श्री उद्धव भयवाळ

☆ विविधा ☆ काळ आला होता पण … ☆ श्री उद्धव भयवाळ  ☆ 

 स्टेट बँकऑफ हेद्राबादच्या शहागड शाखेतून माझी बदली हिंगोली शाखेला झाल्यामुळे मला एक आठवड्याचा ‘जॉईनिंग पिरियड’ (नवीन शाखेत रुजू होण्यासाठीचा अवकाश ) मिळाला म्हणून मी आणि माझी पत्नी सौ. निर्मला एक आठवड्यासाठी औरंगाबादला घरी थांबलेलो होतो. त्या दरम्यान नऊ ऑक्टोबर २००४ रोजी ही घटना घडली.

माझा मोठा मुलगा मनोज आणि सुनबाई सौ. अर्चना इथेच राहात होते.  मध्यंतरी माझा छोटा अपघात झाल्यामुळे मला भेटण्यासाठी म्हणून छोटा मुलगा रवींद्रही मुंबईहून आदल्या दिवशीच आला होता.

नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे सौ. फिरण्यासाठी बाहेर गेली आणि मी, घरात येऊन पडलेले ताजे वर्तमानपत्र हातात घेऊन वाचू लागलो. मुले साखरझोपेमध्ये होती. साधारणपणे साडेसातच्या दरम्यान सौ. ‘मॉर्निंग वॉक’ हून परत येईल आणि नंतर चहा करील असा अंदाज बांधून मी ब्रश करण्यासाठी बेसिनजवळ गेलो. एका हातात टूथपेस्ट घेतली अन् दुसऱ्या हातात ब्रश घेतला. पण दोन्ही हात जणू गळून गेल्यासारखे झाले. त्यामुळे पेस्ट आणि ब्रश एकत्र येईचना. मी ब्रशवर पेस्ट लावण्याचा प्रयत्न करीत असतांनाच छातीत जोरात कळ आली. मी हातातील ब्रश आणि पेस्ट खाली सोडून दिली अन् पटकन जमिनीवर पाठ टेकली. दोन्ही पाय सरळ केले. तितक्यात माझ्या छातीवर जणू हत्तीने पाय दिल्यासारखे आणि कुणीतरी माझी छाती आवळल्यासारखे वाटले अन् पूर्ण अंग घामाने ओलेचिंब झाले. लगेच माझ्या मनात विचार चमकून गेलाकी, “हीच माझी शेवटची घटका आहे. मी आता मरणार आहे.” त्या क्षणी मी अक्षरश: मृत्यूच्या दारात उभा आहे असे मला वाटले.

मी तशाही स्थितीमध्ये मुलांना हाक मारण्याचा प्रयत्न केला. पत्नी अद्याप फिरून आली नव्हती. मुलांनी आवाज ऐकला आणि दोन्ही मुले वरच्या बेडरूममधून पटकन खाली आली. काय झाले असेल ते त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी मला ताबडतोब कारमध्ये बसवून हेडगेवार रुग्णालयामध्ये हलविण्याची तयारी केली. इतक्यात पत्नीही आली. तिला काहीच कळेना. तिला मुलांनी काहीही न सांगता फक्त गाडीत बसण्यास सांगितले. ती वेळ घरातील सर्वांसाठीच कसोटीची होती. हेडगेवार रुग्णालयामध्ये तिथल्या डॉक्टरांनी मला क्षणाचाही विलंब न लावता ताबडतोब दाखल करून घेतले आणि सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली धरायला लावली. हळूहळू छातीमधल्या वेदना कमी झाल्या आणि मला बरे वाटू लागले.

“इस्केमिक हार्ट डिसीज” असे माझ्या हृद्यरोगाचे डॉक्टरांनी निदान केले. पुढे जवळजवळ आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये राहून नंतर घरी आलो. मुलांनी तातडीने मला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेले म्हणून मी मृत्यूच्या दारातून परत आलो. त्या दिवशी काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेच खरे.

 

© श्री उद्धव भयवाळ

१९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, औरंगाबाद -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
2.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Anjali Dhanorkar

अंगावर शहारा आणणारा प्रसंग