सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
विविधा
☆ ‘ओटी आईची…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
आजपासून अधिक महिन्याची सुरूवात! गेला आठवडाभर वाॅटसपवर याविषयी वेगवेगळे लेख आणि माहिती वाचतेय. अधिक महिन्यात काय काय करावं, म्हणजे कोणती व्रतवैकल्ये करावी, पोथ्या-पुराण वाचावी, जावयाला ३३ जाळीदार वस्तूंचं वाण द्यावं इ.इ. त्याचबरोबर फक्त अधिक महिन्यात लेकीनं आईची ओटी भरावी, आईला साडी घ्यावी, असंही वाचलं. अन् मन विचाराच्या भोवऱ्यात गरगरायला लागलं.
अशी साडी वगैरे देऊन अधिक महिन्यात तुझीओटी भरण्याचा एखादाच प्रसंग मी अनुभवला असणार. कारण ठळकपणे असं फारसं आठवत नाहीये. माझ्या लग्नानंतर जेमतेम ६ वर्षांनीच तू देवाघरी गेलीस.
माझा याप्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याला अजिबात आक्षेप नाही. पण खरंच का अश्या ओटी भरण्यानेच फक्त आईबद्दल कृतज्ञता व्यक्त होते. आणि माझ्या मनाने ठामपणे याचं उत्तर *नाही * असं दिलं.
लग्नापूर्वी तर तुझ्यासोबतच राहात होते. पण संसारात पडल्यावर क्षणोक्षणी तुझी आठवण येतच राहिली. *लेकरासंगे वागताना थोडी थोडी समजत जातेस * असं सहजपणे लिहून गेले माझ्या कवितेत ते उगाच नाही. तू आपल्या वागण्यातून रूजवलेले संस्कार, नक्कीच माझं आयुष्य सुंदर करत गेले आणि आजही करत आहेत.
अगदी लहान वयात तू लावलेली वाचनाची सवय, आयुष्यातील अनेक अवघड परीक्षा यशस्वीपणे पास होण्यासाठी नकळत कारणीभूत ठरली. कारण आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड देण्यासाठी विचार करण्याची कुवत आणि वैचारिक बैठक त्यातूनच तयार झाली. तुझं स्वतःचं उदाहरण तर नेहमीच माझ्या डोळ्यांसमोर असतं.
मराठी आणि हिंदी भाषांवरील तुझं प्रभुत्व, शुद्धलेखनाचा आग्रह, यामुळेच माझ्या लेखनात सहसा शुद्धलेखनाची चूक आढळत नाही. याआणि जी काही कमतरता राहते, तो नक्कीच माझा आळशीपणा किंवा अज्ञान. पण या गोष्टींसाठी प्रशंसा होते तेव्हा तेव्हा तुझ्या आठवणीने नेहमीच डोळे भरून येतात. 🥲😢
परिस्थितीनं नववीतच शिक्षण सोडायला लागलं तरी आपल्या अखंड आणि अफाट वाचनामुळे तू मिळवलेलं ज्ञान आणि वैचारिक समृद्धी, ही अनेक शैक्षणिक पदव्या मिळवलेल्या व्यक्तींपेक्षाही कितीतरी उच्च दर्जाची होती, हे मला पदोपदी जाणवतं. म्हणूनच अगदी लहान वयात आमच्या हाती श्रीमान योगी, स्वामी, झेप, मृत्युंजय यासारखी पुस्तकं होती. चौथीला स्काॅलरशिप मिळाल्यावर तू घेऊन दिलेलं साने गुरुजींचं, चित्रा आणि चारू, हे पुस्तक उदात्त प्रेम आणि मैत्री कशी असते, असावी हे नकळत शिकवणारं!
स्वतःसाठी पुरेसं नसतानाही, त्यातलंच दुसऱ्याला देऊन मदत करण्याची तुझी सह्रदयता, माणुसकी या गोष्टी मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. मग ती साधी वाटीभर आमटी, कामवाल्या राधाबाईंसाठी मुद्दाम काढून ठेवण्याची गोष्ट असो की आणखी काही!
आम्हां पाचही मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण देऊन ताठ मानेनं, स्वाभिमानानं जगायला शिकवताना, बाबा आणि तू, दोघांनी सोसलेल्या अडचणी आणि केलेल्या त्यागाला तोडच नाही. त्या ऋणातून उतराई होणं या जन्मी तरी जमेल असं वाटत नाही ग! 🙏
असे संस्कार घडवणारी आई लाभणं हे आमचं महद्भाग्य! असे कितीतरी प्रसंग आणि आठवणी! कोणीतरी म्हटल्याप्रमाणे *आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई, तरी लिहून होणार नाही,आई तुझी थोरवी! पण माझी ही शब्दरूपी ओटी तुला समाधान देईल, असा मला विश्वास आहे.
आणि हो हे वाचून, सगळ्या मुलामुलींना शब्दांत व्यक्त करता आलं नाही तरी, आपापल्या आईची आठवण काढून ते तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील याची मला खात्री वाटते. ज्यांच्या नशिबी अजून मातृसौख्य आहे, ते भाग्यवान या निमित्ताने पुन्हा एकदा आईच्या कुशीत शिरण्याचा सुखद अनुभव घेतील. तिची प्रेमानं, आपुलकीनं चौकशी करतील आणि काळजीही घेतील. बाकीचे तिचे स्मरण करून, तिच्या संस्कारांचा वसा चालू ठेवतील, तर ही ओटी सुफळ संपूर्ण होईल.
© सुश्री प्रणिता खंडकर
दि. १८/०७/२०२३
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈