श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ एक रस्ता  आ s हा , आ s हा  ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मंडळी  नमस्कार ?

आज एक वेगळा विषय मांडतोय.( जरा निवडणूक रणधुमाळीतून थोडासा बदल समजा.)

‘प्रवास’  हा  अनेकांचा आवडता विषय असतो. अनेक जण अनेक प्रकारे प्रवास करतात. कुणी रस्त्याने , कुणी रेल्वेने तर कुणी हवाई प्रवास करतात. पण असे काही मार्ग असतात की त्या खास मार्गावरून जायला प्रत्येकाला कधीच कंटाळा येत नाही.  रोजच्या कामाच्या ठिकाणी वगैरे जायचा हा मार्ग नाही बरं का ! ( तिथे तर मनात असो नसो जावंच लागतं.)

असा मार्ग, जो केव्हाही जा, कधी ही जा फक्त आनंदच देतो.

तर मंडळी, माझ्यासाठी  सारखा सारखा प्रवास करावासा वाटणारा, कधीही कंटाळवाणा न वाटणारा एक रस्ता आहे .  माझ्या घरा पासून ते मुक्कामाचे ठिकाण असा हा मार्ग साधारण १३० किमीचा आहे. आणि दोन एक महिन्यातून एकदा तरी या मार्गावरून  गेल्या शिवाय मला चैनच पडत नाही.?

हा मार्ग चार टप्य्यात मी विभागलाय .  माणसाच्या कशा साधारण चार अवस्था असतात १)बाल २) कुमार ३) तारुण्य आणि ४) वार्ध्यक्य

(धर्म, अर्थ, काम, मोक्ष)

तशाच माझ्या मार्गाच्या ही ? ?या चार अवस्था आहेत.

साधारण ३०- ३५ किमीचे  प्रत्येक टप्पे . प्रत्येक टप्पा पार करायला लागणारा वेळ ३० मिनिटे. असा हा दोन तासाचा प्रवास.

तर घरातून निघालो की पहिला टप्पा, बाल्य: जशी लहानपणी आपली बालसुलभ भावना असते , एक आनंद , उत्साह , थोडीशी हुरहूर प्रवास कसा होईल याबाबत थोडी भिती. असा हा पहिला टप्पा.

पहिल्या टप्प्याचा काही कि.मी. शिल्लक असताना  लागणारे दोन बोगदे जणू  वडीलधारी पालक. जाणीव करून देतात की  आता लहान नाहीस, खेळ बास , मजा बास थोडा सिरिअस हो,अभ्यास वाढणार आहे , लक्ष असू दे,

मग  दुसरा टप्पा सुरु –  कुमार . थोडी जबाबदारीची जाणीव , झालेल्या चूकाातून शिकणे . गाडीच्या वेगावर नियंत्रण , ब्रेक न दाबता समोरून आरामात चालना-या गाडयांना ओलांडून पुढे कसे जायचे , मागून येऊन किरकिर कारणा-या गाडयांना पुढे सोडणे , योग्य वेळी योग्य गियर , असे करत करत  , थोडासा अॅरोगंटपणा पण वाढत्या जबाबदारीच्या जाणीवेने हा २५-३० किमीचा  अवघड वळणाचा , घाटाचा टप्पा पार करत क्षणभर विश्रांती साठी थांबणे. हा टप्पा पार करे पर्यत अनेकांच्या डोक्याला झिणझिण्या येऊन  अगदी अमृतांजन लावावे असे वाटण्यासारखी परिस्थिती.

चहा नाश्टा करून मग तिस-या टप्प्याला सुरवात करायची .

त्यामानाने हा टप्पा जास्त  सुखकारक  रस्ता,  परिसर, गाडी यावर अगदी व्यवस्थित कंट्रोल आलेला असतो. जणू जीवनात आता रुटीन सेट झाले आहे. मस्त पैकी पाचवा गिअर टाकून एका वेगात गाडी जात आहे . फक्त आपल्या समोरच्या लेन मधून हळू जाणा-या गाडयांना शिताफने चुकवून, न कळत , अलगद , न दुखावता, हाँर्नचा आवाज न करता त्यांना ओलांडून पुढे जाऊन परत आपल्या मूळ लेन मध्ये लागणे, अतिशय घाई असणा-यांना आपला वेग कमी न करता पुढे जाऊ देणे.

बस “गोल्डन टाइम ” हाच

चौथा आणि शेवटचा टप्पा  मुक्कामाचे ठिकाण घेऊन जाणारा. नाही म्हणले तरी एक दिड तासाच्या प्रवासाने थोडासा कंटाळा आलेला असतो. मुक्कामाच्या ठिकाणी पोचण्या आधी पुढे किती ट्रॅफिक जाम असेल याची चिंता  लागते, कसं होणार ? केव्हा पोहोचणार ? या विचाराने मनात काहूर माजलेले असते. जणू हा वृद्धत्व / निवृत्ती असा हा टप्पा . जे जे होईल ते ते पहावे अशी नकळत विचारसरणी करून देणारा हा टप्पा .

अंमल उदासीनपणे , वाट बघ बघत , ज्या नियोजित वेळेला पोहोचू असे वाटत असते त्या वेळे पेक्षा थोडा उशीर करून शेवटी आपण मुक्कामाला पोहोचतो

मंडळी  असा माझा हा प्रवासाचा आवडता  रस्ता आणि चार टप्पे.  कसा वाटला?

अरे हो  आता तो रस्ता कुठंला हे सांगणे ही एक फॉर्मेलीटी. कारण हा कुठला रस्ता हे

ब-याचजणांनी ओळखलं असेलच.

ज्यांनी ओळखलं नाही त्यांना सांगतो,

हा माझा आवडता रस्ता  आहे तो # मुंबई- पुणे मेगा हायवे . आणि प्रवासाचा मार्ग  बेलापूर ते कोथरूड

पहिला टप्पा-   घर ते – खालापूर टोल नाका

दुसरा टप्पा- खालापूर टोल नाका ते  – लोणावळा .

तिसरा टप्पा – लोणावळा  ते तळेगाव टोल नाका

चौथा टप्पा – तळेगाव टोल-कात्रज बाय पास – ते -कोथरूड

मंडळी पण ही मजा फक्त मुंबई – पुणेच बरं का ! परतीची

पुणे – मुंबई अशी मजा नाही. कारण एक तर पुण्याहून आम्हाला निघायलाच नको वाटतं आणि मगाशी जे बाल, कुमार,तारुण्य , वार्धक्य या अवस्था किंवा धर्म , अर्थ , काम , मोक्ष असं जे म्हणलं तो मोक्ष आम्हाला परत येताना  पुण्यातील मित्रांनी दिलेल्या  बाकरवडी आणि आंबा बर्फीने केव्हाच मिळालेला असतो.

त्यामुळे आम्ही परतीचे राहिलेलोच नसतो?

मेगा हायवेवर अखंड पणे

राबणा-या  परिचित अपरिचित सर्वांना सदर लेखन समर्पित

©  श्री अमोल अनंत केळकर

०९.०४.२०१९

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments