सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ विविधा ☕  काॅफी.. ☕ सुश्री आसावरी केळकर-वाईकर☆

मोहक रंगाच्या कॉफीचा वाफाळता मग, त्या वाफांतून विरत जाणारा फिका धवल रंग आणि कानांवर पडणारं मंद संतूर/सतार किंवा हरिहरनचं ‘मैं खयाल हूं किसी औरका, मुझे चाहता कोई और है’ किंवा गुलाम अलींचं ‘फासलें ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था, सामने बैठा था मेरे और वो मेरा न था’ किंवा लताचं ‘लग जा गले…’ किंवा आशाचं ‘मेरा कुछ सामान…’  अशी सुरुवात झाली कि मनात खोलवर झिरपत जाणाऱ्या काहीतरी तरल कथानकाची गुंफण असणार ह्याचे संकेत मिळत जायचे आणि नजर मृदुल होत वाचणंसुद्धा आपसूक अलगद होऊन जायचं…. जणू नजरेतलली तीक्ष्णता त्या तरल कथानकाच्या शब्दांवर पडून त्यांना इजा होऊ नये ह्याची मन आपोआप काळजी घ्यायचं. माझी कॉफीशी ओळख आणि जवळीक ही खरंतर अशी नादावणाऱ्या शब्दचित्रातून झाली.

फार मोठे शब्दांचे काहीही डोंगर न रचता एक ‘कॉफीचा वाफाळता मग’ अंत:चक्षूंसमोर जी रस-रंग-गंधयुक्त रोमांचकारी वातावरणनिर्मिती करतो त्याला खरोखरीच तोड नाही… म्हणूनच कॉफीनं मनाचा एक हळवा कोपरा कायमस्वरूपी व्यापलेला आहे. जिव्हाळ्याच्या व्यक्तीचं उत्कंठेनं, हुरहुरतेपणी वाट पाहाणं असो, प्रत्यक्ष ती व्यक्ती समोर बसलेली असताना तिच्यासोबतची मनं जोडणारी नेत्रपल्लवी असो, कधी पाठ फिरवून गेलेल्या व्यक्तीच्या आठवणींत तरसणं असो, कधी असह्य एकटेपणाशी संवाद असो… कुठल्याही कथानकात ‘कॉफीचा मग’ सहजी सामावून जातोच शिवाय त्या प्रसंगाच्या शब्दचित्रातल्या भावनांचे रंग जास्त गहिरे, गडद करत जातो. त्यातून उमलणाऱ्या वाफा डोळ्यांसमोर येतायेता भोवताली भरून राहिलेली हुरहुर आपल्या जाणिवांत उतरते आणि आपण थेट त्या पात्राच्या अंतर्मनात उतरून त्यावेळची त्याची मनोवस्था अनुभवतो…!

लहानपणी घरात चहा-साखरेच्या डब्यांची जोडगोळी अगदी हाताशी येईल अशी कट्ट्याशेजारच्याच भिंतीतल्या कडाप्प्यांच्या रॅकमधे समोरच दिसायची, त्याच्या मागे एक तसाच उभट पण आकाराला किंचित छोट्या डब्यात प्लॅस्टिकच्या पिशवीतच कॉफीपूड ठेवलेली असायची. चमचा चहा-सारखेच्या डब्यातल्यासारखा किलवर आकाराचा असायचा. मात्र हा ठेवणीतला डबा क्वचित कधीतरी बाहेर निघायचा… कुणीतरी चहा न पिणारं आणि कॉफीच घेणारं आलं तर! चहा करणं त्यामानानं ओबडधोबडपणे पटकन उरकता यायचं, मात्र कॉफी करणं हा एक साग्रसंगीत सोहळा वाटायचा.

चहासाठी आधण हे पाण्याचं ठेवायचं आणि कॉफीसाठी मात्र दुधाचं… कॉफीच्या ‘खास, खानदानी, श्रीमंत’पणाची सुरुवात ही अशी पहिल्याच क्षणापासून व्हायची. त्यात मापात साखर घालून उकळी येईतोवर पिणाऱ्याच्या आवडीनुसार एकीकडं सुखद वासाच्या वेलदोड्याच्या दाण्यांची पूड करावी लागायची, कधी चिमटभर जायफळाची पूड त्यात टाकली जायची, नाहीतर ‘अपनी सिर्फ कॉफी’सुद्धा पुरेशी असायची. दुधाला छान उकळी आली कि गॅस मंद करून त्या शुभ्र फेसांत प्रमाणांत कॉफीपूड घातली कि तो दोन रंगांचा संगम फार देखणा वाटायचा. डब्यात चमचा असला तरीही त्या पुडीच्या मुलायमपणाचं स्पर्शसुख अनुभवण्यासाठी ती चिमटीत धरून पाहायचा मोह आवरायचा नाहीच. पांढऱ्या रंगावर उमटत जाणारी कॉफी कलरची नक्षी आणि श्वासांत उतरत जाणारा तो मोहक वास ही अनुभूतीच एकमेवाद्वितीय असायची. हळूहळू तो क्षीरडोह कॉफीच्या रंगात माखला जायचा आणि त्यात चिमूटभर वेलदोडापूड घालून पटकन ताटली झाकली कि नजाकतदारपणे समेवर आल्यासारखा आनंद व्हायचा. कॉफीची बंदिश सजवतानाचा हा आकृतीबंध मोहक वाटायचा.

दक्षिण भारतात चहापेक्षा कॉफी प्रिय असलेली मी पाहातेच आहे. लोक इथे कुटुंबाच्या गरजेनुसार महिन्या-दोन महिन्याला ठराविक किलो कॉफी ही दुकानांतून ताजीताजी दळून आणतात. कॉफीच्या बियांत  ठराविक प्रमाणात चिकोरी मिसळून दळण दळलं जातं. ‘फिल्टर कापी’ करण्यासाठी एक स्टीलचं दोन भाग असणारं उभट डब्यासारखं भांडं असतं. त्याच्या वरच्या भागाच्या तळाला बारीकबारीक छिद्रं असतात. त्यात सकाळसकाळी कॉफी पूड भरून वर उकळतं पाणी ओतून झाकण घट्ट लावायचं आणि कुकरच्या डब्यासारखा हा भाग खालच्या भागावर बसवायचा. त्या छिद्रांतून बराच वेळ पाणी ठिबकत राहातं आणि हे कॉफीचं डिकोशन तयार झालं कि दिवसभर गरजेनुसार त्यात उकळतं दूध आणि साखर घालून कॉफी प्यायची. रोमॅंटिसिजमचा सिम्बॉल असणारा कॉफीचा मग मात्र इथं आढळत नाही. एक पसरट वाटी आणि त्यात  कॉफी गच्च भरलेलं एक छोटं भांडं अशी कॉफी दिली जाते. मग आपण भांड्यातून वाटीत आणि वाटीतून भांड्यात असं जरा वेळ खेळत बसून साखर विरघळवायची आणि ती कॉफी गट्टम करायची.

आजकाल काही उंची हॉटेल्समधे, एअरपोर्टवर वगैरे कायच्या काय पैसे मोजून मिळणारा अत्यंत पांचट कॉफीचा फेस हा मात्र तिचा घोर अवमान आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. माझ्या मनातल्या कॉफीच्या तरल रुपाचा हा अगदी चोळामोळा असल्याचं माझं ठामच मत आहे. तसली कॉफी पिणाऱ्या लोकांना मला एकदा विचारायचं आहे कि, ‘केवळ स्टेटस सिंबॉल म्हणून ही कॉफी आपण सेवन करताहात कि पदार्थाचं रूप-रंग-गंध-चव काहीच न जाणवण्याइतकी आध्यात्मिक उन्नती झाल्यानं आपणांस कोणती चव आवडली नाही असं होतंच नाही!?’… बघू कधी योग येतो! वाफाळत्या कॉफीबरोबरच ‘कोल्ड कॉफी’ पिणारेही लोक जगात आहेत हाही मला आश्चर्याचा धक्काच होता.

माझ्या काळजातलं कॉफीचं रुपडं मात्र जामच ‘रोमॅंटिक’ आहे आणि कायम राहील ह्यात शंका नाही.

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments