श्री अरविंद लिमये
☆ विविधा ☆ उंबरठा.. घराचा आणि मनाचाही..! ☆ श्री अरविंद लिमये ☆
घराची दारं जशी संरक्षक कवचं, तसाच उंबरठा त्या दारांचा भक्कम आधार. दारं घट्ट मिटून निश्चिंत होतात दारांच्याच चौकटीच्या भरवशावर, पण त्या चौकटीला स्वबळावर तोलून धरत असतो तो उंबरठाच..!
उंबरठा एका क्षणकाळा साठीचाच पण अडसर असतो येणाऱ्या आणि जाणाऱ्यां साठीही. योग्य विचारांसाठीचा एक थांबा..! या थांब्याची सवय, सराव असणारी पावलं न अडखळता निश्चिंत मनानं जा ये करीत असतात अगदी सहजपणे तिथं क्षणभर थांबून, पण त्या त्या वेळी उंबरठा असतोच प्रत्येकाच्या मनात, जाणाऱ्या आणि येणाऱ्यांच्याही, ठाण मांडून बसलेला मनाच्याच सताड उघड्या दारात मनाच्याच पहारेकऱ्यासारखा..!
त्या प्रत्येकांसाठी रांगोळी रेखला उंबराच असतो प्रत्येकाच्या मनात बालपणापासूनचा. आजकालच्या रांगोळी नसलेल्या उंबऱ्यांच्या किंवा उंबराच नसलेल्या घरांमधल्याही त्या पूर्वकालीन सर्वांच्या मनातही उंबरा असतो तो रंग ओळी रेखलेलाच. तो दृश्य किंवा अदृश्य उंबराच होतो मग नंतरच्या पिढ्यांसाठीही एक प्रतिक मर्यादांचं. या संदर्भात स्त्री असो वा पुरुष, रोज उंबरा ओलांडून बाहेर पडावं लागतं ज्यांना, त्यांनी मनातल्या संस्कारांनी घालून दिलेलं मर्यादांचं उल्लंघन न करायचं भान ठेवणं ही अखेर त्यांचीच जबाबदारी. तिची तशीच त्याचीही. . !
या जबाबदारीचं भान सतत जागं रहाण्यासाठी प्रत्येकाच्या मनाच्या चौकटीला पेलून धरणारा हवाच एक उंबरठा, घराला नसला समजा तरीही. . !
हा मनाचा उंबरठा असतो मनाच्या घरात येणाजाणाऱ्या विचारांसाठीचा थांबा आणि अविचारांसाठीचा अडसरही. . !
तोच सांभाळत असतो तोल स्वतःबरोबरच मनाचाही. तोच जागती ठेवतो मनातली जाणिव जबाबदारीची आणि स्विकारलेल्या बांधिलकीचीही.
आजच्या काळात उंबरा ओलांडून जाणं आणि थकून परत येणं सर्वांसाठी नित्याचंच असतं. जाताना मिटल्या दारांना संध्याकाळी अंधारेपर्यंत अंधारं कुलूपच असतं उंबऱ्याच्या सोबतीला. क्वचित एखाद्या घरी येणाऱ्यांची वाट पहाणारंही असलंच कुणी घर सांभाळणारं किंवा त्यांच्या निगराणीखाली तग धरुन असलेलं थकून गेलेलं वार्धक्यही कदाचित, तर येणाऱ्या पावलांना भान देतो, मनातलाच उंबरा. पावलांच्या बूट चपलांबरोबर, बाहेरच्या कामांचे, जबाबदाऱ्यांचे सगळेच विचार, सगळीच दडपणं अलगद मनातल्या मनातच वेगळी करुन मनातल्याच एका खास कप्प्यात बंद करुन टाकायचं भानही तोच देतो. घरात उंबरा ओलांडून आत पुन्हा प्रवेश करताना घरातल्या वेगळ्या भूमिकाचंही. जाताना आणि येतानाच्याही परस्पर वेगळ्या भूमिका न् जबाबदाऱ्यांचं भान देणारा स्विच त्या त्या वेळी आॅन आॅफ करायचं भान मनातला उंबराच करुन देतो जाण्यायेणाऱ्या तिला आणि त्यालाही. समाधानी सहजीवनातील आनंदाचं असा अधिष्ठान असतो हा मनातला उंबरठा. . घराचं घरपण जपणाऱ्या घराच्या चौकटीतल्या उंबऱ्यासारखाच. . !!
© श्री अरविंद लिमये
सांगली
मो ९८२३७३८२८८
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈