सुश्री तृप्ती कुलकर्णी
विविधा
☆ एका कथानायिकेचं दुसऱ्या कथानायिकेला पत्र… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
(एका पुस्तकातल्या कथानायिकेनं दुसऱ्या पुस्तकातल्या कथानायिकेला लिहिलेलं पत्र…)
‘पारुल‘ या हर्ष देहेजिया यांच्या अनुवादित पुस्तकातली *पारुल* ही कथानायिका आणि पु. शी. रेगे यांच्या ‘ सावित्री ‘ या पुस्तकातली *सावित्री* ही कथानायिका )
प्रिय सावित्री,
जितक्या सहजपणे मी तुला एकेरी प्रिय संबोधते तितक्याच सहजतेनं मी तुला आलिंगनही देते. आश्चर्य वाटलं असेल ना तुला? मी कोण, कुठली, तुला माहितही नाही तरीही तुला पत्र लिहिते, अनोळखी असूनही प्रेमानं आलिंगन देते. खरंय ते! अगं तुलाच काय, मलाही आश्चर्य वाटलं की, मी अशी काय वागतेय. जरी माझा स्वभाव मनमोकळा असला तरीही मी इतकी आपलेपणानं पहिल्यांदा कुणाशीच बोलत नाही. पण ही किमया मात्र तुझी आहे. तुझ्या स्वभावाची, तुझ्या व्यक्तिमत्त्वाची. आता माझी ओळख करून देते हं. अगं ही ओळख म्हणजे तरी काय? निव्वळ आपल्या सगुण अस्तित्वाचे दाखले देणं इतकंच. माणूस माणसाला ओळखायच्या आधी त्याला समजावा लागतो अन मग त्या समजण्याचं सवयीत रूपांतर झालं की तो ओळखता येतो. अशी ओळख आपली बहुदा या पत्र व्यवहारातूनच होईल.
अगं, हे सगळं बोलण्याच्या नादात तुला सांगायला विसरलेच की, मी कोण ते. मी पारुल. उत्तर भारतात राहते. एकटीच असते. हा एकटेपणा हीच खरंतर माझी मोठी ओळख. माझी कथा तुला सांगेनच नंतर कधी पण तुझी कथा जशी मला समजली तसं न राहवून मी तुला हे पत्रं लिहलं. खरंतर तुझं-माझं आयुष्य खूप वेगळं आहे. जणूकाही एका नदीचे आपण दोन काठ आहोत, समांतर असूनही कधीच न भेटणारे. खळाळणारी जीवनदायिनी नदी हीच काय ती आपल्याला जोडणारी आणि म्हणलं तर अलगही करणारी. त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखात सुद्धा फरक आहे. अगं, इतकंच काय आपल्या विचारांत, जगण्यातदेखील फरक आहे. आपण दोघी वेगवेगळ्या स्वभावधर्माच्या आहोत. तू अत्यंत संयमी, प्रसंगी विरक्त आणि अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी आहेस. प्रवाहात ओली झालीस तरी तुझा काठ विरघळू देत नाहीस. तर मी काठाचं भान विसरत अधिकाधिक नदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. तुझ्या घरात शिक्षणाचा वारसा आहे. वाचन संस्कार आहे. याउलट माझं घर साधं आहे, जीवनही साधं आहे. पतीच्या मृत्यू पश्चातलं एकाकीपण आहे. तुझ्याइतका काही शिक्षणाचा, बुद्धिप्रामाण्यवादाचा माझ्याशी संबंध आला नाही. सावित्री, तू ठरवून एखाद्या दिशेने प्रवास करणारी आहेस, तीरावर येणाऱ्या लाटांना सजगपणे सामोर जाणं तुझं ध्येय आहे. तुझ्या काठांवर उमटणारी पावलं किती खोल उमटु द्यावीत… हे तू ठरवतेस. माझं तसं नाही माझ्या काठावरची पाऊलं पाण्याच्या स्पर्शाने काठोकाठ भरतात आणि धडकणाऱ्या लाटांनी चिंब झाली की त्यातल्या ओलाव्यानं थोडी विरघळतात. माझं अस्तित्व विलीन होण्यात मी धन्यता मानते.
तुझं प्रेम… तुझा त्याग हा खरंच विशाल आहे. तुझ्या विचारांची अमर्याद ताकद हे स्त्रीत्वही जपते. तू निर्गुण निराकार प्रेमाला स्वतःत मुरवून घेतलंस तू अद्वैत साधलंस. मी सगुण प्रेमाच्या सहाय्याने निर्गुणाला शोधलं. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा उपभाग घेऊन विलासिनी स्वरूपात मी स्वतःला साकारलं. अद्वैत साधण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. मला बुद्धीशी झगडा करावा लागला. मला स्पर्शाचा आधार घ्यावासा वाटला. जीवनाचं उद्दिष्ट जसं मला कळलं तसं मला निर्गुणाचा महत्त्व कळलं. तू तर हे पहिल्यापासून जाणूनच होतीस. विचारांच्या सहाय्याने तू दोन पावलं पुढं होतीस. तरीही एक जाणवतं… तुझ्या-माझ्यात एकचं साम्य आहे, कदाचित तो जीवनदायीनीचा संगत असर असावा. नितळ, तरलता मिळवण्याची आशा. प्रेम हे जगण्याचं कारण असणं तरीही कर्तव्यपूर्तीची ओढ असणं.
अजून काय सांगू, एकाच भेटीत किती बोलावं. जे बोललेय ते तरी तर्कसंगत आहे की नाही, तेही माहित नाही. पण दोन्ही काठाचं प्रतिबिंब सामावणारी ती जीवनदायीनी आपला संवाद घडवून आणेल हे नक्की. म्हणजे निदान आता एकमेकांवर आदळणाऱ्या लाटा तरी परिचयाच्या असतील.
तुझी पारुल.
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈