प्रा. अविनाश सप्रे
विविधा
☆ “औडक चौडक ताराबाई” ☆ प्रा. अविनाश सप्रे ☆
ताराबाई भवाळकरांची मराठी महामंडळाने दिल्ली येथे भरणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी केलेली निवड चतुरंग अन्वयसाठी या परिसरातील लेखक, कवींच्यासाठी आणि मुख्य म्हणजे समस्त सांगलीकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची घटना वाटणे साहजिकच म्हणता येईल, पण ही बातमी प्रस्तुत झाल्यानंतर बघता बघता समाज माध्यमातून, वृत्तपत्रातून, दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून, दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून प्रचंड प्रमाणात बाईच्यावर जो अभिनंदनाचा वर्षाव झाला, तो अभूतपूर्व स्वरूपाचा होता. सर्वसाधारणपणे संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावांची चर्चा सुरू झाली आणि नंतर प्रत्यक्ष निवड झाली. वादविवाद होतात, उलटसुलट चर्चांना उधाण येते, निवडीमागच्या राजकारणाबद्दल बोलले जाते, खऱ्या खोट्या बातम्या पसरल्या किंवा पसरवल्या जातात, असा आजवरचा अनुभव, पण ताराबाईची निवड असे काहीही न होता झाली आणि तिचे सार्वत्रिक स्वागत झाले. एवढेच नव्हे तर ताराबाईची निवड या अगोदरच व्हायला हवी होती, अशीही प्रतिक्रिया उमटली. ताराबाईच्या ज्ञानसाधनेबद्दल आणि बौद्धिक कर्तृत्वाबद्दल वाटणारा आवर या निमित्ताने प्रकट झाला असे म्हणता येईल.
पुण्यातील शनिवार पेठेच्या सनातनी आणि पारंपारिक, कर्मठ वातावरणात आणि चित्रावशास्त्रीच्या वाड्यात बाईचे बालपण व्यतीत झाले. पुढे त्यांचे कुटुंब नाशिकला गेले आणि तिथे त्यांची वैचारिक जडणघडण होऊ लागली. इथे त्यांना कविवर्य कुसुमाग्रजांचा सहवास लाभला. याच काळात त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद केला. त्यानंतर नोकरी निमित्ताने सांगलीस आल्या आणि इथे त्यांचे वैचारिक आणि वाड्मयीन कर्तृत्व बहाला आली आणि नामवंत विदूषी म्हणून त्यांचा लौकिक झाला. पंचावन्न वर्षापेक्षा अधिक काळापासून बाईचे सांगलीमध्ये वास्तव्य आहे आणि सर्वत्र संचार करूनही सांगली हीच आपली कर्मभूमी आहे असे त्या अभिमानाने सांगतात.
लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला या बाईच्या विशेष आस्थेचा, अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय राहिला आहे महाराष्ट्रत, महाराष्ट्रबाहेर एकट्याने भ्रमंती करून बाईनी या विषयाचा वेध घेतला, साधनसामग्री गोळा केली, साहित्य गोळा केले, मौखिक संस्कृतीचे स्वरूप समजून घेतले. त्यांच्या आविष्कार पद्धती आणि शैलींचा विचार केला. त्याची चिकित्सा केली आणि या मौल्यवान लोकसंचिताला अभिजनांच्या विचार विश्वात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. बहुजनांचे लोकसाहित्य म्हटले की एकतर भाबड्या श्रद्धेने बघणे (बाई त्याला गहिवर संप्रदाय म्हणतात) किंवा उच्चभ्रू अभिजन त्याकडे अडाण्यांचे साहित्य समजून तुच्छतेने, उपेक्षेने पाहतो. ही दोन्ही टोके बाजूला सारून बाईनी या संस्कृतीकडे चिकित्सेने, डोळसपणे पाहिले, त्यातले हिणकस बाजूला करून सत्व शोधले आणि या विषयाकडे बघण्याची नवी दृष्टी दृष्टी दिली. ४० च्या वर बाईची ग्रंथसंपदा आहे आणि त्यातल्या ‘लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिमा’, ‘यक्षगात आणि मराठी नाट्यपरंपरा’, ‘लोकजागर रंगभूमी’, ‘मिथक आणि नाटक’, ‘लोकसंचित’, मायवाटेचा मागोवा, मातीची रूपे, लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा, महामाया इत्यादी ग्रंथामधून त्यांनी लोकसाहित्य आणि संस्कृतीवर मूलभूत प्रकाश टाकला आहे. या ग्रंथांना लोकसाहित्याच्या अभ्यासात संदर्भ ग्रंथ म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. मराठी विश्वकोशासाठीही त्यांनी या विषयावर लिहिलेल्या नोंदी आणि या विषयांचे केलेले सिद्धांतन महत्वाची मानले जाते.
नाटक आणि स्त्रीवाद हे बाईचे आणखी दोन अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. ‘मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण प्रारंभ ते १९२०’ या विषयावर त्यांनी पीएच. डी. केली आणि त्यांच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट प्रबंधाचे सुवर्णपदक मिळाले अलीकडेच त्यांनी आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचे चरित्र लिहिले. ‘मराठी नाटक नव्या दिशा, नवी वळणे’ हा त्यांचा नव्या नाटकांवरचा ग्रंथही प्रसिद्ध आहे. पुणे विद्यापीठाच्या ललित कला विभागात त्यांनी वेळोवेळी नाटकावर व्याख्याने दिली आहेत. सांगलीमध्ये तरुण व हौशी रंगकर्मीना घेऊन त्यांनी ए. डी. ए. ही नाट्य संस्था स्थापन केली आणि नवीन नाटके सादर केली. राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलेल्या नाटकात त्यांनी स्वतः काम केले आणि त्यांना अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले. मुळातच प्रखर आत्मभान असणाऱ्या बाईनी नव्याने आलेल्या ‘स्त्रीवादाचा’ पुरस्कार केला आणि स्त्रीमुक्ती चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. याच दृष्टीतून त्यांनी संत स्त्रियांच्या क्रांतिकारकत्वाची नव्याने ओळख करून दिली आणि लोकसाहित्याची स्त्रीवादी दृष्टीतून नवी मांडणी केली. अलीकडेच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘सीतायन’ या पुस्तकातून त्यांचा हा दृष्टिकोन प्रखरपणे अधोरेखित झाला आहे.
औडक चौडक हा ताराबाईचा शब्द. त्याचा अर्थ ऐसपैस, आडवं तिडवं, वेडंवाकडं, आखीव रेखीव नसलेलं, स्वच्छंदी, मोजून मापून नसलेलं आपलं आजवरच जगणं आणि वाटचाल अशी आहे, असं त्यांना सुचवायचे असते, त्यामुळेच आपलं आयुष्य समृद्ध झालं असं त्या सांगतात. वयाची ८० पार करूनही त्या सदासतेज असतात या मागचं हे रहस्य आहे. बाई एकट्या राहतात, पण एकाकी नसतात. विचारांच्या संगतीत असतात, पुस्तकांच्या संगतीत असतात, लिहिण्याच्या संगतीत असतात, जोडलेल्या असंख्य लहान थोर, तरुण वृद्ध मित्र-मैत्रिणींच्या संगतीत असतात. जे घडले तेची पसंत अशा समाधानतेनं राहतात. अनेकांच्यासाठी आधारवड असतात.
प्रा. अविनाश सप्रे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈