श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

उगवतीचे रंग –  लॉरेन्सबाई, तुमचे चुकलेच..! ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

परवा पेपरमध्ये ( संदर्भ – महाराष्ट्र टाइम्स २४ जून २०२४ ) एक बातमी वाचली. प्रथम वाटलं आपलीच तर वाचण्यात काही चूक होत नाही ना ? म्हणून ही बातमी दोनदा वाचली. पण ती खरीच होती. माझीच समजून घेण्यात काहीतरी चूक होत होती. बातमी अशी होती, ‘ पूर्ण पगार देऊन काम न दिल्याने खटला. ‘ आता बातमीचं हे शीर्षक तुम्ही वाचलं तरी तुमचीही माझ्यासारखीच अवस्था होईल. कारण आपल्याकडे असा खटला कोणी भरण्याची सुतराम शक्यता नाही. बातमी अशी आहे. ‘ फ्रान्समधील एका महिलेने कंपनीला कोर्टात खेचले. सलग वीस वर्षे कोणतेही काम न देता पूर्ण पगार देऊन बसवून ठेवल्याबद्दल एका दिव्यांग महिलेने फ्रेंच टेलिकॉम कंपनी ‘ ऑरेंज’  विरोधात खटला दाखल केला आहे. या महिलेचं नाव आहे ‘ लॉरेन्स व्हॅन वॅसेनहॉव. ‘ ( याविरोधात कंपनीचं म्हणणं आहे की त्यांच्या सततच्या आजारपणामुळे आणि रजा घेण्यामुळे त्यांना काम देता आले नाही तर लॉरेन्सबाई म्हणतात की कंपनीने काही काम न दिल्याने त्यांची व्यावसायिक प्रगती खुंटली. आता यात न्यायालय काय निकाल द्यायचा तो देईल. आपल्याला त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. )

आता मला सांगा लॉरेन्स बाईंचे हे चुकले नाही का ? कंपनीने काम नाही दिले म्हणून काय झाले ? पूर्ण पगार तर दिला ना ! त्यातही या बाई दिव्यांग ! तरी त्यांनी असे म्हणावे ? आपल्याकडे तर काही मंडळी काम नको म्हणून दिव्यांग असल्याचा दाखला मिळवतात असेही ऐकिवात आहे. खरं म्हणजे ‘ असा दिव्यांग दाखला ‘ मिळवताना त्यांना केवढा त्रास होत असेल, संबंधितांना कदाचित काही पैसेही द्यावेही लागत असतील.  पण त्या बिचाऱ्यांचा विचार आपल्याकडे केला जात नाही.

आपल्याकडील नोकरी करणाऱ्या महिलांना जर लॉरेन्सबाई भेटल्या तर काही महिला त्यांचा हेवा करतील. त्यांना म्हणतील, ‘ तुमचे मागील जन्मातील काहीतरी मोठे पुण्य असावे हो. नाहीतरी अशी नोकरी ( काम न करता पूर्ण पगार देणारी ) कोणाला मिळते का ?

योगायोगाने याच मी महिन्यात युरोप ट्रीपसाठी गेलो होतो. त्या दौऱ्यात फ्रान्सचा समावेश होता. पण मला या लॉरेन्सबाईंची ही बातमी आताच इथे आल्यावर कळली. तिथे कळली असती तर या बाईंचा पत्ता शोधून मी त्यांना भेटायला गेलो असतो. त्यांना तुम्ही चुकता आहात अशी जाणीव करून दिली असती आणि त्या कंपनीविरुद्धचा खटला मागे घ्यायला लावला असता. पण एवढे महान कार्य आमच्या हातून होणे नव्हते. मला तर या काम न देता पगार देणाऱ्या कंपनीचा जाहीर सत्कार करावा असे वाटते. अशा कंपन्या भारतात येतील तर आमची केवढी सोय होईल ! बेकारी दूर व्हायला मदत तर होईलच पण आमच्याकडील सज्जन आणि प्रामाणिक माणसे अशा कंपनीला कोर्टात अजिबात खेचणार नाहीत. उलट आमच्याकडील माणसांसाठी ही सुवर्णसंधी ठरेल.

अरे कंपनीत काम नसले म्हणून काय झाले ? त्या ठिकाणी आम्हाला आमच्या मनाने पुष्कळ काही करता येईल. पूर्वी महिला देवळात कीर्तन प्रवचन वगैरे ऐकायला जायच्या. त्यावेळी त्या ते प्रवचन ऐकता ऐकता वाती वळत असत असे ऐकले आहे. आता आजच्या जमान्यात वाती वगैरे वळण्याचे काम राहिलेले नाही. पण ऑफिसमध्ये बसून विणकाम करणे, नवनवीन पदार्थांच्या रेसिपी शिकणे, मैत्रिणींशी फोनवर गप्पा किंवा चॅट करणे आम्ही सहज करू शकतो. त्या काळात आम्ही नवीन काही शिकू शकतो. अर्थात नवीन काही शिकलंच पाहिजे असं काही कंपनीचं बंधन असणार नाही. फक्त वेळेत येणं आणि वेळेत जाणं एवढंच आम्हाला करावं लागेल. ते आम्ही आनंदानं करू. अर्थात या सगळ्यांना गोष्टींना काही मोजके अपवाद असतीलही. त्यांना असं काम न करता पगार घेतलेला आवडणार नाही. पण आपण त्यांचा विचार कशाला करायचा ! लोकशाहीत बहुमत फार महत्वाचे !

तेव्हा तुम्हाला म्हणून सांगतोकी ही लॉरेंसबाई जर यदाकदाचित भारतात आलीच तर ते आम्हाला मुळीच आवडणार नाही. अरे, पूर्ण पगार देऊनही तक्रार करते म्हणजे काय ? शिवाय कोणतेही काम न करता. स्वातंत्र्यपूर्व काळात वसाहतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी सायमन कमिशन भारतात आले होते. त्यांना भारतीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकांनी ‘ सायमन गो बॅक ‘ अशा घोषणा दिल्या. तसेच काहीसे या लॉरेन्सबाई भारतात आल्या तर होऊ शकेल. ‘ लॉरेन्स गो बॅक ‘ असे फलक चौकाचौकात लागतील.

मागे अशीच एक बातमी मी पेपरमध्ये वाचली होती. जपानचा राजा वृद्ध झाल्याने  त्याने निवृत्तीची घोषणा केली. जपानमध्ये आता राजेशाही नसली तरी राजघराण्यातील व्यक्तींना मान दिला जातो. अगदी इंग्लंडप्रमाणेच. तर त्या जपानच्या राजाने निवृत्तीची घोषणा केली. आता मला सांगा वय झाले तरी हाती असलेली सत्ता सहजासहजी सोडून कोणी असे निवृत्त होतो का ? आपल्याकडे तर निवृत्तीच्या वयात जरा जास्तच उत्साहाने कार्यरत राहणारी मंडळी पाहिली की मन कसे अभिमानाने भरून येते. त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला देणारांना ते वेड्यात काढतात. संगीत शारदा नाटकातल्या प्रमाणे ‘ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान..’ त्या काळात पाऊणशे म्हणजे पंचाहत्तर वर्षे वय असले तरी ती व्यक्ती नवरदेव म्हणून लग्नासाठी तयार असायची. आता लग्नाचं जाऊ द्या हो पण राजकारणात तरी वयाचं ऐशीवं दशक ओलांडलं तरी सत्ता सोडण्याची आमची इच्छा नसते. तेव्हा त्या जपानच्या राजाला काय म्हणावं ? बरं, खरी गंमत पुढेच आहे. त्या राजाचा मुलगा त्याचा वारस म्हणून त्याच्या गादीवर बसला. या आनंदाप्रीत्यर्थ जपान सरकारने लोकांना चक्क दहा दिवसांची सुटी जाहीर केली होती.

आपल्याकडे तर अशा निर्णयाचं मधुकर तोरडमलांच्या भाषेत सांगायचं तर मोठं हे केलं असतं, मोठा हा केला असती आणि मोठी ही केली असती. मोठं स्वागत केलं असतं, मोठा आनंद साजरा केला असता, मोठी मजा केली असती. फटाके फोडून स्वागत झाले असते. पर्यटनस्थळे फुल्ल झाली असती. त्याला जोडून लोकांनी अजून एकदोन आठवड्यांच्या सुट्ट्या घेतल्या असत्या. पण हे जपानी लोक सुद्धा त्या फ्रान्समधल्या लॉरेन्सबाईसारखे. त्यांना जपान सरकारचा हा निर्णय अजिबात आवडला नाही. या दहा दिवसात करायचे काय असा वेडगळ प्रश्न त्यांना पडला. या काळात उद्योग ठप्प होतील, उत्पादन बंद पडेल, देशाचे आर्थिक नुकसान होईल असा विचार त्यांच्या मनात आला. त्या सुटीऐवजी त्यांना ज्यादा काम करून तो आनंद साजरा करायला आवडले असते असेही काही जण म्हणाले. आपल्याकडे अशा लोकांना आपण मुर्खांच्या गणतीत काढू. चांगली दहा दिवस सुटी मिळाली. मस्त फिरायला जायचे किंवा आराम करायचा. मनसोक्त खायचे प्यायचे आणि एन्जॉय करायचे. काम तर नेहमी असतेच ना !काही लोकांना असे वाटते की फ्रान्स, जपान यासारख्या देशांची प्रगती लोकांच्या अशा दीर्घोद्योगी वृत्तीमुळेच झाली आहे. पण केवळ सुधारणा, प्रगती, देशहित यांचा सततच विचार किती करीत राहायचा ? आम्हाला आमचे काही वैयक्तिक आयुष्य आहे की नाही ? आम्ही हौसमौज तरी केव्हा आणि कशी करायची ? छे ! छे ! लॉरेन्सबाई तुमचे आणि जपानी नागरिकांचे  हे चुकलेच !

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments