श्री अरविंद लिमये
विविधा
☆ कालाय तस्मै नमः ☆ श्री अरविंद लिमये ☆
‘मग्न’ हा सकारात्मकतेच्या शिडकाव्यांनी बहरून येणारा अर्थपूर्ण शब्द आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्तिचं होणार नाही ‘ याच्याशी मी अगदी परवा परवापर्यंत तरी नक्कीच पूर्णतः सहमत झालो असतो पण आज नाही. कारण नुकतीच घडलेली एक दुर्घटना या समजाला परस्पर छेद देऊन गेलीय आणि म्हणूनच मग्नतेचं ते अकल्पित विद्रूप मला विचार करायला प्रवृत्त करतेय.
लहान मुलं खेळात रममाण होत असतात, वाचनाची आवड असणारे वाचनात गर्क होतात, एखादा आळशी माणूसमुध्दा त्याच्या आवडीचं काम मात्र नेहमीच तन्मयतेने करीत असतो, काहीतरी निमित्त होतं आणि मनात निर्माण येणाऱ्या उलट सुलट विचारांमुळे आपण विचारमग्न होऊन जातो, नामस्मरण करताना साधक तद्रूप होतं असतो, गायक गाताना तसंच श्रोते त्याचं गाणं ऐकताना अगदी तल्लीन होऊन देहभान विसरुन जातात,कोणतेही काम मनापासून करणारे त्यांच्या कामात क्षणार्धात गढून जातात. या प्रत्येकाच्या बाबतीत त्या त्या वेळी वेळेचे भान नसणे, तहानभूक विसरणे हे ओघाने येतेच. इथे वर उल्लेखलेली रममाण, गर्क, तन्मय, विचारमग्न, तद्रूप तल्लीन, देहभान विसरणे, वेळेचे भान नसणे, तहानभूक विसरणे गढून जाणे ही सगळी शब्दरूपे म्हणजेच मग्न या शब्दाचीच
विविधरंगी अर्थरुपे आहेत ! निमग्न, तदाकार, धुंद, चूर, एकरूप, गढलेला, मश्गूल, व्यग्र,समाधिस्थ, ही सुध्दा मग्नतेची सख्खी भावंडेच!
मग्न या शब्दात अशी विशुद्ध सकारात्मकताच ठासून भरलेली आहे याबाबत एरवी दुमत असायचं काही कारणच नव्हतं. पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेने मग्न या शब्दातली सकारात्मकता कांही अंशी का होईना प्रदूषित केलेली आहे असेच मला वाटू लागलेय.
‘गरज ही शोधाची जननी आहे ‘ असं म्हणतात. विज्ञानाच्या मदतीने लावले गेलेले विविध शोध हे गरजेच्या पूर्ततेसाठीच असले तरी त्यांचा वापर गरजेपुरताच करायची गरज मात्र सर्रास दुर्लक्षिलीच जात असते. नित्योपयोगी उपकरणे असोत वा करमणुकीची साधने कुणीच याला अपवाद नाहीत. तत्पर प्रसारासाठी शोधलं गेलेलं मोबाईलतंत्र हे याचे प्रतिनिधिक उदाहरण!
मोबाईलचा अतिरेकी वापर करताना बहुतांशी सर्वांनाच ताळतंत्र राहिलेलं नाही हेच खरे.विशेषत: कानाला इअरपाॅड लावून मोबाईल ऐकण्यात मग्न होत भरधाव वाहने चालवणारे नकळतपणे जसे स्वतःचा जीव पणाला लावत असतात तसेच इतरांचा जीव जायलाही निमित्त ठरत असतात. पण याची जाणीव नसणे हे ठेच लागल्यानंतरही न येणाऱ्या शहाणपणा सारखेच असते.
अशी एखादी दुर्घटना आपल्या परिचितांपैकी कुणाच्यातरी बाबतीत घडते तेव्हाच आपल्याला त्याची झळ तीव्रतेने जाणवते याला मीही अपवाद नव्हतोच. मिरजेला रहाणारे माझे एक भाचेजावई. निवृत्तीनंतरचं कृतार्थ आयुष्य समाधानाने जगणारे. निवृत्तीनंतरही स्वतःची जमीन आवड म्हणून स्वतः कसणारे.ते एक दिवस नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला म्हणून बाहेर पडले. परतीच्या वाटेवर असताना नुकतेच उजाडलेले.रहदारीही तुरळक.ते रस्त्याच्या कडेने शांतपणे चालत असताना मोबाईलवर बोलण्यात मग्न असणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराने त्यांना मागून धडक देऊन उडवले.अंगाखाली दडपल्या गेलेल्या डाव्या हाताच्या कोपराच्या हाडाचे फ्रॅक्चर आणि जबरदस्त मुका मार यामुळे ते अडीच-तीन महिने जायबंदी होते.त्यांची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांची केविलवाणी अस्वस्था पाहून मी अस्वस्थ झालो.’नशीब डाव्या हाताचे कोपर फ्रॅक्चर झालेय,तो उजवा हात असता तर माझं कांही खरं नव्हतं’ हे स्वतःचं दुःख विसरून हसत बोलणाऱ्या त्यांच्या विचारातली सकारात्मकता कौतुकास्पद वाटली खरी तरीही त्या मोटरसायकलस्वाराच्या मोबाईल मग्नतेचं काय? हा प्रश्न निरुत्तर करणाराच राहिला. यासंबंधी कायदे कितीही कडक असले तरी व्यवहारातली त्याची उपयुक्तता फारशी व्यावहारिक नसतेच. अशा घटना टाळण्यासाठी
‘कालाय तस्मै नमः’ म्हणत जे जे होईल ते ते पहात न रहाता नको त्या गोष्टीतल्या अशा हानिकारक मग्नतेतली नकारात्मकता प्रत्येकानेच वेळीच ओळखायला हवी एवढे खरे.
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈