प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ एक विचार: मनःस्थिती बदला ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

निलूच्या सूनबाई. मृणाल तिचं नाव. वय वर्षे चाळीस पार – साधारण पंचेचाळीस शेहेचाळीस. स्वतंत्र राहणारी. ” नवराबायको दोघं – चुलीस धरून तिघं ” या म्हणीप्रमाणे संसार सुरू असलेली. तिला एक मुलगा वय वर्षे वीस. एक मुलगी वय वर्षे सतरा.

नवरा खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरीत असलेला. ती स्वतः एका बऱ्या कंपनीत नोकरीला आहे. सासू सासऱ्यांचा “जाच ” नाही. लग्न झाल्याझाल्याच तसं तिनं सांगितलेलं. त्यामुळे निवृत्त शिक्षिका सासूबाई आणि निवृत्त बँक ऑफिसर सासरे साधारण मोठ्या अशा आपल्या “गावी ” राहतात. खेड्यात नव्हे.

मुलं लहान असताना, कधी पाळणाघर, कधी बाई, कधी घरून काम असं तिनं ॲडजस्ट केलं. मुलांची शाळा, संगोपन सांभाळलं. दोन्ही मुलं १० ते ५ शाळेची झाली आणि मृणाल बरीच सुटवंग झाली. त्यांच्याच वेळात ही पण नोकरी करू लागली. सुख सुख ते काय म्हणतात, ते खूपच होतं.

दरवर्षी देश विदेशात कुठेतरी फिरणं होतं. गाडी, मोठासा फ्लॅट, आर्थिक बाजू उत्तम. पण हेच सुख कुठेतरी बोचू लागलं मृणालला. तिची सततची चिडचिड वाढली. उगाचच मुलांवर, नवऱ्यावर ओरडणं वाढलं. कारण कळेचना. समाजमाध्यमे आणि मैत्रिणी यावेळी कामी आल्या. “मेनॉपॉज ” नावाचं एक सत्र तिच्या आयुष्यात सुरू झालं होतं म्हणे. हार्मोन्स कमी जास्त झालेत की, असं होतं म्हणे. यावर उपाय एकच की, घरच्यांनी तिचे मुड्स, सांभाळायचे ! (आता इथे एवढा वेळ कुणाला आहे ?) शिवाय आजवर मी सर्वांसाठी केलं, आता तुम्ही माझ्यासाठी करा.

हे लिहिण्यामागचा हेतू एवढाच आहे की, खरंच मेनॉपॉज आणि मानसिक अवस्था यांचा म्हणावा इतका ” मोठ्ठा ” संबंध आहे का? हे कबूल आहे, की त्यावेळी जरा शारीरिक बदल होतात. पाळी येतानाही आणि जातानाही. मात्र गेल्या काही वर्षात हे ” त्रासाचं ” प्रमाण जरा जास्तच वाढलंय असं वाटतं.

मृणालचीच गोष्ट घेऊन बघू या ! नवरा आता मोठ्या पदावर आहे. त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्यात. स्त्री – पुरुष असा बराच स्टॉफ त्याच्या हाताखाली आहे. जबाबदाऱ्या आहेत. घरी यायला कधी कधी उशीर होतो. शिवाय “तो अजूनही बरा दिसतो. “

मुलगा इंजिनिअरिंग थर्ड इअरला आहे. त्याचा अभ्यास वाढलाय. मित्रमंडळ वाढलंय. त्यात काही मैत्रिणीही आहेत. कॉलेज ॲक्टिव्हिटीज असल्याने घरात तो कमीच टिकतो. त्यात कॅम्पसची तयारी करतोय. मग त्याला वेळ कुठाय ?

मुलगी वयात आलेली. नुकतीच कॉलेजला जाऊ लागलीय. टीनएजर आहे. तिचं एक भावविश्व तयार झालेलं आहे. काहीही झालं तरी ती कॉलेज ” बुडवत ” नाही. घरी असली की, मैत्रिणींचे फोन असतात. सुटीच्या दिवशी त्यांचा एखादा कार्यक्रम असतो. फोनवर, प्रत्यक्ष हसणं खिदळणं, गप्पा होत असतात. तरीही ती आईला मदत करते. वॉशिंग मशीन लावणे, घरी आल्यावर भांडी आवरणे, अधेमधे चहा करणे. आताशा कूकर लावते, पानं घेते. जमेल तसं काही तरी ती करून बघते. जमेल तशी आईला मदत करते.

मृणाल मात्र आजकाल या प्रत्येकात काहीतरी खुसपट काढते. नवऱ्यावर पहिला आरोप, म्हणजे “त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही. घरी मुद्दाम उशिरा येतात. ऑफिसमधे सुंदर बायका असतात, तिथेच ते जास्त रमतात. मी आता जुनी झाले, माझ्यातला इंटरेस्ट संपलाय वगैरे वगैरे. शिवाय आगीत तेल टाकायला आजुबाजुच्या सख्या असतातच. मग हा स्ट्रेस अधिक वाढत जातो.

बाळ आधीच्या सारखं आईच्या भोवती भोवती नसतं. त्यांच्यातला संवाद थोडासा कमी झालाय. कारण विषय बदललेत. ” आता माझी त्याला गरजच नाही ” या वाक्यावर नेहमीच तिची गाडी थांबते. त्याचं स्वतंत्र विश्व काही आकार घेतंय, ही गोष्टच तिच्या लक्षात येत नाही. ते बाळ आता हाफचड्डीतलं नाहीय. मोठं झालंय.

मुलीचंही तेच. तिच्या जागी स्वतः ला ती ठेवून बघतच नाही. सतत “आमच्यावेळी ” ची टकळी सुरू असते.

याचा दृश्य परिणाम एकच होत जातो की, ते तिघंही हळूहळू हिला टाळताना दिसतात. ” रोज मरे त्याला कोण रडे ” ही परिथिती येते. कारण कसंही वागलं तरी परिणाम एकच. कितीही समजून घेतलं तरी आई फक्त चिडचिड करते. मग त्याला एक गोंडस नाव मिळतं ” हार्मोन्स इम्बॅलन्स. मेनॉपॉज. “

डॉक्टरी ज्ञानाला हे चॅलेंज नव्हे, हे आधी लक्षात घ्या. पाळी येताना आणि जाताना बाईमधे अनेक बदल होतातच. पण ते ती कशा त-हेने घेते यावर अवलंबून आहे. जसं दुःख, वेदना कोण किती सहन करतं यावर अवलंबून असतं अगदी तसंच !

एक गोष्ट इथे शेअर करते. माझ्या बाळंतपणाच्या वेळी, माझ्या बाजूलाच माझ्या नवऱ्याच्या मित्राची बायको होती. मित्र संबंध म्हणून एकाच खोलीत आम्ही दोघी होतो. तिला पहाटे मुलगा झाला. ती आदली रात्र तिने पूर्ण हॉस्पिटलमधे रडून / ओरडून गोंधळ घालून घालवली. माझीही वेळ येतच होती. पण माझ्या तोंडून क्वचित ” आई गं ” वगैरे शिवाय शब्दच नव्हते. कळा मीही सोसतच होते. माझा लेबर रूममधून माझा ओरडण्याचा काहीच आवाज येत नाही हे बघून, माझी आई घाबरली. खूप घाबरली.. कारण आदली रात्र तिने बघितली होती.

रात्री बारा चाळीसला मला मुलगा झाला. माझं बाळ जास्त वजनाचं हेल्दी होतं. काही अडचणीही होत्या. पण सर्व पार पाडून नॉर्मल बाळंतपण झालं. तेव्हाच लक्षात आलं की, सुख दुःख हे व्यक्तीसापेक्षच असतं.

चाळीस ते पन्नास किंवा पंचावन्न हा वयोगट प्रत्येकच स्त्रीच्या वाट्याला येतो. एखादी विधवा बाई, संयुक्त कुटुंबातील बाई, परित्यक्ता, प्रौढ कुमारिका ते सगळं सहज सहन करून जाते. कारण ” रडण्यासाठी तिला कुणाचा खांदा उपलब्ध नसतो. ” तिला वेदना नसतील का? अडचणी नसतील का? पण ती जर रडत चिडत बसली तर, कसं होणार ? जिथे तुमचं दुःख गोंजारलं जातं, तिथेच दुःखाला वाचा फुटते. अन्यथा बाकिच्यांची दुःखे ही मूक होतात. असो !

हे सर्वच बाबतीत घडत असतं. कारण, परदुःख शीतल असतं. हे वाचून अनेकांचं मत हेच होईल की, ” यांना बोलायला काय जातं ? आम्ही हे अनुभवतोय. ” याला काही अंशी मी सहमत आहे. पण पूर्णपणे नाही. प्रत्येकच नवरा खरंच सुख बाहेर शोधतो का? घरातल्या पुरुषाला सुख बाहेर शोधावे लागू नये, इतकं घरातलं वातावरण नॉर्मल असलं तर तो बाहेर का जाईल ? आपल्या म्हणजे स्त्रियांच्या जशा अनेक अडचणी असतात, तशाच पुरुषांच्याही असतात, हे जर समजून घेतलं तर, वादाच्या ठिणग्या पडणार नाहीत. क्वचित पडल्याच तर तिचा भडका होणार नाही.

पंख फुटल्यावर पाखरंही घरट्याच्या बाहेर जातात, मग मुलांनी याच वयात आपलं करिअर करण्याचा प्रयत्न केला, तर सर्वतोपरी त्यांना मदत करायलाच हवी ना?

मुलींना वेळेतच जागं केलं, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तर मुलगीच तुमची मैत्रिण बनते. जरासं आपणही तिच्या वयात डोकावून बघावं. तिच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघावं.

आपली चिडचिड होणं स्वाभाविक आहेच. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, रडून चिडून जर परिस्थिती बदलत असेल, तर खुशाल रडा. पण आहे त्या परिस्थितीशी आपली मनस्थिती जुळवून घेतली तर, आणि तरच घरात संघर्षाची परिस्थिती निर्माण होणार नाही. कारण कपड्याची एखाद्या ठिकाणची शिवण उसवली तर, जसं ज्याला शिवता येईल तसं शिवून टाकावं. अन्यथा तो कपडा कामातून जाईल हे लक्षात असू द्यावं.

यासाठी खूप काही करायला हवंय का? नाही ! आपला भूतकाळ आठवून वर्तमानाशी जुळवून घ्यावं. ” मी तरूण असताना मला माझी आईच तेवढी ग्रेट वाटायची. सासू नव्हे. ” हे आठवावं. बहीण भावाला आणि दीर नणंदांना दिलेले गिफ्ट आठवावे. आपल्या घरात सासर आणि माहेरपैकी कुठली वर्दळ अधिक होती/आहे हे बघावं. त्यानुसार आपल्या नवऱ्याचं वागणं, याचा विचार करावा.

विषय जरा वेगळ्या बाजूला कलतोय, हे कळतंय ! यावर पुढे सविस्तर बोलूच.

पण सध्या एवढंच लक्षात ठेवूया मैत्रिणींनो की, मेनॉपॉज किंवा तत्सम अडचणींवर सहज मात करता येते, त्याचा बाऊ न करता. त्यासाठी फक्त आपली मनस्थिती बदलूया!

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

एकदम खरं आहे.लेखातले सगळे मुद्दे पटले.