श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ उगवतीचे रंग – मी का लिहीतो ? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
मध्यंतरी मला कोणीतरी हा प्रश्न विचारला होता की मी का लिहितो ? हा प्रश्न म्हणजे मी अन्न का खातो, मी पाणी का पितो, मी श्वास का घेतो असे विचारण्यासारखे आहे. मी का खातो, का पितो आणि का श्वास घेतो या तीनही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. आणि ते म्हणजे जगण्यासाठी. जगण्यासाठी या तीन गोष्टी जर आवश्यक असतील तर माझ्या दृष्टीने आणखी काही गोष्टींची भर त्यात घातली पाहिजे. त्या म्हणजे वाचणे, लिहिणे, साहित्याचा आस्वाद घेणे, मनमुराद भटकंती करणे, संगीत ऐकणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समोरच्याशी संवाद साधणे . मला माहिती आहे की, या सगळ्या गोष्टी नाही केल्या तरी माणूस जगू शकेल. ‘ लेकिन ये जीना भी कोई जीना है ‘ अशी आपली अवस्था होईल. इतर प्राणी आणि माणसाच्या जगण्यात फरक राहणार नाही. ज्याला मन आहे तो माणूस. आणि आपण माणूस आहोत. एक चिनी म्हण आहे, ‘ तुम्हाला दोन पैसे सापडले तर, एक पैशाची भाकरी घ्या आणि एका पैशाचे गुलाबाचे फुल घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल , आणि कसे आणि का जगायचे हे गुलाबाचं फुल शिकवेल.
काय शिकवतं बरं गुलाबाचं फुल आपल्याला ? गुलाब काट्यांवर फुलतो. काट्यांची पर्वा न करता. आतूनच कसा फुलून येतो. कसा खुलतो. आधी असणाऱ्या नाजूक, दिमाखदार कळीचं कसं फुल होतं हे सगळं बघण्यासारखं असतं . या साठी नजर हवी. त्याचं फुलणं तनामनात साठवून घेता यायला हवं. त्याच्या पाकळ्या बघा, किती तलम , रेशमी, मऊ, मुलायम. त्या पाकळ्यांवरचे रंग बघा. कुठे गडद,कुठे फिके तर कुठे एकमेकात मिसळलेले. कुठून आणलं त्यानं हे सौंदर्य ? तर हे आतून आलं. त्याच्यामध्ये जी फुलण्याची क्षमता आहे, त्या पूर्ण क्षमतेनिशी ते फुल फुलून आलंय . काट्यांची, वारा , वादळाची, पावसाची पर्वा न करता. टेनिसन नावाचा एक इंग्रजी कवी म्हणतो, ‘ एक फुल जाणणे म्हणजे सारे विश्व जाणणे .’ खरंच आहे. या फुलाच्या जन्माचे, फुलण्याचे रहस्य तुम्हाला समजले, तर जीवनाचे रहस्यही तुम्हाला उलगडेल.
ते गुलाबाचं फुल आपल्याला जणू सांगतंय की परिस्थितीची पर्वा करू नका. आपल्या अवतीभवती काटेकुटे असू द्या. अनंत संकटे असू द्या. आपल्या पूर्ण क्षमतेनिशी फुलून या. स्वतःला व्यक्त करा. व्यक्त व्हा. अव्यक्तातून व्यक्त व्हा. लिखाण करणे किंवा लिहिणे हे व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे. समोरच्या व्यक्तीशी प्रभावी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. समर्थ रामदास म्हणतात, ‘ दिसामाजी काहीतरी लिहावे. ‘ कशासाठी लिहायचं ? लोकांसाठी ? त्यांना काही सांगण्यासाठी ? हा तर माझ्या लिखाणाचा नक्कीच उद्देश नाही. मी का लिहितो या प्रश्नाचं प्राथमिक उत्तर म्हणजे ‘ स्वान्तसुखाय ‘. मला आनंद होतो म्हणून मी लिहितो. माझ्या लिखाणातून मी व्यक्त होतो. कुठल्याही अभिव्यक्तीचं अगदी ताबडतोब आणि तात्काळ मिळणारं फळ म्हणजे आनंद, ती व्यक्त करण्याचे समाधान. ते समाधान माझ्या लिखाणातून मला मिळते.
एखाद्या चित्रकाराने खूप मेहनत करून एखादे चित्र काढावे, एखाद्या वास्तुविशारदाने दिवसरात्र खपून एखादी सुंदर वास्तू उभी करावी, एखाद्या मुर्तीकाराने मोठ्या परिश्रमपूर्वक एखादी मूर्ती घडवावी आणि आपल्या निर्मितीकडे बघावे. त्यावेळी त्याला जो आनंद असतो ना, तोच नवनिर्मितीचा आनंद एखाद्या लेखकाला आपल्या साहित्यकृतीच्या निर्मितीनंतर होत असतो. एखाद्या मातेने बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाकडे पाहताना जसे तिच्या सर्व श्रमाचे सार्थक होते, तसा आनंद ही नवनिर्मिती लेखकाला मिळवून देते.
ही नवनिर्मिती जर मनापासून केली असेल, म्हणजेच आतून आली असेल, आणि वर्डस्वर्थसच्या शब्दात सांगायचे तर ‘ Spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility ‘ असेल तर समोरच्याला ती नक्की आवडतेच. म्हणजेच त्या वेळी माझे लिखाण मला तर आनंद देतेच, पण समोरच्याला सुद्धा आनंद देण्याची क्षमता त्यात असते. मोर स्वतःच्या आनंदासाठी नाचतो पण त्याचा फुललेला मोरपिसारा कोणाला आवडत नाही ! मग माझे लिखाण दुसऱ्याला जर आनंद देणारे असेल तर मी का लिहू नये ? माझे लेखन माझ्या भावना, माझे विचार दुसऱ्यापर्यंत पोहचवण्याचे एक माध्यम आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं तर ‘ ये हृदयीचे ते हृदयी घातले ‘ अशी ही गोष्ट असते. आणि जेव्हा मला लक्षात येते की माझे लिखाण लोकांना आवडते आहे, तेव्हा मला मग लिखाणासाठी आणखी उत्साह येतो. मग मी मला त्यांच्यासमोर व्यक्त करीत जातो.
मी पस्तीस वर्षे शिक्षक म्हणून काम केले. एखाद्या वर्गात जेव्हा मी मुलांना तल्लीन होऊन शिकवीत असे, त्या माध्यमातून पूर्ण व्यक्त होत असे त्या वेळी होणारा आनंद काही वेगळाच असायचा. मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, समाधान माझा आनंद द्विगुणित करीत असे. अशा वेळी मला वेळेचे भान राहत नसे. तास संपल्यानंतर तृप्त मनाने मी वर्गाबाहेर पडत असे. या समाधानाची सुवर्ण मौक्तिके मी माझ्या आनंदाच्या जीवनकोशात अनेकदा जमा केली आहेत. सेवेत असताना मला लिखाणासाठी फारसा वेळ मिळत नसे. निवृत्त्तीनंतर तो मिळू लागला. मी सहज माझ्या आनंदासाठी लिहू लागलो. अशा वेळी इंटरनेट आणि फेसबुक सारखा सोशल मीडिया माझ्या हाताशी उपलबध होता. त्याचा मी वापर करू लागलो. मलाही कुठे तरी व्यक्त व्हायला माध्यम हवे होते, ते या रूपाने अनायासे मिळाले. मग जवळपास वर्षभर ‘ प्रभातपुष्प ‘ नावाचे सादर नियमित लिहीत होतो. ते वाचकांना आवडू लागले. ते त्याची मागणी करू लागले, त्यावर प्रतिक्रिया देऊ लागले. एखादे दिवशी जर काही कारणाने लेखन झाले नाही, तर विचारणा करू लागले. मग पुढे त्यांच्याच आग्रह आणि सूचनेवरून या लेखांचे ‘ कवडसे सोनेरी..अंतरीचे ‘ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. आणि मग आजपर्यंत दहा पुस्तके ! आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा, आनंद अवघा वाटावा. असे हे आनंदरूप होणे, म्हणजे लिहिणे. म्हणून मी लिहितो. माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈