सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ कोरोनाबरोबरचं वर्ष – २०२० -२०२१ ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय १२ मार्च २०२१ ला! मागील वर्षी 12 मार्चला आम्ही दुबई पुणे ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ने पुण्याला येण्यासाठी निघालो. त्याआधी तीन-चार दिवसच आम्हाला ‘कोरोना’ म्हणजे काय ते कळू लागले होते. नातवंडांना शाळेला सुट्ट्या दिल्या गेल्या. आमचं बाहेर फिरणं बंद झालं होतं. तिथल्या न्यूज पेपर ला येणाऱ्या बातम्यांवरून ब्राझील,इटली, इंग्लंड आणि युरोप मधील कोरोनासंबंधी ची माहिती थोडीफार कळली होती, पण त्याची तीव्रता अजून जाणवली नव्हती. जावई दुबईला एमिरेट्स एअर्वेज मध्ये असल्याने त्यांना बदलती परिस्थिती लक्षात येत होती. दहा तारखेला त्यांनी आम्हाला भारतात जायचे असेल तर लवकर निघावे लागेल, कदाचित् फ्लाइट्स बंद होण्याच्या शक्यता आहेत आणि एकदा बंद झाल्या की पुन्हा कधी सुरू होतील याची शाश्वती नाही याची कल्पना आली, त्यामुळे आम्ही लगेच 12 तारखेला निघायचा निर्णय घेतला. एअरपोर्टवर आलो तेव्हा नेहमीचे आनंदी, उत्साही वातावरण नव्हते. सर्वजण एका भयाण शांततेत, गंभीर चेहऱ्याने मास्क वापरताना बघून आमच्याही मनावर दडपण आले. आम्हीही मास्क घेतले होतेच, बरोबर सॅनिटायझर ही होते पण या सगळ्याची इतकी काय गरज आहे, असंच वाटत होतं! पहाटे पुणे एअरपोर्ट ला पोहोचलो. तिथेही टेंपरेचर घेतले गेले, बाकी काही त्रास नाही ना, याची चौकशी झाली. आम्ही अगदी ‘ओके’असल्याने हे सर्व कशासाठी? अशीच भावना मनात होती. आम्हाला घेण्यासाठी मुलगा एअरपोर्ट वर आला होता, त्याच्या गाडीतून घरी जाताना त्याने आम्हाला परदेशातून आल्यामुळे लागण झालेले काही कोरोनाचे पेशंट पुण्यात आले आहेत हे सांगितले, त्यामुळे बऱ्याच लोकांना क्वाॅरंटाईन मध्ये ठेवल्याचे ही सांगितले.आम्ही तेव्हा मनानेच निर्णय घेतला की आपणच स्वतःला क्वाॅरंटाईन करून घ्यावे! त्याप्रमाणे घरात एकदा जे पाऊल टाकले ते जवळपास एक महिना बाहेर आलोच नाही! अर्थात मुलगा समोरच राहत असल्याने त्याचा पूर्ण सपोर्ट होता!
ते दिवस अक्षरशः स्थानबद्धतेचे होते. पोलीस येऊन चौकशी झाली. कॉर्पोरेशन कडून लोक येऊन गेले. हातावर क्वाॅरंटाईनचा शिक्का मारला! शिवाय आसपासच्या लोकांच्या ‘हेच ते दुबई हून आलेले लोक’ असे दाखवणार्या नजरा, या सगळ्या गोष्टींचा नकळत मनावर परिणाम होत होता. त्यावेळचे ते दिवस आठवले की, मला पूर्वीच्या काळी समाज बहिष्कृत लोकांना कसे वाटत असेल याची जाणीव सतत मनाला होत असे! त्यामुळे मन अधिकच अंतर्मुख झाले!त्रस्त असलेल्या मनाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडू लागले आणि नकळत अनेक लेख आणि कविता लिहिल्या गेल्या. तो एकांतवास एका दृष्टीने फारच फायदेशीर ठरला! स्वतःच्या मनाशी संवाद घडू लागला! मोबाईल वरून जवळच्या व्यक्तींशी बोलता येत होते एवढाच फक्त माणसांची संवाद!
त्या काळात कोरोनाचे पेशंट वाढले, मधेच लॉकडाउन चालू होता, दूध, भाजी, किराणा या गोष्टी वेळच्या वेळी मिळतील ना अशी साशंकता सतत मनात असे!आयुष्यात कधी न पाहिलेले अशा प्रकारचे दिवस होते ते! जगात सगळीकडे कोरोनाचा प्रभाव दिसत होता. दुःखात सुख म्हणजे आम्ही परदेशातून स्वदेशात वेळीच आलो होतो! आम्ही आलो आणि दुसर्या दिवसापासूनच दुबईहून येणाऱ्या फ्लाईटस् बंद झाल्या. तिथे मुलगी,जावई यांच्या घरीच होतो, तरीसुद्धा आपला देश, आपलं घर हे वेगळेच असते! गेले पूर्ण वर्ष या कोरोनाच्या छायेतच चालले आहे, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही द्रुष्टीने त्रासदायक च गेले.
अजूनही कोरानाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही. कोरोनाच्या लसीचा एक डोस पार पडला आणि एका मोठ्या दिव्यातून बाहेर आल्या सारखं वाटले. अजून 28 दिवसांनी दुसरा डोस!’कोव्हिशिल्ड’ चे शिल्ड वापरून पुन्हा एकदा जीवनाला नव्याने सामोरे जायचेय! जगावर आलेल्या या संकटाला माणसाने धीराने तोंड दिले आहे. नकळत एक वर्ष डोळ्यासमोर उभे राहिले! कोरोनाच्या २०२० सालाने तसं माणूस बरेच काही शिकला! निसर्ग आणि माणसाने एकमेकाशी संलग्न राहिले पाहिजे हे कोरोनाने शिकवले! प्रगतीच्या नावाखाली माणसांकडून मानवी मूल्यांची जी घसरण चालली होती, ती थोपवण्याचे काम या कोरोनाने केले आहे एवढे मात्र नक्की!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
१० मार्च २०२१
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈