? विविधा ?

☆ उत्कट…. भाग -१ ☆ श्री अजित देशमुख ☆

भावनातिरेक आणि अश्रुपात या ठरलेल्या समीकरणाची प्रचिती पोलिस अधिका-याला जेवढी येते तेवढी क्वचितच कोणाच्या अनुभवाला येत असेल. सहन होण्यापलीकडील दुःख आणि मन कोळपून टाकणाऱ्या दु:खाची  परिस्थिती बदलण्याबद्दलची अनिश्चितता यामुळे अशी व्यक्ती क्षणाक्षणाला हतबल होत जाते .

मुळात ” पोलीस” या संस्थेभोवतीचे प्रवाद , समज आणि संशयाची वलये सर्वसामान्यांच्या मनावर गोंदवल्यासारखी घट्ट असतात. पोलिसातील एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या गुणांबाबत कौतुक करतानाही ”पोलिसात असूनसुद्धा ” हे पालुपद चिकटतं ,  यात सर्व काही आलं .

तक्रार घेऊन आलेली व्यक्ती ही आपले दुःख कमी व्हावे या उद्देशाने  शेवटचा उपाय म्हणून पोलिसांकडे येते . तिची एकमेव अपेक्षा त्याच्या दुःखाच्या समस्येचे तात्काळ निवारण व्हावे अशी असते. पोलीस अधिकारी मात्र तक्रारीच्या स्वरूपाचा  आढावा घेत घेत त्या तक्रारीनुरुप करावयाच्या कायदेशीर प्रक्रियेची मनात जुळवाजुळव करत असतो. त्या त्या प्रत्येक तक्रारीमागील घटनांचे कारण, त्यामुळे होणाऱ्या  परिणामांचे , त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे , नवीन तक्रारीचे स्वरूप   हातातील काम बाजूला ठेवण्या इतपत तातडी निर्माण करणारे असले, तर वरिष्ठांना तात्काळ कल्पना देण्याबाबत असे एक ना  अनेक विचार त्याच्या मनात  गर्दी करून असतात . याचा परिणाम म्हणून कि काय एखादा डॉक्टर जसा पेशंट तपासताना विचलित होत नाही तसाच पोलीस अधिकारी तक्रारी हाताळताना भावनाविवश होत नाही . मात्र यामुळे होते असे की तक्रारदाराच्या मनातील पोलिसाबद्दलची ‘रुक्ष ‘ अशी प्रतिमा अधिक गडद होते . आपली तक्रार आवश्यक तेवढ्या गांभीर्याने घेतली जात नाही असा गैरसमज होऊन वाढलेली तक्रारदाराची  हतबलता  त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत असते.

मात्र पोलिस अशाही प्रसंगाचे साक्षी होतात ज्यामध्ये दु:खाश्रूंची जागा थोड्याच अवधीत आनंदाश्रू घेतात.

मुंबईतील गर्दी हा “मुंबई शहर” याविषयामधील  एक अटळ मुद्दा आहे. दक्षिण मुंबईतील व्यापारी भागात तर दिवसा चालता येणं मुश्किल होते इतकी गर्दी असते. अशा भागात दिवसा वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडत असतात.  मजेची बाब अशी की रविवारी त्याच रस्त्यावर “तरुण मुले क्रिकेट खेळून दंगा करत आहेत” अशा तक्रारीही पोलिसांकडे येतात. गर्दी आली की त्या अनुषंगाने येणाऱ्या गुन्ह्यांचे आणि घटनांचे प्रकारही आलेच. पाकिटमारी, बॅग खेचून पळुन जाणे, कपडयावर घाण टाकून  धुण्यासाठी मदत करावयाच्या बहाण्याने बाजूला नेणे आणि बॅग खाली ठेवून आपल्या शर्टावरची घाण धुण्यात दंग असलेल्या मालकाला घाणी बरोबरच आपली बॅगही नाहीशी झाल्याचा दृष्टांत होणे हे नित्याचेच.

अशा गर्दीचे कार्यक्षेत्र असलेल्या पोलिस ठाण्यामधे, एखादी स्त्री कपड्याचे भान न ठेवता  घाईघाईने पायऱ्या चढत , रडून दमेलेले डोळे शोधक नजरेने फिरवत पोलिस ठाण्यात प्रवेश करते तेव्हा समजावे, हीचे मूल गर्दीत हरवले आहे.

“साहेब माझा मुलगा हरवला आहे हो !” असं बोलून मागोमाग मोठयाने हंबरडा .

हरवलेल्या मुलाचे वडील बरोबर असले तर बाहेर टॅक्सीचे पैसे देऊन मागोमाग पोलीस ठाण्यात येतात. तेही काळजीत असतात परंतू पुरुष असल्यामुळे त्यांचे डोळे वाहात नसतात. बाळाच्या विचाराने आईचे लक्ष कशातच नसते.  तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर काळजी पसरलेली आणि मनात येणाऱ्या नाही नाही त्या शक्याशक्यतांच्या विचारांमुळे तिच्या डोळ्यातून सतत अश्रूंचा पूर लोटत असतो . ड्युटी ऑफिसरने बसायची खूण केली आणि बाळाचे वडील खुर्चीत बसले तरी आई खुर्चीत बसत नाही.

गर्दीत हात सुटून हरवलेली अशी मुले सर्व साधारणपणे अडीच ते चार वर्षाची असतात.

नित्याचा प्रकार असल्याने , ड्युटी ऑफिसर हरवलेल्या मुलाच्या वयाची , त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांची आणि शरीरावरील ओळखीच्या खुणांची तोंडी चौकशी करता करता हातातील लिखाण पुर्ण करत असतो. मुलाच्या आईवडीलांसाठी परिसर सरावाचा नसल्याने नेमक्या

कोणत्या जागेवरून मुलगा हरवला हे त्याना नीट सांगता येत नाही .मग एखादया मोठया दुकानाच्या खुणेवरून वगैरे त्या जागेचा अंदाज येतो.      

बाळाची आई रडत रडत “एक मिनिटांसाठी  घोटाळा झाला हो” हे वारंवार उच्चारत मुलाचा हात सोडल्याबद्दल स्वतःला दोष देत  असते.

एक छोटेसे टिपण करून त्याची  “लहान मुले  हरवल्याबाबतच्या” रजिस्टर मधे आणि पोलिस स्टेशन डायरी मधे नोंद करून, ड्युटी ऑफिसर पोलिस कंट्रोल रूमला घटना कळवतो.

त्याचप्रमाणे आपल्या पोलिस ठाणे हद्दीतील संबंधित क्षेत्रात गस्तीवर असलेल्या बीट मार्शलना वायरलेस मेसेजने अलर्ट करतो…

क्रमशः…

© श्री अजित देशमुख  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments