विविधा
☆ क्रांतितले अप्रकाशित तारे – भाग-1 ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
क्रांतीतले अप्रकाशित तारे – रानी मां गायडिल्लू (Gaidinlue)
ब्रिटिश काळात इंग्रजांच्या अत्याचाराच्या विरोधात असंख्य क्रांतिकारकांनी देशासाठी लढे दिले. कित्येकांनी प्राणही गमाविले. त्या सर्वांचीच नावे प्रकाशात आली नाहीत.काही जणांचे बलिदान खूप गाजले. आजही त्यांची नावे अभिमानाने घेतली जातात. पण काही जणांनची नावे फक्त इतिहासालाच माहीत आहेत.त्यांचे कार्य खूपच महान आहे. पण त्याची कुणाला फारशी माहिती नाही. त्यांच्यापैकीच एक नाव आहे ” रानी मां गायडिन्ल्यू”.
या मणिपूर राज्यात तेमेलून जिल्ह्यातील ल्युंकाऊं या गावी जन्मल्या. जन्मतारीख होती २६ जानेवारी, १९१५. त्यांचे वडील लाॅथॅनाॅंग हे त्यांच्या राॅन्ग माई या समाजातील मोठे समाजसुधारक कार्यकर्ते होते. आई कारोटल्यू या अत्यंत धार्मिक, सात्विक अशा गृहिणी होत्या.या दांपत्याला आठ मुले मुली होत्या, त्यापैकी रानी ही त्यांचे सातवे अपत्य होते.
पूर्वोत्तर राज्यातील राणी लक्ष्मीबाई म्हणून त्या नागा लोकांमध्ये प्रसिद्ध होत्या. त्यांना ” क्रांतीच्या वीरांगना” म्हटले जाई. इंग्रजांविरुद्ध त्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी आंदोलनात सहभाग घेतला. कारण इंग्रज नागा लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची सक्ती करत होते. हे इंग्रज नागा लोकांवर अतोनात अत्याचार करीत होते. त्यासाठी रानी मां गायडिन्ल्यू यांनी त्यांचा चुलत भाऊ हैपॉव जाडूनॉन्ग याने सुरू केलेल्या चळवळीत उडी घेतली. ही चळवळ Heraka Religious Movement म्हणून ओळखली जायची. ही धार्मिक स्वरूप असलेली चळवळ नंतर राजकीय स्वरूपात परिवर्तित झाली. त्यामुळे रानी मां ही प्रथम अध्यात्मिक नेता म्हणून ओळखली जायची ती आता राजकीय नेता बनली.
इंग्रज लोकांनी तिला ” पूर्वोत्तर की आतंकवादी” म्हणून घोषित करून टाकले होते. तिला पकडण्यासाठी इंग्रजांनी प्रथम २०० रू. , नंतर ५०० रू. अशी बक्षिसे जाहीर केली. तरीही ती पकडली गेली नाही. म्हणून इंग्रज सरकार उदार झाले. त्यांनी साऱ्या विभागाचा कर रद्द करण्याची घोषणा केली होती.
वयाच्या सतराव्या वर्षी रानी मां गायडिन्ल्यू यांनी ब्रिटिशांविरुद्ध चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतला. आणि तिने Zeliangrong Three Tribe नावाच्या आर्मीची स्थापना केली. त्याचसाठी तिला. १९३२ साली इंग्रजांनी तुरूंगात डांबले. तिचा भाऊ, चळवळीतील सहकारी, नेता हैपॉव याला इंग्रजांनी १९३९ साली फाशीची शिक्षा दिली.
हरिपूर जेलमधून तिची सुटका व्हावी म्हणून सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली काॅ॑ग्रेसने ठराव संमत केला. तरीही तिची सुटका झाली नाहीच. जेलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू तिला भेटायला गेले होते. त्यांनी ” नागाओंकी रानी” असा तिचा गौरव केला. ते रानीपुढे नतमस्तक झाले. इंग्रजांनी सुनावलेली आजीवन कारावासाची शिक्षा ब्रिटिश देशातून जाईपर्यंत तिने भोगली.
तिचे कार्य झाशीच्या राणी इतकेच महान होते. ब्रिटिशांनी नागा लोकांचे जे हाल केले , त्यांना ख्रिश्चन बनण्यासाठी अत्याचार केले, त्याविरुद्ध ती मणिपूर, नागालँड च्या गावागावात फिरली.निरक्षर, अडाणी नागा आदिवासी हे ब्रिटिश ईसाईंचे लक्ष्य होते. ते वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांना ख्रिश्चन बनवीत. त्याविरोधात रानी मां आदिवासी लोकांमध्ये जागृती करण्याचे काम करू लागली.
त्यासाठी तिने देवपूजा, भजन, कीर्तन ,या हिंदू पूजापाठ पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली. आदिवासी लोकांमध्ये ती हिंदू धर्माविषयी जागृती, प्रेम निर्माण करू लागली. तिने जुनी भजने लोकांमध्ये प्रसारित केली. तसेच नवी नवी भजने लिहायला ,गायला, शिकवायला सुरुवात केली. आणि जनजागृती करून लोकांना धर्मांतर करण्यापासून परावृत्त केले. रानी मां गायडिन्ल्यू फार शिकलेली नव्हती.पण तिच्या कार्याचा धडाका पाहून इंग्रज सरकार आणि ईसाई यांच्या छातीत मात्र धडकी भरत होती.
रानी मां गायडिन्ल्यू या Daughter of the Hills म्हणून नागालँड मणिपूर मध्ये सुप्रसिद्ध होत्या. त्या न घाबरता, न डगमगता नागांच्या हक्काकरिता ब्रिटिश सत्तेविरुद्ध सतत लढे देत राहिल्या. वयाची उमेदीची चौदा पंधरा वर्षे त्यांना तुरूंगवास सोसावा लागला.
क्रमशः…
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈