठीचे हक्काचे ठिकाण. घटकाभर विश्रांति घेतली की तजेलपणा घेऊनच कडूनिंबाच्या सावलीतून बाहेर पडावं. चैत्र पालवीचे वैभव मिरवत पांथस्थांना गारवा देण्याचे पुण्यकर्म गाठी बांधणारा कडूनिंब आपला सखाच.
हेमंताच्या गारठ्यात आलेली आम्रमंजिरी आता फळाला आलेली. कच्या कैरीचं पन्हं तहान शांतवणारं. पुढे रसाळ आंब्याची चाहूल देणारं. ग्रीष्मातच येणारे करवंद, जांभळे, आंबटगोड असणारी गारसेल चिंच, पिवळे धम्मक रायण, रसरशीत ताडगोळे व पांढरे जांबू, निसर्ग काही कमी करत नाही. कमी पडू देत नाही. तो आपला देतच असतो. किती घेशील दो कराने ही आपली अवस्था. ऋतुचक्राचे हे तप्त पर्व आपणास सुखावह जावो. ऋतु चक्रातील प्रत्येक घटक महत्वाचा आणि म्हणूनच छोट्याशा अबोलीचा विसर पडू नये. छोटी नाजूक अबोली फुलास येते जेव्हा इतर फुलांचा बहर ओसरू लागतो. तेव्हा तिचीही दखल घ्यायलाच हवी. नाही का? आणि हो, दिवसभर उन्हाची काहिली सहन केल्यावर गारवा अनुभवून देणारी, कसा विसर पडेल तिचा? तिच चैत्र यामिनी…
© डॉ. जयंत गुजराती
नासिक
मो. -९८२२८५८९७५ , ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈