सौ ज्योती विलास जोशी

 ☆ विविधा ☆ केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

आठवणीं मग त्या कटू असोत किंवा गोड; अविस्मरणीय क्षणांच्या स्वरूपात मनांत दाटलेल्या असतात. त्यांची चाहूल मनात काहूर माजवते. लुप्त आठवणींचा कधीकधी असा कवडसा पडतो की मन हळवं होतं.

माझ्या मनाचे पापुद्रे उलगडत उलगडत ह्या सगळ्या आठवणीत रमायला मला फार आवडतं.

एखादा जुना झालेला पिवळा फोटो पाहून, जुन्या गाण्याचा एखादा आर्त स्वर ऐकून जशी मनात विचारांची गर्दी होते ना तसं काहीतरी हा प्रसंग आठवून झाली. आणि……. अर्थातच मला तुम्हाला ही गोष्ट सांगावीशी वाटली….

बऱ्याच दिवसांनंतर माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं होतं.नवीन घर तसं गावाच्या थोडं बाहेरच !अर्थात मी नवीन घरात आल्यावर घरकामात आणि घर सजवण्यात रमले पण केतकी मात्र कंटाळली. तिला काही करमेना… वाड्यातलं गोकुळ सोडून आली होती ना ती!!

दुपारपर्यंत गद्रे बाईंसोबत बालवाडीत असायची. त्यानंतर मीच तिच्या बरोबर खेळायची पण संध्याकाळी मात्र तिच्या सोबत खेळायला कोणीच नसायचं. तिला थोडा विरंगुळा हवा ना? पण माझा नाईलाज होता. जवळपास फारसं कुणी शेजारीपाजारी नव्हतं.सगळा औद्योगिक परिसर.. त्यादिवशी आम्ही दोघी घराच्या गच्चीवर गेलो होतो. “आई, तो बघ आपला वाडा..” दूरवर तिला आमचा राहता वाडाच दिसला.”अग बाई हो का? आणि वाड्यात कोणकोण दिसतंय?” तिनं सगळ्यांची नावं घेतली. मलाही तिची कीव आली.” आपण जाऊया रविवारी वाड्यात सगळ्यांना भेटायला.” मी तात्पुरती समजूत काढली खरी पण तेवढ्यानं तिचं समाधान झालं नाही.

तेवढ्यात एक ओळखीचा आवाज आला. “आई कसला आवाज आला गं?” आवाज माझ्या ओळखीचा होता पण तो आवाज मला इथे अपेक्षित नव्हता,त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण पुन्हा एकदा तो आवाज आला आणि मी त्या दिशेने पाहिलं आणि मोहरले.

“अगं किटू, तो बघ मोर!” समोरच्या एका छोट्याशा घराच्या अंगणात मोर दिसला मला! त्याची केकाच मला ऐकू आली होती.मला खूप आश्चर्य वाटलं. “मोर असा ओरडतो? चल ना आई आपण पाहायला जाऊ.” मला तिचं मन मोडवेना.

घराच्या अंगणात पायरीवर एक आजी बसल्या होत्या.”या” त्यांनी आमचं उबदार स्वागत केलं.”बरं झालं आलात. मी येणारच होते तुमची ओळख करून घ्यायला.”आजी बोलल्या आणि त्यांनी आपलंसं करून टाकलं आम्हाला!

केतकी कडे बघून त्या म्हणाल्या, “बाळाबाई, नाव काय तुझं?”केतकी म्हणाली, “आम्ही मोर पाहायला आलोय”मुद्द्याचं बोलून रिकामी झाली ती. “हा मोर तुमचा आहे ?जंगलातनं आणलाय तुम्ही? तो पिसारा का फुलवत नाही?”.तिला विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता तिची स्वतःच्या प्रश्नांची सरबत्ती चालू होती.डोळ्याच्या पापण्या देखील न लवता केतकी मोर पाहण्यात रमली होती.

“अंधार झाला चल आता” मी म्हटलं, पण तिचा काही पाय निघेना. “आता मोर पण झोपणार आहे बाळा, उद्या ये हं !” त्या इवल्याश्या जीवाचं इवलसं अंतकरण जड झालं होतं हे जाणवलं मला…..

झोपेपर्यंत ती मोराबद्दलच बोलत होती. तिला मुख्य प्रश्न पडला होता तो असा की,मोर पिसारा केव्हा फुलवणार ? मग पाऊस कधी पडणार? आंब्याच्या वनात आपण कधी जायचं?….

केतकी मनात रंग सोहळ्याच्या स्मृती घेऊन स्वप्न सफरीवर गेली होती.आज तिचं रमलेलं मन अगदी पटकन निद्रादेवीच्या अधीन झालं होतं. सकाळी उठल्यावर मी कामाच्या गडबडीत होते त्यामुळे स्वारी बाबांकडे वळली. मोराबद्दल मलाही जितकं ज्ञान नव्हतं तितकं या बाप-लेकीच्या संवादानं मला समजलं.

आज ती दुपारी शाळेतून आली तशी तहानभूक विसरलेली ती लगेचच पळाली मोराकडे !! एव्हाना आजींची आणि तिची गट्टी जमली होती. आजीनाही तिच्या शिवाय चैन पडत नसते. “आई आता आकाशात ढग येणारेत मग मोर पिसारा फुलवून नाचणाराय” निरागस मन मला सांगत होतं.

आजींचं आणि माझं विशेष बोलणं व्हायचं नाही.गॅलरीतून नुसतेच हातवारे आणि मूक संभाषण पण…. आज केतकीनं निरोप आणला.”आई,आजीने तुला बोलवलंय.”मला हाताला धरून घेऊन देखील गेली ती….. आजी आपल्या बद्दल काहीतरी तक्रार सांगतील असंच तिचं साशंक मन स्वसमर्थन करायच्या तयारीत होतं.

“उद्या गौरी यायच्या. केतकीला साडी नेसून पाठवा. तिलाच नळावर पाठवते. इथेच जेवेल घासभर…” असं आजी म्हणाल्या, आणि केतकीच्या आनंदाला उधाण आलं होतं. उद्या कधी येतो असं झालं तिला… गौरी-गणपतीचे दिवस आज सकाळपासून आभाळ भरून आलं होतं केतकीच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मोर पिसारा फुलवून नाचेल असा विश्वास वाटत असावा का त्या जीवाला ?……

सकाळी तिचे डोळे उघडले तसं “आई आज मला कुठली साडी नेसवणार ?बांगड्या कुठल्या घालायच्या?” एक वेगळाच आनंद आणि उत्साह तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.

गौराई नटली होती. एक गोड पापा देऊन पळाली ती आजीकडे. दुपार झाली तरी अजून ती आली नाही. तशीही ती कधीच बोलल्याशिवाय येत नसे आणि आजी तिला कधीच जा म्हणत नसत.

इतक्यात तिच्या “आई,आई” अशा हाका ऐकू आल्या. गॅलरीत पोहोचते अन् पाहते तो काय? मोरानं पिसारा फुलवला होता आणि माझी गौराई त्याच्यासोबत उभी होती. अवर्णनीय असं ते दृश्य मी डोळ्यांत साठवून घेत होते.मोर अन् केतकी दोघेही नाचत होते. आंब्याच्या वनात जाण्याची आस ठेवणारी केतकी स्वतःच्याच बनात मोराला नाचताना पाहत होती.

मोरानं तिचा आजचा दिवस खास करून टाकला होता.’देता किती घेशील दो कराने’ इतका आनंद तिच्या ओंजळीत टाकला होता. मी मनोमन मोराचे आभार मानले.

लगबगीने कॅमेरा घेऊन खाली पळत सुटले. मी पोचेस्तोवर मोर उडून कठड्यावर जाऊन बसला. “माझ्यासोबत मोराचा फोटो काढायचा होता ना गं” असं म्हणून केेतकी रडू लागली.

“थांब हं किटू, मी मोराला घेऊन येते.” असं म्हणून केतकीला आजींच्या ताब्यात घेऊन मी कॅमेरा घेऊन मोरा पाठीमागे धावणार तोच….. तो पुन्हा उडून माझ्या घराच्या गच्चीच्या कठड्यावर बसला. मी पळत पळत गच्चीवर आले. त्याच्या नकळत लपून त्याच्याकडे पाहत बसले. त्याला हळूच एका क्षणी मी माझ्या कॅमेऱ्यात कैदही केलं…. दुसऱ्याच क्षणी तो पुन्हा उडाला आणि एक जोरदार धमाका झाला, आणि दिसेनासा झाला. तो बसलेल्या ठिकाणाच्या जवळच इलेक्ट्रिकचा डांब होता. त्याचा त्याला शाॅक बसला होता.

मी पुढे जाऊन पाहिलं तर…. माझ्या अंगणात मोरपिसांचा सडा पडला होता. माझ्या कॅमेरात कैद झालेला तो जगाच्या बंदिवासातून मुक्त झाला होता. तो क्षण मोराचा ‘प्राण प्रयाणोत्सव’ ठरला….. तिसऱ्याच क्षणी माझ्या मनांत केतकीचा विचार आला आणि मी शहारले. मी ताबडतोबीनं मृत मोराची विल्हेवाट लावली जेणेकरून केतकीच्या नजरेत हे सारं येऊ नये.

केतकी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. मी मोराला घेऊन येणार असा तिचा माझ्यावर विश्वास होता.

मला पाहताच केतकीच्या डोळ्यातलं पाणी पापण्यांवर येऊन थांबलं. ती मला बिलगली. मोठ्या आवाजानं घाबरली होती ती. तिची नजर मोराला शोधत होती. “आई,मोर कुठे गेला?”

“मोर उडून गेला बाळा! आपण आता दुसरा आणू हं!”. आजीनं जड अंतकरणाने माझ्या निरागस लेकराची समजूत काढली आणि, गाभण ढग फुटल्यासारखं त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पाट वाहू लागला.

केतकीला विषयाचं गांभीर्य समजू नये म्हणून”जाताना तुला कितीच्या काय पीसं देऊन गेलाय बघ” असंही त्या म्हणाल्या.

“इतकी सगळी पिसं मला एकटीला दिलीत? यातलं एक सुद्धा मी कोणालाही देणार नाही”. मनाचा पक्का निर्धार करून मृत्यूचं गम्य नसलेलं ते निरागस मन पीसं गोळा करत होतं.

माझी अवस्था धीर सोडलेल्या,गहिवरल्या मेघा सारखी झाली होती. मला आणि आजीना एक माणूस गेल्याचं दुःख झालं होतं. केतकीचा एक प्रिय मित्र गेला होता.केतकीच्या बाल मनाचा विरंगुळा होता तो!

त्याच्या पिसारयातील पीसं आणि त्यातील रंग पहात केतकी स्वप्न रंगात रंगली होती. पिसाच्या हळुवार स्पर्शानं मोहरुन गेली होती.

जीवन जितकं सुंदर तितकंच मरणही सुंदर असतं का हो? असेलही ! वसंत ऋतू जितका रम्य तिचकाच शिशिरऋतू ही रम्य असतोच ना?

मोराचं जाणं हा प्रयाणोत्सव होता जणू…. माझ्या निरागस जीवाला परमानंद देऊन गेला होता तो!!

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments