सौ ज्योती विलास जोशी
विविधा
☆ किल्ल्या… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
एक वेळ आयुष्याची गुरुकिल्ली सापडेल…नव्हे! ती नाही सापडली तरी मिळालेलं आयुष्य सरत राहील पण एखादी महत्वाची किल्ली नाही सापडली तर तेच आयुष्य किल्ली सापडेपर्यंत थांबतं.अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा यक्षप्रश्न कधीतरी आयुष्यात एकदा सर्वांना पडतोच!
एका कुटुंबाचा विचार करता फ्लॅटची किल्ली, स्कूटरची किल्ली,कारची किल्ली, लॉकरची किल्ली, मोलकरणीला द्यायची डुप्लिकेट किल्ली, अशा अनेक किल्ल्या जपून ठेवाव्या लागतात. त्यातली एखादी जरी हरवली तर त्याची संपूर्ण कुटुंबाला झळ लागते. आरोप दोषारोप यानं कुटुंबातलं वातावरण गढूळ होतं. छोटीशीच गोष्ट… परंतु लहान मोठ्याना तांडव करायला लावते. लपाछपीचा खेळ बराच वेळ चालतो आणि…… किल्ली सहजी सापडली तर मात्र ‘हुश्श्य’ असा उसासाचा सगळ्यांच्याच तोंडातून निघतो आणि नाट्याची इतिश्री होते.
समजा किल्ली नाहीच सापडली तर आपल्याकडे डुप्लिकेट किल्ल्या बनवणारी माणसं लगेच हाकेला ओ देतात. त्यांच्या किल्लीनं आपलं कुलूप खळकन उघडतं आणि थांबलेले क्षण लगेच पुढे सरकतात. कुठे हरवली असेल किल्ली? हा विचार करायला एका क्षणाचीही फुरसत आपल्याला नसते. योगायोगानं ती कधी नजरेला पडलीच तर. …. काय उपयोग आता? असं म्हणून लगेचंच तिची किंमत शून्य होते..
क्षणभर मनांत विचार आला ….पूर्वीच्या काळी कधी किल्ल्या हरवत नसतील का? जानव्याला लावलेली, पोटाशी धरलेली, कमरेच्या केळात ठेवलेली, पदराच्या टोकाला बांधलेली, फडताळात बांधून ठेवलेली किल्ली जणू लाॅकर मध्येच असल्यासारखीच! कशी हरवेल बरं? लोकांची वृत्ती बदलली तसा कुलपाचा शोध लागला.जसे ते बेफिकीर झाले तसे किल्ल्या बनवणार्यांचा रोजगार वाढला.
या सर्वावर उपाय म्हणून लोकांनी स्वतःला एक शिस्त लावून घेतली की-होल्डर नावाची एक आकर्षक वस्तू घरात आली आणि सन्मानानं भिंतीवर विराजमान झाली. किल्ली कुटुंबातल्या कोणाचीही असो कितीही महत्त्वाची असो ती तिथेच असायची.क्षणभर ती तिथे दिसली नाही तरी हृदयाचे ठोके वाढायचे. ती किल्ली हरवू नये म्हणून आकर्षक की-चेन मध्ये तिला गुंफुन ठेवण्यात येऊ लागलं….
आताशा जसं जग हायटेक झालंय तशी कुलपाची संकल्पना बदलली. पर्यायानं किल्लीलाही पर्याय आले.चक्र आकडे वापरून तिजोऱ्या बंद होऊ लागल्या. दोन किल्ल्या असलेली कुलपं आली. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजेच विद्युत चुंबकीय किल्ल्या आल्या. पुढे किल्ल्यांच्या जागी बटनं आले. त्याही पुढे जाऊन आता पासवर्ड आला. प्रत्येकानं जपलेला पासवर्ड हाच त्याची किल्ली झाला. आता बाकी हद्द झाली.अंगठा, चेहरा यांच्या साह्यानेही कुलपे उघडू लागली.
अंगठा दाखवणे हा वाक्प्रयोगाचा अर्थच बदलला. नाहीं म्हणावयाचें झाल्यास, मूठ मिटून अंगठा किंवा नकार घंटा दाखवितात.दानाचं उदक देतांना सरळ तळहातावर पुढें बोटांवरून पाणी सोडतात पण पितरांस उदक देतांना वांकडा हात करून अंगठयावरून पाणी सोडतात त्यावरून, नाहीं म्हणणें, नकार देणें असा अर्थ होतो. अंगठा दाखवणे म्हणजे
फसविणें,ठकविणें,प्रथम आशा दाखवून शेवटीं धोका देंणें. पण आता अंगठा दाखवून काम फत्ते होऊ लागलं.’दिल सच्चा और चेहरा झुठा’ असही म्हणायची सोय राहिली नाही.नाही तर कुलूप रुसून बसायचं…….
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈