कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक
विविधा
☆ कवयित्री शांताबाई शेळके स्मरण.. ☆ सुश्री सुरेखा कुलकर्णी ☆
मराठी सारस्वताच्या मुकुटात मानाचे तुरे अनेक आहेत. त्यातील एक सुंदर तुरा खोवला कवयित्री शांता शेळके यांनी! शांताबाईंनी मराठी साहित्य सोनियाच्या खाणीत विविध शब्द रत्नांची भर घातली आहे.
त्यांनी काव्याचे विविध प्रकार रसिकांपुढे मांडले आणि ते सारे रसिकांना भावले. भक्तीगीते, प्रेमगीते, विरह गीते कोळीगीते लावणी,’ ऋतू हिरवा’ सारथी निसर्ग गीते स्त्रीसुलभ भाव मांडणारी भावगीते आणि बालगीते असे विविधरंगी काव्य त्यांनी लिहिले जणूं साहित्यातील रंगतदार इंद्रधनुष्य रसिकांपुढे सुरेख मांडले हे सर्वच रंग सुंदर आहेत त्यांच्या कविता लय तालांनी सजलेल्या असल्यामुळे त्याची सुरेल गीते झाली त्यांनी रसिकांचे कान आणि मन तृप्त झाले
यातील बालगीतांचा रंग मला अधिक भावला बाल मनातील भावना अगदी त्यांच्या शब्दात या कवितांमधून व्यक्त झालेल्या दिसतात आणि म्हणूनच त्याची सुरेल बालगीते झाली अगदी मुंगीपासून बाल वयात आवडणाऱ्या
विविध विषयावर त्यांनी कविता लिहिल्या आणि त्या बालां बरोबरच सर्वांना प्रिय झाल्या. त्यापैकी एक कविता प्रातिनिधिक स्वरूपात मी आपल्यापुढे मांडत आहे हे लोकप्रिय बालगीत आहे,”किलबिल किलबिल पक्षी बोलती”! या गीतातील कल्पनेतला गाव लहानांसह सर्वांना आवडणारा आहे.यात आलेले निसर्ग वर्णन पक्ष्यांची किलबिल झुळझुळ झरे पाने-फुले व भिरभिरणारी फुलपाखरे हे वर्णन अगदी कोणालाही मोहून टाकणारे आहे यात प्रत्येक शब्द अगदी यथार्थ व परिपूर्ण आहे कवीची प्रतिभा म्हणजे शब्द जणू हात जोडून उभे आहेत.ओळी ओळीत बाल मनातील भावना व्यक्त होत आहेत कवी कल्पना खरंच जे न देखे रवी अशाच असतात या गावात सर्व जण मुलेच असतात. कारण तिथे लहान-मोठे हा भेद नाही तसेच इथे शाळा पुस्तके असे मुलांना कंटाळवाणे वाटणारे काहीच नाही फक्त खेळावे, बागडावे असे हे गाव आहे मुलांना आवडणारी गाणी हसऱ्या प-या आणि झाडावर च चेंडू आणि ब्याटी आहेत.
असा बहरलेला गाव लहानांसह सर्वांना आवडणारच! मग ही कविताही गीत रूपात सर्वांना आवडते.ही सारी गंमत कवीच्या शब्दांनी निर्माण केली त्यातील शब्दांचा गोडवा,भावपूर्ण मांडणी, चित्रमय वर्णन हे सारे कवीचे प्रतिभासंपन्न असे यश आहे अशा बालगीत लेखनाने शांता शेळके यांनी मराठी बालगीता ना साज चढवला आहे.
म्हणून च थोडक्यात असे म्हणावेसे वाटते,” असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे.”हेच खरे!
नवोदितांना प्रेरणा देणाऱ्या शांताबाईंच्या काव्य स्मृतीस विनम्र अभिवादन!
© सुश्री सुरेखा कुलकर्णी
सातारा
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈