सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ एका टिंबाचा फरक… भाग -1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

घरात गुढी उभारण्याची गडबड चालू असतांना एकदम लक्षात आलं की दारात रांगोळी काढायची राहिली आहे. मग घाईने रांगोळीचा डबा घेऊन दाराशी गेले. सात आडवे सात उभे ठिपके काढून रेषा जुळवायला लागले. पण काहीतरी चुकत होतं. काढलेल्या रेषा पुसत होते, पुन्हा ठिपके जोडत होते– पण नाहीच.  बऱ्याच वेळाने लक्षात आलं की एकदा ठिपके मोजून पहावेत — तर एका ओळीत मी सातच्याऐवजी चुकून आठ ठिपके काढले होते. मग झटकन ते जास्तीचं टिंब पुसून टाकलं, आणि मनासारखी रांगोळी जमून आली. नंतर कितीतरी वेळ घरातल्या कामात बुडून गेले खरी, पण रांगोळीतलं ते पुसलेलं टिंब काही मनातून जाईना. जरा निवांत झाल्यावर तर त्या टिंबाभोवतीच मन फिरायला लागलं —–

गणितातलं काय किंवा अक्षरलिपीतलं काय,’ टिंब ‘ हे सगळ्यात लहान चिन्ह. पण “ मूर्ती लहान पण कीर्ती महान “ या क्याट्यागिरीत चपखल बसणारं. चुकून जरी याची जागा चुकली, तरी एका लाखाचे दहा लाख किंवा दहा लाखाचे एक लाख व्हायला क्षणाचाही वेळ लागत नाही. आणि वर्तुळाच्या केंद्रस्थानी असणारं टिंब नजर चुकवून जरासं जरी हललं, तर त्या वर्तुळाचं वाटोळं का झालं हे कळायला मात्र वेळ लागतोच. म्हणूनच गणित  म्हणजे आपल्या हातचा मळ आहे म्हणत कॉलर ताठ करणाऱ्यांना हा एक छोटासा जीव कसा कधी चितपट करेल, सांगता येत नाही. एका  टिंबावरूनही ज्ञानाची परीक्षा करता येते ती अशी — शितावरून भाताची व्हावी तशी. 

अक्षरलिपी वापरत असतांनाही एक टिंब  खूप उलथापालथ करू शकतं. म्हणजे योग्य ठिकाणी पडलं तर त्या मजकुराची, त्याच्या अर्थाची परिपूर्णता — आणि चुकीच्या जागी पडलं तर लगेच अर्थाचा अनर्थ. — आणि नाहीच कुठे पडलं, तर रुळावरून घसरलेल्या आगगाडीसारखी मजकुराची फरपट. बघा ना –त्या टिंबाचा जीव तो केवढा — आणि त्याची ताकद किती मोठी. उदाहरण म्हणून मंदिरातल्या म वरचं टिंब काढून बघा की.

टिंबाचं असणं किंवा नसणं प्रकर्षाने जाणवावं, अशी माणसामाणसातली काही खास वैशिष्ट्यपूर्ण नातीही असतात. त्यातलं आवर्जून जाणवणारं नातं म्हणजे –” आई – मुलगी — कायद्याने आई “ यांचं. ‘यात काय आहे सांगण्यासारखं ‘ असं वाटेल. पण खरंतर टिंबाचं महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित व्हावं, असं या नात्यात अनेकदा आणि जागोजागी घडत असतं. म्हणजे — आईने केलेली जी एखादी गोष्ट खूप छान वाटते, तीच गोष्ट “ आईंनी “ अगदी तशीच केली तर नाक नकळतच मुरडलं जातं. इथे आईच्या आणि आ’ईं’च्या करण्यात तसूभरही नसलेला फरक, केवळ त्या एका  टिंबामुळे जाणवतो – टोचतो -नाक मुरडायला लावतो. तिच्या आईने तिला माहेरपणाला बोलावलं की ती आनंदाने फुलून जाते. पण आ’ईं ‘नी त्यांच्या मुलीला माहेरपणाला बोलावलं तर मात्र तिचा चेहेरा रागाने फुलतो. — “ अगं जरा नीट कपडे घाल. हे असे कपडे शोभत नाहीत आता “, असं आईने म्हटलं, तर नुसती मान उडवून हसत तिथून निघून जाणं, किंवा लाडाने आईला मिठी मारणं,एवढ्यावर तो विषय संपतो. पण हेच जर आ’ईं ‘नी, अगदी “ बोलू की नको “ असा विचार करत चाचरत सांगितलं, तरी  क्षणात आकाश- पाताळ एक होतं — पार लग्न केल्याचाच पश्चात्ताप व्हायला लागतो — नवऱ्याची ‘शाळा’ घेतली जाते. आणि मग… ‘ नको बाई, आपल्यामुळे या दोघांमध्ये भांडण नको ‘ म्हणत समजूतदार आ’ईं ‘ना  ( विशेषतः हल्लीच्या काळातल्या ) असले विषय काढायचेच नाहीत असा कायमचा निर्णय घेत, डोळे – कान बंद करावे लागतात.अर्थात ही फक्त काही उदाहरणे.  पूर्वीच्या काळीही या एका इवल्याशा  टिंबामुळे त्या कायमसाठी जोडल्या गेलेल्या नात्यांचे अर्थ – जाणिवा, बदलत असणारच हे नक्की. पण आता मात्र “ आधुनिक जीवनशैली “ या नावाखाली, सगळंच चव्हाट्यावर आणण्याचा अट्टाहास हा एक छंद समजला  जायला लागलाय अशी शंका येते. आणि त्यामुळे, खरंतर अनावश्यक असणारं ते टिंबही प्रकर्षाने जाणवायला लागलंय –आणि या नात्यांमधली त्याची लुडबुडही  जास्तच जाणवायला लागली आहे.

क्रमशः….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
4 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments