श्री अरविंद लिमये
विविधा
☆ एक गूढ निरोप. . . भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆
कांही कांही अनुभव अविस्मरणीय असतात. कुंटे कुटुंबियांच्या बाबतीतला हा अनुभवही असाच. त आमच्या बँकेच्या सोलापूर (कॅंप) ब्रँचमधे मी मॅनेजर होतो त्यानिमित्ताने माझ्या संपर्कात आलेले कुंटे आजोबा. आमच्या बँकेचे ग्राहक. एक हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्त्व.
मी नवीनच रुजू झालो होतो त्या ब्रॅंचला, त्यानंतरच्या पहिल्याच एक तारखेची गोष्ट. नेहमीप्रमाणे पेन्शनर्सची खूप गर्दी. केबिनमधून बाहेर लक्ष गेलं तेव्हा जाणवलं की त्या गर्दीत बसायला जागा नसल्यामुळे एक वृद्ध गृहस्थ माझ्या केबिनलगत अवघडून पाठमोरे उभे आहेत. मी शिपायाला सांगून त्यांना आत बोलावलं. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. ती खरं तर माझ्या दृष्टीने मीच करायला हवी होती अशी एक साधी गोष्ट होती. पण हीच माणूसकी मला पुढे अनेक पटीने बरंच कांही देऊन गेली. कारण त्यानंतर ते केबीनमधून बाहेर गेले ते माझ्याबद्दलचा एक सद् भाव मनात घेऊनच.
कुंटे आजी-आजोबा, त्यांची दोन्ही मुलं-सुना, मुलगी-जावई सर्वचजण निंबाळ संप्रदायातले. गुरुदेव रानडे यांचे उपासक. त्यांनीच मला आवर्जून आग्रहाने एकदा निंबाळला नेले होते. कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडांचं अवडंबर नसलेलं, तिथलं वातावरण मला खूप भावलं होतं. भक्तीमार्गाचे अनुसरण करून मानवजन्माचे सार्थक करण्याची शिकवण हे निंबाळ-संप्रदायाचे वैशिष्ट्य. त्यामुळे नित्यनेमाने नामसाधना हे कुंटे आजी-आजोबांचे अढळ श्रध्देने स्विकारलेले व्रतच होते. त्यांचे सोलापूर येथील कॉलेजमधे प्राध्यापक असणारे चिरंजीव श्री. नरेंद्र कुंटे हे या संप्रदायातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते. भक्तीमार्गावरील अनेक थोर विभूतींच्या ग्रंथरचनांचे विश्लेषण करणारे त्यांचे अतिशय सुबोध लेखन आणि त्यावरील त्यांची निरूपणं सर्वसामान्यांच्या अनेक शंकांचे निरसन करीत त्यांना मार्ग दाखवीत असत. या कुंटे कुटुंबीयांबद्दल तिथे आलेल्या सर्वच उपासकांना वाटत असलेलं प्रेम आणि निष्ठा पाहून माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावला होता.
कुंटे आजीही अतिशय शांत,हसतमुख,अगत्यशील. त्यांचा एक मुलगा (श्री. नरेंद्र कुंटे), सून, नातू सोलापूरला त्यांच्याचजवळ. दुसऱ्या मुलाचं बि-हाड नोकरी निमित्ताने मुंबईला. मुलगी-जावई पुण्यात.
त्या घरची दिवाळी त्या सर्वांसाठीच एक हवाहवासा आनंदसोहळा असे. कारण आजी-आजोबाची इच्छा म्हणून सर्व कुटुंबियांची दिवाळी दरवर्षी सोलापूरच्या बंगल्यातच उत्साहात साजरी व्हायची. त्यामुळेच दिवाळी म्हणजे कुंटे कुटुंबियांसाठी एक सत्संग आणि आनंदोत्सवच असायचा. परगावचे मुलगा,सून लेक-जावई, नातवंडे सर्वचजण दिवाळीचे चार दिवस आवर्जून सोलापूरला येत.
एका दिवाळीला असेच सर्वजण जमलेले असताना जावई आग्रहाने म्हणाले, “आता यापुढे दरवर्षी दिवाळीला आपण आलटून पालटून प्रत्येकाच्या घरी एकत्र जमू या कां? त्याशिवाय आमच्या बि-हाडी सगळ्यांचं येणं कसं होणार?”
मुंबईच्या मुलासूनेनं ही कल्पना उचलून धरली. एरवीही त्यात नाकारण्यासारखं कांही नव्हतंच. आजोबांनी आजींकडे पाहिलं. आजीनी हसून संमतीदर्शक मान हलवली. मग सर्वानुमते पुढच्या वर्षाची दिवाळी लेकीच्या घरी पुण्यात करायची असं ठरलं.
पावसाळा संपत आला तशी आजींच्या मनात चलबिचल सुरू झाली.
“आपल्या नामसाधनेला पुढच्या वर्षी एकवीस वर्षं पूर्ण होतायत. त्यानिमित्ताने आपण निंबाळला सत्संग आयोजित करणार आहोत. त्यानंतर पुढे लगेचच दिवाळी येईल. या वर्षी तरी दिवाळी पाडव्याची आपली नामसाधना आपल्याच वास्तूत व्हावी असं आपलं मला वाटतं. मग त्यानंतरच्या दिवाळीपासून हवंतर जावई म्हणताहेत तसं करू. ” त्यांनी आजोबांना सुचवलं.
ते विचारात पडले. त्याना काय बोलावं ते सुचेचना. “पण थोडक्यासाठी त्यांना दुखवल्यासारखं होईल. नकोच ते. ठरलंय तसं होऊ दे. “ते म्हणाले.
आजी हिरमुसल्या.
“ठरलंय तसं करु,पण नाईलाज झाला तरच. मी बोलेन जावयांशी. समजावेन त्यांना. सांगून बघू तरी काय म्हणतात ते” आजी म्हणाल्या. जे जे होईल ते ते पहावे असा विचार करुन आजोबा नाईलाजाने गप्प बसले.
क्रमशः —-
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈