सुश्री गायत्री हेर्लेकर

? विविधा ?

☆ ऐक सखे श्रावण कहाणी… ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

“आला आला श्रावण.

घेऊन संगे सण “

माणसाच्या सुखदःखाची नाळ निसर्गाशी जोडलेली आहे.

म्हणून ज्येष्ठ आषाढातील धुवाधार पावसामुळे समाधान पावलेला निसर्ग नंतर येणाऱ्या श्रावणात आनंदाची  ऊधळण करतो .आणि माणुसही त्या आनंदात सामावून सणांची लयलूट करतो,निसर्गाप्रत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पृथ्वी,आप,तेज,वायू ,आकाश या निसर्गातील चैतन्यशक्तींचे पुजन –हीच सणावारांची बैठक .

आणि श्रावणमास म्हणजे सणांची लयलुट –उत्साहाची ,ऊल्हासाची,खाण्यापिण्याची बरसात.

श्रावणात–

सोमवार ते रविवार ,आणि प्रतिपदा ते पोर्णिमा-अमावस्या प्रत्येकाची वेगळीच कहाणी,.

कहाणीवरुन आठवले लहानपण.

माहेरचा श्रावण,–रोज रात्री त्या त्या दिवसाच्या कहाणीचे आईच्या गोड स्वरातील वाचन.हातात मोत्याच्या नसल्या तरी तांदळाच्याअक्षता घेऊन आमचे उडत उडत ऐकणे.

बालबुद्धीमुळे मनात काहीबाही शंका जरुर येत असत.पण एकंदरित तो कार्यक्रम आवडायचा.

परवाच   श्रावणाच्या आधीची साफसफाई करतांना आईने दिलेले ,”सचित्र कहाणी संग्रह” पुस्तक हाती आले.अन् मनात विचारचक्र सुरु झाले. पूर्वापार ,एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे चालत आलेल्या या कहाण्या–पुर्वी कदाचित बोधप्रद असतील.पण आता कालबाह्य झाल्या.

कारण या कहाण्या म्हणजे धार्मिक रितीरिवाजांच्या ,व्रतवैकल्यांच्या सामान्य माणसाकडून त्यांचे पालन व्हावे म्हणुन सांगितलेल्या कथा—लोककथा.

सुरवातीला मौखिक प्रचार नंतर  लिखित स्वरुपात आल्यावर त्यांना साहित्यिक दर्जा प्राप्त झाला.

त्या माहितीपर आहेतच पण साधे शब्द,सुटसुटीत वाक्ये,एक लयबद्धता त्यामुळे गोडवा निर्माण होऊन लोकप्रिय झाल्या.

कथेची सुरवात साधारणपणे

“आटपाट नगर होते—“

पासुन म्हणजे आठ पेठांचे- मोठे नगर.,आणि शेवट “साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण” अपवाद गणेशाच्या कहाणीचा.ती मात्र पाचा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

दिवस कोणताही असो,  कहाणी वाचनाची सुरवात ,

“ऐका गणेशा तुमची कहाणी–“

अशीच करायची,”श्रावण्या चौथी घ्यावा,माही चौथी संपुर्ण करावा” आणि वसा पुर्ण करतांना सांगितलेले दानाचे, –सत्पात्री दानाचे महत्व या कहाणीतुन आपण  आजही लक्षात घेऊ शकतो.आचरणात आणु शकतो.

श्रावणाच्या आदले दिवशी—on the eve of—श्रावण -येते ती “दिव्याची अवस” — उंदरावर खाण्याचा खोटा आळ घेणाऱ्या सुनेच्या चुकीचे परिमार्जन ती नियमित करत असलेल्या प्रकाशपुजनाने कसे होते हे या कहाणीत सांगितले अज्ञानामुळे अन्याय होतो,त्यावर उपाय  ज्ञानरूपी प्रकाश, त्या अर्थाने हे ज्ञानाचे च पुजन आहे.

ॠण काढुन सण साजरा करणे हा एक गैरसमज कालाच्या ओघात जनमानसात रूढ झाला होता,म्हणुन पुढेपुढे सणांविषयी नकारात्मकता वाढत गेली. पण  दित्यराणुबाईची कहाणी नीट वाचली तर एखादी गोष्ट परवडत नसतांनाही ठराविक पध्दतीने,केलीच पाहिजे असे मुळीच नाही .हे लक्षात येते.,”संपुर्णास काय करावे “?  “—–चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळेसरी द्यावी,आणि नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी” असे सांगितले आहे.या कहाणीतुन आणखी एक बोध घेता येतो,सासरी कितीही श्रीमंती असली,किंवा आपण कितीही उच्चपदस्थ गेलो तरी जन्मदात्याचा –पित्याचा  अनादर करु नये.

श्रावणी सोमवारच्या तशा २,४ कहाण्या आहेत. पण म्हातारीची—आणि तिच्या खुलभर दुधाची कहाणी सर्वांना भावते.

शेकडो घागरी दुध ओतुनही न भरलेला महादेवाचा गाभारा तिच्या खुलभर दुधाने भरतो. यावर राजाने विचारलेल्या प्रश्नाचे तिने दिलेले उत्तर अध्यात्मिक संदेश देते. देव देवळात नाही तर प्रत्येक प्राणीमात्रांत आहे. त्यांची सेवा, त्यांना संतुष्ट  ठेवणे हीच देवाची पुजा, ही एक प्रकारची कर्मपुजाच म्हणता येईल.

श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरी पुजनानंतर मंगळागौरीची कहाणी वाचलीच जाते. पतीला वाचवण्यासाठी वेळप्रसंगी पत्नी ढाल बनते, साहस करते हे या कहाणीत आहे. आजच्या स्त्रीला तर “रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग” म्हणुन लढावे लागतेच.

बुध बृहस्पती—-बुध, गुरू हे दोघेही बुध्दीचे अधिष्ठाते. नकळत चुक होऊ शकते पण झालेल्या चुकीला सद् सद् विवेकबुद्धीने सुधारता येते हे बुधबृहस्पतीच्या कहाणीतली धाकटी सुन सांगून जाते.

सत्य कितीही लपवले तरी शेवटी ते बाहेर येतेच हे  शुक्रवारची जीवतीची कहाणी सांगते. तर गरीब बहिणीचे नाते झिडकारून उपरती होणाऱ्या भावाची –शुक्रवारची देवीची कहाणी आहे. लक्ष्मी चंचल आहे, आज नसेल तर उद्या उदंड वर्षाव करते –दिवस पालटणार, म्हणुन  श्रीमंतीचा वृथा अभिमान बाळगु नये हा बोध या कहाणीतुन मिळतो.

शनिवारची मारुतीची कहाणी आहे. तसेच संपत शनिवारची कहाणी आहे. आपल्याकडे जे आहे त्यातले थोडे तरी गरजूंना द्यावे –हीच खरी संस्कृती, हे या कहाणीत सांगितले आहे, “अतिथी देवो भव” हा विचारही या कहाणीतुन दिसतो.

सात वारांच्या या कहाण्या प्रमाणेच इतरही सणांच्या कहाण्या श्रावणात आवर्जुन वाचल्या जातात, नागपंचमीच्या दोन्ही कहाण्यातुन पशुप्राण्यांबाबत कसे भाव असावेत हा बोध मिळतो,आपण प्रेमाने जोपासना केली तर त्यांच्यापासून भय बाळगण्याचे कारण नाही हे लांडोबा पुंडोबाच्या कहाणीत दिसुन येते..

नागपुजा प्रातिनिधिक म्हणुन केली जात असेल पण तशीच प्रेरणा घेऊन सर्पमित्र सारख्या संघटना काम करत असतात.

वर्णसटीच्या कहाणीतील ७व्या मुलीने दिलेले उत्तर “मी माझ्या नशीबाची” यावरुन व्यक्तिचे यशापयश  स्वकर्तृत्वावर ठरते. पण त्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो.  अलिकडच्या काळात सिनेजगत, राजकारण, काही व्यवसायातील वाढते नेपोटिझम बघतांना या कहाणीची आठवण होते.

निसर्गाच्या चेतनाशक्तीतला महत्वाचा स्त्रोत “आप” “जल”. त्याचे महत्व आणि पुजन शितलासप्तमीच्या कहाणीत आहे. सध्या आपल्यापुढे “पाणी” हा ज्वलंत प्रश्न आहे भविष्यात आणखी गंभीर होणार आहे, म्हणुन जलसंधारण, जलसंवर्धन,काटकसरीने वापर, —एवढे मार्गदर्शन या कहाणीतुन घेतले पाहिजे.

पिठोरी अमावस्येची कहाणी—

मुलाबाळांचे आरोग्यसंवर्धन — म्हणजे पुढची पिढी सुदृढ बनवणे — याचे महत्व त्रिकालाबाधित आहे, हल्ली, १, २च अपत्ये असल्यामुळे, नानाविध सुविधांमुळे जागरुकता नक्कीच निर्माण झाली आहे, पण बरेचवेळा बाहेरचे, फास्टफूड, डबाबंद पदार्थ यांचे वाढते प्रमाण, तसेच बदलती जीवन शैली —यामुळे लहान वयात च गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात, अर्थात, हे सार्वत्रिक विधान नाही, तरीही जागरुकता हा बोध या कहाणीतुन घेता येईल.

अशी ही श्रावण महिन्यातील कहाण्यांमधुन घेता येणाऱ्या बोधाची —   साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण.

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments