सुश्री गायत्री हेर्लेकर

? विविधा ?

☆ *औटघटकेची कलाकार* ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

१९८२-ची घटना.जानेवारी महिना; दुपारची वेळ,. मध्यप्रदेशातील राजनांदगांव स्टेशन. एक साधारण ३५शीतली बाई, खांद्याला पर्स कम बॅग,. आणि दोन्ही हातात कशीबशी सांभाळलेली, म्हणजे जरा कसरत करतच धरलेली सतार — अगदी छान गवसणी घातलेली, घेऊन नागपूरकडे जाणाऱ्या  रेल्वेची वाट बघत उभी होती. जरा कावरीबावरी, भिरभिरती नजर, चेहर्‍यावर  पुर्ण बावळटपणा.

तेवढ्या धाडधाड करत गाडी आली.

काही मिनिटांचा हॉल्ट म्हणुन सगळा जामानिमा सांभाळत, फारसा विचार न करता., शिरली समोर येऊन थांबलेल्या डब्यात.

“बहेनजी रिझर्वेशनका डिब्बा है, आप अंदर नही आ सकती”.अशा येणाऱ्या सूचनांकडे सोईस्कर दुर्लक्ष केले.

ओळखलेत ना सख्यांनो, कोण होती ती महाभाग.अहो कोण काय? “अस्मादिक”. हो मीच.

अन् गाडी सुटली की हो लगेच.

चला. कुठला का डबा असेना,

गाडी तर मिळाली म्हणुन “हुश्श” केले.

हातातली सतार सांभाळत कसेबसे पुढे जाणार. डोळे वर केले तर समोर काळ्या कपड्यातला टी. सी. वाटले बाणासुर, भस्मासुर. भीमासुर, बकासुर कोणीही समोर उभा ठाकला असता तरी घाबरले नसते हो. कारण कृष्णसखा, भीम, अर्जुन यांचा धावा तरी करता आला असता मदतीसाठी.

पण आता कोणाचा धावा करु? चेहरा करता येईल तेवढा ओशाळवाणा केला.”चला आयते सावज समोर आले” या नजरेने टी.सी.महाराज माझ्याकडे नखशिखांत बघायला लागले.सीतामाईसारखी धरणी नसली तरी रेल्वे पोटात घेईल  तर बरे असे वाटु लागले.

पण–पण— हातातल्या सतारीकडे बघत डोळ्यावरच्या चष्म्यातून बघत 

“बहेनजी, programme से आयी हो बंबईतक जाना है?.टिकेट दिखाओ, ये स्लीपर कोच है.आपका सीट नंबर?”

मनातल्या मनात “”अरे देवा. मुंबई कुठली? नागपूरपर्यंतचे साधे तिकीट आहे बाबा माझ्याकडे”.

पण आवंढा गिळत, मनात जुळवाजुळव करत, माझ्या फर्मास हिंदीमध्ये, “भाईसाब, वो क्या हुआ की, जल्दीसे, चुकीसे, सॉरी गलतीसे मैं जो सामने आया वो डब्बे मे चढ गई.  मुझे नागपुरतकही जाना है. आप कहते हो तो अगले स्टेशनपर दुसरे डब्बे मे जाऊंगी”. माझा जरा सामोपचार.अगदी बिनशर्त.

टी.सी. “आप पहिली बार इस ट्रेनसे ट्रॅवल कर रही होंगी.नागपुरतक ये ट्रेन कोनसेही स्टेशनपे जादा देर  रुकती नही.आपको फाईन देना होगा”.

हरे रामा. पुर्ण जर्नीच्या दीडपट–म्हणजे कलकत्ता-मुंबई तिकिटाच्या दीडपट.डोळ्यातुन पाणी यायचे तेवढे बाकी होते.

तेवढ्यात, तिथल्याच कंपार्टमेंट बसलेले एक वयस्कर गृहस्थ,”बेटी आप खैरागड –संगीत युनिव्हर्सिटी से आयी हो?”

क्षणाचाही विलंब न लावता मी “हां, हां, वहीसे”

“आप सितार बजाती हो.आओ.नागपुरतकही जाना है ना.४,५घंटेका सवाल.यहॉं बैठ सकती हो.”

अन् टी.सी. ला नागपुरपर्यंतच प्रश्ण आहे. आणि आता ही बाई एकटी कुठे जाईल. वगैरे सांगून मला बसायला परवानगी देण्यास अगदी मधुर शब्दात.अस्सल हिंदीचा लहेजा सांभाळत सांगितले. टी.सी.

“पंडितजी, आप करह तो इसलिये मै मानता हुं. बहेनजी बैठ सकती हो. मैं भी सितार बजाता हुं. चेकिंग करके आता हुं. आपसे बातचीत करनेके लिये.”

परत, धर्मसंकट. कारण, सतार काय साधे तुणतुणे ही मला वाजवायला येत नव्हते.

झाले काय होते. माझी नणंद खैरागडला रहात होती. तिचे मिस्टर त्या युनिव्हर्सिटीत तबल्याचे प्रोफेसर होते. त्यांचे नुकतेच अकाली निधन झाले होते. आणि तिला तिच्या मुलांना घेऊन लगेच कोल्हापुरला आणले होते. आणि तिथली क्वार्टर सोडायची म्हणुन तिचे सर्व सामान आणायला हे, मी आणि तिचे दीर गेलो होतो.

सर्व सामान २,३ दिवसात पॅक केले पण ट्रक वेळेवर न आल्याने त्या दोघांना सामान लोड करे पर्यंत तिथे थांबणे भाग होते. नागपुरला बहिणीकडे  माझ्या लहान मुलीला ठेवले होते म्हणुन मी मिळेल त्या गाडीने निघाले होते.नणंदेची सतार मला माझ्याबरोबर आणल्याशिवाय पर्याय नव्हता.

आणि माझ्या हातातील सतारीने मी कोणीतरी सतारवादक आहे असा गैरसमज झाला होता.आणि आता तो तसाच ठेवणे माझ्यादृष्टीने आवश्यकच होते.

कारण त्या सतारीमुळेच पंडितजींनी मला बसायला जागा दिली.

पण–पण बसल्याबसल्या पंडितजींनी गायन- वादन यावर माझे बौध्दिकच घेतले.शास्त्रीय संगीताचा माझा संबंध फक्त सा रे ग म —सरगमपुरताच.

बागेश्री, भीमपलास, मियाकी तोडी, जयजयवंती सगळे मला सारखेच.

काळी पाच, का काय ते ही मला माहित नाही. हिंदी बोलणे ही अगदी अफलातुन. पण पंडितजी खुप गप्पिष्ट. त्यात भर म्हणजे दिल्या शब्दाला जागुन टी. सी. महाशय ही

बातचीत करायला येऊन बसले. तेही संगीतातले दर्दी.

आणि मी ही तज्ञ(?) म्हणुन मलाही गप्पात सामिल करुन घेत होते.

कुठेतरी, काहीतरी जुजबी वाचलेले, ऐकलेले, आणि आठवणीत असलेले अधूनमधून बोलुन “हां भाईसाब, आप सही कहते हो.” “वा क्या बात है”

वगैरे वाक्ये फेकत, अस्तित्वात नसलेल्या गुरूचे, कधीही न केलेल्या मैफिलींचे – खोटे वाटणार नाही इतपत वर्णन करत – थापा मारत खिंड लढवत होते खरी. पण मनातल्या मनात कधी हसत , कधी घाबरत नागपुर लवकर येवो ही प्रार्थना करत होते.

कसाबसा प्रवास संपवला.

आणि घरी आल्यावर मात्र बहिण, मेहुणे, भाचे कंपनीला सर्वच किस्सा रंगवून सांगितला. आणि नंतरही जे भेटेल त्याला माझी कलाकारी सांगत होते,.

गायन -वादनातली नसेना का पण अभिनयातील औटघटकेची कलाकार म्हणुन यशस्वी ठरले.

 

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments