सुश्री मंजिरी येडूरकर
विविधा
☆ एक एप्रिल – कवयित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतीदिना निमित्त : काव्य संजीवनी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
एक एप्रिल – कवयित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतीदिना निमित्त : काव्य संजीवनी
मनात उतरणारी हळवी अक्षरं! निसर्गाशी होणारा संवाद, अक्षरांशी आशयाची होणारी एकतानता, एकरूपता, सुंदर निरागस भावना, तेवढाच सुंदर आशय व त्यांच्या बद्दल मनात असणारी भक्ती, जीवनाचा आस्वाद घेण्याची आतुरता, समरसता, या सगळ्याचा परिपाक म्हणजे कागदावर अवतरलेली अक्षर शारदा! हो, अगदी अ – क्षर शारदा असते. संजीवनी मराठे यांची कविता ही स्वप्नांची निर्मिती असते. तरीही सत्य, संस्कृती, समाज यांच्याशी जोडलेल्या नाळेचं भान असणारी असते. त्यांच्या मते प्रेम हे कधीच, कशालाही अडकाठी बनत नसते, उलट जगण्याला, व्यक्तिमत्व विकासाला, स्वर्गीय चैतन्याचा वेध घेण्याला पोषक व पूरक असते. निसर्गात, चराचरात परमतत्व पाहण्याची दृष्टी त्यांना रविंद्रनाथ टागोर यांच्याकडून मिळाली होती. त्यांच्या कवितात जशी सहजता आहे तशी प्रासादिकता पण आहे.
त्यांची आपल्या ओठावर रेंगाळणारी कांही गाणी, सोनियाचा पाळणा रेशमाचा दोर गं, सत्यात नाही आले स्वप्नात येऊ कां, या गडे हासू या.
त्यांच्या पुरस्कार प्राप्त ‘बरं का गंआई ‘ ह्या कवितेची कल्पना फार सुंदर आहे. छोटी मुलगी आईला म्हणते, “तू आहेस बेबी, मी आहे आई, हे विसरायचं नाही, झोपताना मात्र तू आई व्हायचं, अंगाई म्हणत थोपटत राह्यचं, दुपारचं काही आठवायचं नाही, बरं का गं आई!”
आज 1एप्रिल, कवियित्री संजीवनी मराठे यांचा स्मृतिदिन! त्यांचं शिक्षण पुण्यात झालं. त्यांना संगीत हा त्यांच्या आवडीचा विषय घ्यायचा होता, त्यामुळे त्या मुलींच्या शाळेत गेल्या आणि नंतरही त्यांनी SNDT महिला विद्यापीठातून MA पदवी संपादन केली. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी कोल्हापूरला झालेल्या साहित्य संमेलनात त्या कवियित्री म्हणून सगळ्यांना परिचित झाल्या. त्याच वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांचा ‘काव्य संजीवनी ‘ हा कविता संग्रह प्रसिद्ध केला होता.
पद्मा गोळे त्यांच्या वर्ग मैत्रीण होत्या. दोघींच्या वहीत निदान एकदिवसाआड एक नवीन कविता असायची. ही गोष्ट शिक्षकांनाही माहित असायची त्यामुळं ते ही वर्गात वाचून दाखवायला सांगायचे. कधी कधी गायला सांगायचे.लहानपणा पासून घरून व शाळा कॉलेजातील शिक्षकांकडून कविता लिहिण्याला प्रोत्साहन मिळत गेलं. त्यांच्या कवितांवर काही प्रमाणात भा. रा. तांबे व रविकिरण मंडळातील कवींचा प्रभाव होता. त्यांचे ७ – ८ काव्य संग्रह, बालसाहित्य, लेख संग्रह, गीतांजली हा काव्यानुवाद प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांची मुलगी अंजूने परदेशातून त्यांना लिहीलेल्या पत्रांचे संकलन त्यांनी प्रकाशित केले आहे. त्यांच्या ‘बरं का गं आई’, ‘हसू बाई हसू’ या बालगीतांच्या पुस्तकांना पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने गौरविले आहे.
त्यांचा आवाज चांगला होता व त्यांनी सुरांचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे कविता करताना शब्द आणि सूर एकत्रच यायचे, नि लयीत कविता व्हायची. त्या कविता गाणाऱ्या म्हणूनच प्रसिद्ध होत्या. काव्य वाचनाच्या कार्यक्रमात स्वतःची कविता वाचायला त्यांना आवडायचं नाही. गद्य वाचायचं, पद्य कसं वाचायचं हा त्यांना प्रश्न पडायचा. त्यामुळे कायम त्या सुरात काव्य वाचन –नव्हे गायन करायच्या.
आपल्याला सांगली करांना अभिमान वाटावा अशी गोष्ट मला कळली, ती म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात त्या पतीबरोबर खानापूर – बेळगावी सोडून सांगलीला आल्या होत्या. राम मंदिराजवळ त्यांचा ‘ रामकृपा ‘ नावाचा बंगला होता. काही दिवस त्यांनी सांगलीला शिक्षिका म्हणूनही काम केले.
संजीवनी मराठे यांची आकाशवाणी वर मुलाखत घेतली होती, त्यातील प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तरे आहेत. पण मी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडी अधिक माहिती मिळेल अशी त्यांच्या तोंडची वाक्ये देत आहे. त्या म्हणतात, “आयुष्याचं चिंतन केल्यावर त्यातून निघणारं नवनीत म्हणजे कविता! मला जेंव्हा कवितेतला आशय व सूर यांचं ऐक्य लक्षात यायला लागलं तेंव्हा कवितेचं गाणं होणं सोपं झालं. कविता लिहितांना सूर, भाव, शब्दरचना, व स्पष्ट आशय यांचं भान ठेवावं लागतं. जसं फूल आणि सुगंध यांना आपण वेगळे करू शकत नाही, तसंच आयुष्य व कविता तितकेच सत्य आहेत, एकरूप आहेत, त्यांना आपण वेगळे करू शकत नाही. आयुष्य पेलत असतांना त्यातला मतितार्थ सापडतो, तीच कविता असते. कवितेत भाव असतो त्यामुळे मला वृत्तांपेक्षा छंद व जाती आवडतात. स्वप्नांचा बुरखा घ्यायचा आणि त्यातून वास्तवाकडे पहायचं, तीच कविता! माझ्या कवितात प्रेम असतं कारण मला प्रेम आवडतं. प्रेमात देवघेव असते, प्रेम निरपेक्ष असतं. प्रेमात आपण एकमेकांचे असतो. मी लहान मुलांच्या कविता केल्या. कारण मला लहान मुलं खूप आवडतात. त्यांचं लावण्य, निरागसता यात मी गुंतून, हरवून जाते. अलीकडच्या कविता देवाशी, त्या निराकाराशी बोलणाऱ्या आहेत.माझ्यावर संस्कार असे आहेत कि कर्मकांडात गुंतू नये, इतर मार्गांनी त्या देवत्वाशी नतमस्तक व्हावं. आता त्याच्या जवळ जाण्याचा एक ध्यास आहे. त्याच्या दिव्यत्वाचा शोध घ्यायचा आहे. मी कवितेकडेच वळले कारण गद्य लेखनाला तपशीलात जावे लागते आणि मला अजिबात तपशील कळायचे नाहीत आणि कळले तरी जो सांगायचा विषय, आशय आहे तो इतका मोठ्ठा लिहीत बसण्यापेक्षा कवितेतून सांगणं सोपं वाटायचं.”
आत्ता कविता दिनाच्या निमित्ताने आपण त्यांची ‘ मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी ‘ ही कविता वाचली आहेच.
लाघवी, सहज फुलणाऱ्या कल्पना, प्रासादिक शब्द, उपमा, रुपके यांचा मुक्त वापर करून सुंदर कविता करण्याचं , हे त्यांचं कसब या कवितेतून लक्षात येते.अशीच त्यांची आणखी एक सुंदर पण थोडी भावुक कविता —
जायचे असेल जरी, न कळता निघून जा, न कळता निघून जा
फूल फूल हुंगता, चांदण्यात दंगता, देहभान हरपता, खुशाल मज पुढून जा
न कळता निघून जा
केशपाश सोडूनी, त्यात वदन झाकुनी, रुसूनी बैसते तदा, लपत छपत दूर जा
न कळता निघून जा
गान गायिल्या वरी, बीन सारुनी दूरी, थकून नयन झाकते, त्याक्षणी उठून जा
न कळता निघून जा
क्षणिक जायचे असे, लागू दे तुला पिसे, विरही मीलनी सुखे, मजसी गुंगवून जा
न कळता निघून जा
आणि जर अखेरचे, तुज असेल जायचे, जात जात पदतली, प्राण हे चुरुन जा
न कळता निघून जा
न कळता निघून जा
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈