सौ. राधिका भांडारकर
☆ विविधा ☆ ऊंच माझा झोका ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
सरस्वती आमच्या साक्षरता वर्गात रोज यायची.
ऊंच, सडसडीत, अनवाणी, विस्कटलेले केस, ठिकठिकाणी जोड लावून शिवलेलं मळकट लुगडं. पण डोळ्यात विलक्षण चमक. काम करून करून घट्टे पडलेले हात पण ओंजळीत ओली स्वप्नं!!
तांबापुरा झोपडपट्टीत राहण्यार्या, मोलमजुरी करणार्या महिलांना, कित्येकवेळा आमच्या वर्गात येण्यासाठी, विनवण्या कराव्या लागायच्या.. शिकाल तर वाचाल.. हे जीव तोडून पटवून द्यावं लागायचं..
त्यांची न येण्याची कारणंही खूप होती. दारु पिण्यार्या नवर्याचा धाक, मारझोड. वस्तीतल्याच लोकांकडून मिळणारे टोमणे… संशय… एक ना अनेक.
पण सरस्वती मात्र या सगळ्यांवर मात करून, धावत पळत आमच्या क्लासला यायची…. पाटीवर छान अक्षरं गिरवायची… धडे वाचायची.. कविता म्हणायची.
समजलं नाही तर प्रश्न विचारायची… तिची जिद्द पाहून मीही थक्क व्हायचे… लहान असतानाच एका बिजवराशी तिचं लग्न लावलं गेलं… सुख म्हणजे काय असतं हे कधी कळलंच नाही… ना माहेरी ना सासरी.. जीवन म्हणजे नुसता चिखल….
एक दिवस ती मला म्हणाली, “ताई मला यातून सुटायचंय्.. मला माझ्या जगण्याचा अधिकार मिळवायचाय्… मला तर एक चांगलं आयुष्य जगायचच आहे आणि जमेल तेव्हढं माझ्यासारख्यांनाही मला बरोबर घेऊन चालायच्ंय्….”
आमच्या साक्षरता वर्गातून तिच्या स्वप्नांना एक पायरी मिळाली फक्त.. पण तिचा प्रवास खूप लांबचा होता. खाचखळग्यांचा दगड गोट्यांचा होता… पण तिची पावलं घट्टं होती… मधून मधून ती मला भेटायला यायची…
ग्राम पंचायतची निवडणुक तिने लढवली… ती जिंकली… सरपंच झाली. महिला सरपंचाचा मान तिला मिळाला… तिने हे सरपंचपद नाकारावं म्हणून तिला अनेक धमक्यांना सामोरं जावं लागलं… पण ती ढळली नाही…. तिने अत्याचारित महिलांसाठी अल्पबचत गट तयार केले… बँकांकडून सहाय्य मिळवलं… अनेकांच्या गुणांचं संकलन करून या माध्यमातून तिने त्यांना सक्षम बनवण्याचा विडा ऊचलला… अंगणवाडीतही तिचा महत्वपूर्ण सहभाग होता…
बघता बघता सरस्वतीच्या स्वप्नांचा आलेख ऊंच ऊंच होत गेला…. आता ती सरस्वती बाई झाली होती…
ती एका गळीत समाजाची आधारभूत बनली होती…. “माय” माऊली संबोधली जाऊ लागली….. मी टीव्ही लावला…. ऊंच माझा झोका या कार्यक्रमात तिचा सत्कार होणार होता…. पुरस्कार चिह्न हातात घेऊन आपलं मनोगत व्यक्त करणार्या सरस्वतीच्या डोळ्यात आजही तीच चमक होती….. मी ऐकत नव्हतेच एक ऊंच गेलेला झोका पाहत होते…. फक्त…. पाहता पाहता डोळे भरले… या झोक्याला मी फक्त एक हलका धक्का दिला होता……!!!
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
१९/०१/२०२१
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈