श्री विनय माधव गोखले
विविधा
☆ एका जमलेल्या कटिंगची कहाणी ☆ श्री विनय माधव गोखले ☆
दुकानात माझे आगमन झाल्यावर प्रसन्नपणे “या, बसा!” असे म्हणून त्याने एका बैठकीकडे निर्देश केला.
त्या आलिशान लोखंडी खुर्चीत माझी स्थापना केल्यावर एक पांढरेशुभ्र वस्त्र माझ्याभोवती आच्छादून गळ्याभोवती नाडीची एक हलकीशी गाठ मारून टाकली. थंडीच्या सुरूवातीला सारसबागेच्या तळ्यातील गणपतीला जसे स्वेटर परिधान करतात अगदी तसे…
नंतर ‘शुध्दोदक स्नान’ म्हणून डोक्यावर प्लास्टिकच्या पिचकारीतून फवारले.
ह्या सोपस्कारानंतर रेडिओ सुरू केला. त्यावर लता दीदींची, आशाताई, किशोरदा, मुकेशजी, रफीसाहेबांची गाणी लागत होती. मला ती सर्व गणपतीची, दुर्गेची, शंकराची, हनुमानाची, पांडुरंगाची आरती म्हटल्याप्रमाणे भासू लागली. त्याजोडीनेच त्याच्या कर्मपूजेला प्रारंभ झाला…
डोक्याशी “कटकट” “कटकट” करीत होता तो… पण ती सुखद वाटत होती. जणू काही कंगवा आणि कात्री ह्यांचे माझ्या डोक्याच्या मैदानावर द्वितालात केश-स्केटिंग चालले होते.
कधी ‘शिरगडा’च्या बालेकिल्यावरील गवताची टोके उडवली जात होते तर कधी तिन्ही उतारांवरील गवत कापले जात होते. कपाळावर केस पुढे ओढून कात्रीने समलांबीचा एक ‘साधना-कट’ मारून दिला. सरतेशेवटी कानामागील घळीमध्ये पाण्याचे बोट फिरवून वस्तर्याने अर्धकमानाकृती कोरण्याचे काम करणे चालू केले. तिथे वस्तर्याचा होणारा “खर्र खर्र” आवाज काळीज चिरल्याइतका स्पष्टपणे ऐकू येत होता. मानेवरील गवत वस्तर्याने हटवून गडाच्या पायथ्याशी वाहनतळासाठी जागा मोकळी केली. थोड्या वेळाने सर्व आवाज थांबले आणि मी भानावर आलो.
नंतर एखाद्या ‘घटम्’ वर ताल धरावा तसे त्याने डोक्याला बोटाने हलका मसाज करून दिला. फारच बरे वाटले.
तत्पश्चात त्याने मऊ ब्रशने गवताच्या सीमेवर पावडरची पखरण केली व एक खरखरीत ब्रश फिरवून तण काढून टाकावे तसे जमिनीला चिकटलेले सुट्टे गवत बाजूस काढले. नंतर जमीन नांगरटावी तसा माझा चौफेर भांग पाडून दिला.
पांढर्या वस्त्रावरील काळ्या गवतामध्ये बराच पांढरा-राखाडी रंग जमल्याचे पाहून मनात क्षणभर चिंतेचे काळे ढग दाटून आले. पण क्षणभरंच…
पांढर्या वस्त्राच्या नाडीची गाठ सोडून त्यावर जमलेले सर्व ‘निर्माल्य’ त्याने जमिनीवर हलकेच झटकून टाकले आणि नंतर केरसुणीने गोळा करून बादलीत माझ्या नजरेआड केले.
एकंदरीतच त्याने गवत मध्यम कापल्याचे आरशात पाहिल्यावर मला बरे वाटले. गेल्या वेळेस त्याने माझी मुंज करण्याचाच घाट घातला होता…असो.
“पुनरागमनाय च।” असा मनातल्या मनात विचार करून पुन्हा एकदा स्वत:ला आरशात निरखून मी माझे आसन हलवले. त्याच्या सलूनमध्ये कुठे “ग्राहको देवो भव।” किंवा “ग्राहक हाच देव।” असा संदेश चिकटवला आहे का ते मी शोधले पण नव्हता. त्याला दहा रुपये जास्त द्यावे असाही सुविचार मनात डोकावला.
तेवढ्यात त्याने मला नको तो प्रश्न विचारलाच… “अंकल, बाल कलर करवाने है क्या? अच्छे दिखेंगे…”😡😡
त्याने सांगितले तेवढेच पैसे चुकते करून घरी आलो. दोन बादल्या पाणी डोक्यावर ओतल्यावर ‘शिरगडा’स थंडावा पोहोचला.
उन्हाळ्यात थंड पाण्यासारखे आरोग्यदायी दुसरे काहीच नाही, तुम्ही सुध्दा अनुभव घ्या!😄
© विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667