श्री तुकाराम दादा पाटील
☆ विविधा ☆ काय हरकत आहे…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
विश्वविधात्याने विश्वाच्या पसा-यातील अनुरेणू एवढा नगन्य तुकडा आपल्या हाती सुपूर्द करून आपल्याला या धरेवर जीवन व्यथीत करायला या मोहमयी धरेवर धाडले आहे. याची आपणास जाणीव असायलाच हवी. इथे धाडतानाही त्याने आपल्याला रिक्त हातानेच पाठवले आणि इथून निघताना ही रिक्त हातानेच परतण्याची सक्त ताकीद देऊन ठेवली आहे. ती मोडण्याचे धाडस आपण करूच शकत नाही. कारण त्याने आपल्या आयुष्याची दोरी त्याच्या हातातच ठेवली आहे. इथे येतानाही विधात्याने आपल्याकडून आयुष्याच्या मर्यादेचा करार करून परतीची आपणास माहीत नसणारी तारीख नोंदवून ठेवली आहे. तिचेही आपण उल्लघण करू शकत नाही. आपण इतके दुबळे आहोत हे माहिती असूनही माणूस किती तोरा मिरवतो यांचा आपल्या सहीत सर्वांचं अनुभव आहे.आध्यामवाद्यानी याचीअनेक वेळा जाणीव करून देवून ही कोणीच फारसा जागा होताना दिसत नाही. करण माणूस हा शेवटी माणूस च आहे. चतूर आहे. कर्तृत्व संपन्न आहे.सगळे मान्यकरूनही तो आपणच आपली तयार केलेली “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे” ही म्हण विसरायला तयार नाही. कारण तो सातत्याने प्रयत्नवादीच राहीला आहे.पुढेही अनेक पिढ्या तो तसाच रहाणार आहे.त्याला माहीत आहे.आपल्या हाती ” काळ थोडा आणि सौंगे फार” आहेत. सामर्थ्याची दारू ठासून भरलेल्या शिवाय आयुष्याच्या रणांगणावर कर्तव्याच्या तोफा विजयी उन्मादाने धडाडत नाहीत.
इवल्याशा कर्तव्याचा साकव बांधून संकटाचा महासागर पार करायला निघालेलो आम्ही लोक आहोत.सामना महाबलीशी आहे.जिंकण्याची आशा तर
मूळीच नाही.पण जन्मताच मरण पदराशी बांधून घेतल्याने विजय पराजयाची तमा बाळगून लढण्याने काय हाशील होणार आहे.मग आहे ते कर्तव्य सोडून कशाला पळ काढायचा? लढा,कटा,मरा. निदान त्या मुळे तरी संघर्ष करणा-यांच्या यादीत तुमचे नाव नोंदवले जाईल.तुमची पुढची पिढी ठरवेल ते योग्य की आरोग्य ते.फक्त एक लक्षात ठेवा तुमची लढाई लोक कल्याणासाठीच असायला हवी.देह तुमचाच आहे.तो असातसा खर्ची पडणारच आहे.पण जाता जाता काळाने दिलेली भेट स्विकारताना आनंदी व्हायला आणि समाधानाने जयला काय हरकत आहे.
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈