सौ. अमृता देशपांडे
☆ विविधा ☆ कुसुमाग्रज ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
“उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही……….”
अशी चिऊताई ला साद घालत जागे करणारी कविता, जीवनाचे सगळे टप्पे अनुभवत, नवरसांचे प्याले रसिकांना बहाल करत, विविध छंदांच्या आणि विविध वृत्तांच्या अलंकारानी कवितेला सालंकृत पेश करणारे कुसुमाग्रज..
त्याच वेळी …
“ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण!
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण?
स्वामित्व जगाचे अखेर अमुच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती……”
असे सांगत माती हेच शाश्वत सत्य आहे, हे पटवून देणारी कविता लिहिणारे कुसुमाग्रज
अलौकिक प्रज्ञा, ईश्वरदत्त प्रतिभा, आणि चराचरातल्या प्रत्येक भौतिक आणि अभौतिकतेला स्पर्श करणारं तत्वज्ञान यांचं दैवी रसायन म्हणजे कुसुमाग्रज
नटसम्राट, ययाति देवयानी, कौंतेय, वीज म्हणाली धरतीला, यासारखी शतकानुशतके अजरामर रहाणारे नाट्यरेखन, सतारीचे बोल, फुलवाली, काही वृद्ध-काही तरूण, छोटे आणि मोठे असे असंख्य कथासंग्रह, रसयात्रा, विशाखा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा 100कविता असे हजारो कवितांनी भरगच्च असे कविता संग्रह. अशा विपुल लेखन संभाराने लगडलेला वृक्ष म्हणजे कुसुमाग्रज
कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा अमृतस्पर्श झालेल्या काही जगन्मान्य अजरामर ओळी मनात कधी गुंजन करतात, तर कधी धीर देतात,
कणा –
“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन, तुम्ही फक्त लढ म्हणा”
अनामवीरा
“काळोखातुन विजयाचा ये पहाटचा वारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा”
नवलाखतळपती दीप
“नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणु नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ तेव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात”
प्रेम कर भिल्लासारखं
“प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं”
नदी
“माय सांगे थांबू नका
पुढे पुढे चला
थांबत्याला पराजय चालत्याला जय”
समिधाच सख्या या
“समिधाच सख्या या
त्यात कसा ओलावा
कोठुनि फुलापरि वा मकरंद मिळावा
जात्याच रुक्ष त्या एकच त्यां आकांक्षा
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा”
कोलंबसाचे गीत
“अनंत अमुची ध्येयासक्ती
अनंत अन आशा
किनारा तुला पामराला”
पृथ्वीचे प्रेमगीत
“परी भव्य ते तेज पाहून पुजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे ?
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे”
भाव- भावनांच्या अशा अलौकिक, परतत्वस्पर्शी शब्दांची गुंफण करून दिव्य भव्य दर्शन घडवणारे आणि रसिकांच्या अंतर्मनात चेतनाशक्ती जागवणारे स्फुल्लिंग म्हणजे कुसुमाग्रज
जीर्ण देवळापुढे* ही इतर कवितांच्या मानाने कमी प्रसिद्धी मिळालेली कविता.
“तशीच तडफड करीत राही
तेवत ती ज्योती
उजळ पाय-या करी,
जरी ना मंदिर वा मूर्ती”
अंधःकार दूर करणे आणि उजळत रहाणे हाच ज्योतीचा व तेवणा-या वातीचा धर्म. कुसुमाग्रजांनी हाच धर्म आयुष्य भर जपला. अनासक्त कर्मयोग्याचे कार्य त्यांनी आपल्या मनस्वी लेखनाने केले.
लीनता, वात्सल्य, करूणा यांचं बोलकं रूप म्हणजे कुसुमाग्रज, त्याचबरोबर करारी, ध्येयवेडे, विजिगीषू, क्रांतीचा जयजयकार करणारं दमदार आणि रांगडं रूप म्हणजे ही कुसुमाग्रज.
“शब्द बोलताना शब्दाला धार नको आधार हवा कारण धार असलेले शब्द मन कापतात, आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.”असे नकळत संस्कार घडवणारे कुसुमाग्रज.
नटसम्राट मध्ये”सरकार, आपली मुलं वाईट नाहीत, वाईट आहे ते म्हातारपण”असं जीवनावर जळजळीत सत्य भाष्य करणारे कुसुमाग्रज.
कवी आणि लेखक म्हणून त्यांची थोरवी शब्दातीत आहे. ते माणसाच्या रूपातले महायात्री होते. ईश्वरदत्त मानवी जन्म घन्य झाला. अशा दिव्य कर्तृत्वापुढे सर्व सन्मान, सर्व गौरव नतमस्तक होऊन हात जोडून उभे राहिले. म्हणूनच मराठी साहित्यातील या चालत्या बोलत्या ज्ञानपीठाकडे “ज्ञानपीठ पुरस्कार”अदबीने शाल श्रीफळ घेऊन आला आणि माय मराठी धन्य धन्य झाली, आणि म्हणाली,
“मराठी मी धन्य धन्य,
धन्य जन्म सारा
अढळपदी अंबरात
कुसुमाग्रज चमकता तारा”
कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिन म्हणून अभिमानाचा ठरला आहे.
कुसुमाग्रज आणि माय मराठी ला मराठी मनाचा मानाचा मुजरा ll
© सौ अमृता देशपांडे
पर्वरी- गोवा
9822176170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈