सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

ओंजळ☆ सौ शालिनी जोशी

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती।

करमुले तू गोविंदम् प्रभाते कर दर्शनम्।।

सकाळी झोपेतून जागे झाल्यावर आपण दोन मिनिटे अंथरुणावर बसून वरील श्लोक म्हणतो. यावेळी आपण दोन्ही हात एकमेकांना चिकटवून त्याची ओंजळ करतो. त्यावर लक्ष स्थिर करून त्यामध्ये सामावलेल्या लक्ष्मी आणि सरस्वती आणि गोविंद यांचे दर्शन घेतो. त्यांची आठवण ठेवून हाताने दिवसभर कार्य करण्याची जणू आपण प्रतिज्ञा करतो. लक्ष्मी आणि सरस्वती यांना प्राप्त करण्याचे सामर्थ्य तो गोविंद करमुले स्थित होऊन आपणाला देतो. असे हे ओंजळीचे महत्त्व तीनही देवांचे वरदान ओंजळीत आपण सामावून घेतो. त्यामुळे सर्व दिवस सार्थकी लागतो.

ओंजळ म्हटलं की समोर येते पारिजातकाच्या किंवा मोगऱ्याच्या फुलांनी भरलेली ओंजळ. ओंजळीत ही फुले अलगदपणे सांभाळली जातात. त्याच्या कोमल पणाला कोणताही धक्का लागत नाही. देवाला फुले वाहताना ओंजळीने वाहतात. ओंजळ मोकळी झाली तरी सुगंध टिकून राहतो. कोणाला दान द्यायचे झाले तरी देणाऱ्याच्या ओंजळीने घेणाऱ्याच्या ओंजळीत दिले जाते. खूप तहान लागली तरी ओंजळभर पाणी समाधान करते. सूर्याला अर्ध देताना ओंजळीने देतात. हात उंचावून ओंजळभर पाणी त्याला अर्पण करतात. सवाष्णीची किंवा देवीची ओटी भरताना ओंजळीतून तांदूळ सुपारी ओटीत घालतात. लाजलेली स्री आपले तोंड ओंजळीत लपविते, तर दुःखी स्त्री ओंजळीत आपल्या अश्रूंना वाट करून देते. ओंजळीत आपण देवाचा प्रसाद घेतो. प्रियजनांचे हात ओंजळीत घेतल्यावर वेगळ्या प्रेमाची अनुभूती येते. कोणाला धीर देतानाही दोन्ही करतल आपल्या करतलात घतले की दिलासा मिळतो. या अंजलीचे दोन्ही हात जेव्हा जवळ येतात तेव्हा नमस्कार होतो. मिटलेली ही ओंजळ नम्रता शिकवते. अशा प्रकारे ओंजळ भासते छोटी पण असते मोठी. हेच दातृत्वाचे रूप, भावनेचे द्योतक. स्वीकारायला ओंजळ तशी द्यायलाही. ती रिती होत नाही, भरत असते कधी सुखदुःखाने तर कधी आशीर्वादाने.

एखादा मानी म्हणतो मी कोणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. म्हणजे दुसऱ्याच्या पदरचे खाणार नाही. ओंजळीला अंजली असेही म्हणतात. तर ज्ञानेश्वर ‘अंजुळी’ म्हणतात. अकराव्या अध्यायाचे शेवटी ते म्हणतात,

भरुनी सद्भावाची अंजुळी। मिया ओविया फुले मोकळी।

अर्पिली अंघ्रियुगूली ।विश्वरूपाच्या।।

११/७०८

ज्ञानेश्वरांची ओंजळ ही सदभावाची आहे आणि ती ओव्या रुपी फुलांनी भरली आहे. विश्वरूपाच्या चरणांवर त्यांनी ती मोकळी केली आहे अर्पण केली आहे. ण

निसर्गाच्या रुपाने परमेश्वर असेच आपल्याला भरभरून देत असतो. घ्यायला आपली ओंजळ अपुरी होते.

अनंत हस्ते कमलाकराने

देता किती घेशील दो कराने।

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments