सौ ज्योती विलास जोशी
विविधा
☆ करोनाचे धडे… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
थांब……
तुला शिकवीन चांगलाच धडा…
तुझ्या पापाचा भरलाय घडा….
असं म्हणत कोणीसं आलं… ती नक्कीच फुलराणी नव्हती… पुरुषाच्या आवाजातला राक्षस होता तो! ‘करोना’ नाव त्याच!! ‘ती फुलराणी’ नाटकातील मंजुळेचं फर्मास स्वगत ऐकलेले आम्ही लोक.. या करोनाच्या भयावह स्वगतानं हादरून गेलो. फुलराणी स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रह्मघोटाळ्यात सापडलेली होती, तर करोनानं आम्हालाच ब्रह्म संकटात टाकलं……
‘ये करो ना’ ‘वो करो ना’ असे धडे देत या अतिसूक्ष्म विषाणूनं आम्हाला हैराण करून टाकलं. फुलराणीनं अशोक मास्तरच्या नावानं जितकी बोटं मोडली नसतील तेवढी आम्ही याच्या नावाने रोज मोडतोय हल्ली… अगदी फसवा आणि मायावी राक्षस आहे हा! आपले अणुकुचीदार दात विचकत आला आणि काही न बाइंच बोलत सुटला….
माणसा रे माणसा तू असा रे कसा?
भोग कर्माची फळं रडत ढसाढसा.
आमचं काय चुकलं म्हणून शाप देतोय हा आम्हाला? हो, आणि हा कोण आमच्याविषयी अभद्र बोलणारा? आमच्या प्रश्नार्थक मुद्रेकडं बघून लगेच म्हणाला, ‘पेराल तसे उगवेल’ आमच्या सगळं डोक्यावरून गेलं. आता त्यांनं आमचा माजच काढला.
माज तुझा उत्तरला तरी अजून तोरा
भिकेला लागशील सुधार जरा पोरा.
एव्हाना आमचा माज उतरला होता.आम्ही त्याला साक्षात दंडवत घातला. गयावया करून हात जोडले. क्षमा मागून, आमचे काय चुकले? असा प्रश्न विचारला. आम्ही शरणागत झालेलं पाहून विजयी मुद्रेनं तो आता गझल गाऊ लागला.
युही बेसबब न फिरा करो
कोई शाम घर मे भी रहा करो
कोई साथ भी न मिलेगा जो गले लगोगे
ये नये मिजाज का शहर है
जरा फासले से मिला करो.
आमच्या घराघरात नांदणारा मना-मनाला दुखवणारा नाती संपुष्टात आणणारा हा राक्षस आणि त्याचा डाव आम्ही ओळखला. तो आम्हाला आमच्या आप्तस्वकीयांना भेटायचं नाही असा कायदा करतोय याचा आम्हाला राग आला त्याचा हा कायदा आम्हाला नामंजूर होता पण काय करणार अडला नारायण….
आता तो निसर्गाचे गुणगान गायला लागला आणि आम्हाला कोसू लागला.
निसर्गाला धरलयंस वेठीला
कंटाळलाय तो तुझ्या अत्याचाराला
कळत कसं नाही तो सूड उगवतोय
कृतघ्न तू तुला धडा शिकवतोय.
निसर्गाला शरण यायला हवं हा धडाच तो शिकवत होता. मनोमन पटलं देखील! निसर्ग सर्वांना समान वागणूक देणारी सर्वश्रेष्ठ देवता…. आम्ही पुन्हा हात जोडले.
करोना राक्षसाचे आमच्यावरील आरोप म्हणजे जणू एक एक परमाणूच!
माणसानंच माणसाला डंख मारलाय
माणुसकीलाच संपवलस तू .
मोठा समजतोस स्वतःला
असा रे कसा निर्दयी तू?
त्याचा रोख आमच्याच एका प्रजातीकडे आहे हे आम्ही ओळखलं पण त्यात आमचा काय दोष? ओल्याबरोबर सुकंही जळतं म्हणतात ना? तेच खरं.
पहिली लाट माझं येणं
दुसऱ्या लाटेवर स्वार होणं
तिसऱ्या लाटेची भीती असणं
याचं कारण तुझं वागणं
प्रत्येक गोष्टीला तो आम्हाला जबाबदार धरत होता. आम्ही एकमेकाकडे बघू लागलो,स्वतःलाही निरखू लागलो.
शेतकरी तुझा पोशिंदा
शेतात झालाय क्वारनटाईन
निसर्गावर निर्भर तो
झालांय अगदी हवालदिल
खरंच अन्नदाताच तो! त्याला आम्ही कशी वागणूक देतो? त्याच्या अशिक्षित असण्याचा कसा फायदा घेतो? त्याच्या श्रमाची किंमत आम्ही कशी करतो? आम्ही आता लाजून मान खाली घातली.
चंगळवादाचं प्रतीक तू
गरज तुझी संपत नाही
ओरबाडून घ्यायची तुझी वृत्ती
शोषण करायची तुझी प्रवृत्ती
आम्ही गरजेपेक्षा जास्त साठवतो,नासवतो, वाया घालवतो हे आमच्या लक्षात आलंच आहे.आमची झुकलेली मान वर येईचना..
ओढवलेली आर्थिक मंदी
विनाशाची ही तर नांदी
परिस्थिती कोलमडली
मानसिकता बिघडली
आमच्या संसाराचं गणित खरंच बसेना झालंय.ओढाताण व्हायला लागलीये. राक्षस खरंच बोलत होता.
पैसा नाही सर्व काही
माणुसकी असे मोठी
संस्कृती परंपरा प्रथा यांचा
संचय हवा तुझ्या गाठी.
रग्गड पैसा असूनही एकाच तिरडीवर अनेक देह जळत असलेले आम्ही याची देही याची डोळा पाहतो आहोत राक्षस आमचे डोळे उघडू पाहत होता.राक्षसाचा सूर आता समजावणीच्या झाला होता त्यामुळे आमच्याही डोक्यात थोडं थोडं शिरायला लागलं होतं.
आरोग्याला प्रथम मान
अन्नपूर्णेचा करा सन्मान
समतोल आहार नियमित व्यायाम
हाच आहे खरा आयाम
आरोग्याची त्रिसूत्री सांगायलाही तो विसरला नाही आता आम्ही पद्मासन घालून बसलो.
राग लोभ मोह मत्सर
सर्वांना आवर घालून
निर्मळ विचारांना आत घे
मनाचं कवाड उघडून
राक्षस अध्यात्म शिकवू लागला होता.ज्याची आता आम्हाला खरंच गरज होती. आम्ही तल्लीन होऊन ऐकू लागलो.
जान है तो जहान है
मंत्र मोठा या घडीला
डॉक्टर देतात जीवाला जीव
स्वतःचा जीव लावून पणाला
‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती’ असं ज्यांचं वर्णन करावं ते डॉक्टर रोज संकटयुद्धावर असतात. आम्ही सुरक्षित घरात बसतो. याचा विचार न करता आम्ही जे मारहाणीचे प्रकार अवलंबले आहेत,ते पाप आम्ही कुठे फेडावं? आम्ही दोन्ही गालांवर चापट्या मारून तोबा तोबा केलं.
आत्मनिर्भर तुझ्या देशांनं
सिद्ध केलं स्वतःला
सकारात्मक विचारसरणीचा
धडा दिला महासत्तांना
देशाभिमानाची जाणीव झालेल्या आम्ही मान वर केली. जयहिन्दचा नारा लावला. ऊर भरून आलं आमचं..
तुझा ग तुझा म तुझा भ तुझा न…..
असं म्हणत तो आमच्या भोवती फेर धरून नाचू लागला. तो आता आणखी कोणता धडा शिकवणार याकडं आमचं लक्ष लागून राहिलं होतं
लाव पणाला शास्त्र तुझं सोडून भूक-तहान
लाव सत्कारणी वेळ तुझा द्याया जीवनदान
स्वयंसूचना ऐकून तू वाचव हा जहाँ
दे नारा अभिमानानं मेरा भारत महान
असे अनेक धडे देणारा असा हा करोना राक्षस,’विश्वात शांती नांदावी म्हणून पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांना स्मरा’ असं तर सांगत नाही ना?
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈