सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

परिचय 

शिक्षण 

  • पदवी –  मानसशास्त्र आणि पत्रकारिता
  • पदव्युत्तर पदवी – एम. एस. डब्ल्यू.
  • डिप्लोमा  – समुपदेशन
  • व्यवसाय: समुपदेशन तज्ज्ञ, संवाद समुपदेशन केंद्र.सांगली.

विद्यार्थी समुपदेशक — पद्मभुषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजी. इथे महिन्याला ३५ ते ४० विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जातं.

प्रकाशित साहित्य: राज्यातील विविध वृत्तपत्रे, नियतकालिक, मासिक यामध्ये लेख व कवितांना प्रसिध्दी. दै. लोकसत्ता मधून काही लेखाना प्रसिध्दी.

पणती – काव्यसंग्रह प्रकाशित.

वयात येताना – पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर

?  विविधा ?

☆ क – क करियर… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

हजारो पालकांना, मुलांशी संवाद साधत असताना अनेकवेळा असं वाटत राहतं की, भारतात बाळांचा जन्म होतंच नाही.  इथे जन्मतात इंजिनियर्स, डाॅक्टर्स, वकील, मार्केटिंग गुरू, सरकारी नोकर, खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी, एच आर, एम आर म्हणजे पैसे मिळवणारी जिवंत मशिन्स. कारण गर्भात असताना बाळाच्या कानावर आई वडिलांची स्वप्नंच पडतात. आपलं बाळ मोठं झाल्यावर प्रथितयश डाॅक्टर होणार. तो आय टी कंपनीत नोकरी करणार. यु एस मधे शिक्षण घेऊन तिकडेच स्थायिक होणार. बाळाच्या चाहुली बरोबरच त्याच्या करियरसाठीचं नियोजन सुरू होतं. बाळाचे डोळे आकाराला येण्यापूर्वीच त्याला स्वप्नं दाखवली जातात. जेंव्हा मुलगा क – क कमळ हाताने गिरवत असतो. त्याचवेळी पालकांच्या डोक्यात मुलाचं क – क करियर एखाद्या वादळासारखं चकरा मारत असतं. 

भारतात स्वत:चं करियर पणाला लावून मुलांचं करियर घडवू पाहणारे पालक मोठ्या प्रमाणात आहेत. पोटाला चिमटा काढून मुलांचं करियर घडवण्याचा प्रयत्न करणारे, मुलांना शिक्षणात काहीही कमी पडू नये म्हणून मुलांच्या सर्व मागण्या पुरवणारे, मुलांच्या मुलभूत शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी जिद्दीने कष्ट करणारे, वडिलोपार्जित संपत्ती मुलांवर खर्ची घालणारे असे अनेकविध प्रकारातील पालक दररोज भेटतात. आपल्याकडील जवळजवळ सर्वच पालकांना ठराविक क्षेत्रातील उच्च शिक्षण हे पैसे मिळवण्यासाठी, भविष्यात स्थिरस्थावर होण्यासाठी महत्वाचा आणि खात्रीचा मार्ग आहे असंच वाटत असतं. परंतु करियर हे मुलांच्या आवडीच्या क्षेत्रातही होऊ शकतं. त्या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेता येऊ शकतं. अशा क्षेत्रावर आणि आपल्या मुलांवरही पालकांचा विश्वास नसतो. त्यानी सुचवलेल्या क्षेत्रातच मुलानी करियर करावं असा अट्टाहास बर्‍याच पालकांचा असतो.

मुलांना हव्या त्या क्षेत्रात स्थिर होऊ दिलं तर कदाचीत पैसे कमी मिळतील पण आनंद केवढा मिळेल. समाधान किती मिळेल. या सुखाच्या कल्पनांना कोणत्या पॅकेजमधे कसं बसवता येईल. याचा  थोडातरी विचार पालकांनी करायला हवा. तसेच करियरच्या मागे धावणार्‍या तरूणांनी क क करियर व्यवस्थित समजून घ्यायला हवं. तरच तरुणांमधले मानसिक घोटाळे संपुष्टात येण्यासाठी मदत होईल.

काही क्षेत्रात मिळणार्‍या एखाद्या पॅकेजचा तुलनेने गाजावाजा होत नाही म्हणून त्या पर्यायांकडे दुर्लक्ष केलं जातं. भारतात असे कितीतरी चित्रकार आहेत ज्यांचं एक चित्र लाखाची कमाई करून देतं. अॅनिमेशन पदवीधारक असणारे कितीतरी तरुण वीस बावीस लाखाचं पॅकेज घेत आहेत. फोटोग्राफर्सची कमाई सुध्दा काही कमी नसते. वाईल्ड फोटोग्राफर्स तरी एक वेगळाच थरार अनुभवण्यात यश मानतात. चित्रपट सृष्टीमधे तर विविध तर्‍हेचं कौशल्य असणार्‍यांना अनेक संधी आहेत. करियरची संधी अजमावण्यासाठी हजारो क्षेत्र उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थी पालकांची नजर ठराविक क्षेत्रावरुन हलतंच नाही. मुलाना वेगळं काहीतरी करायचं असतं परंतु ते वेगळं काय हे शोधता येत नाही. पालकांचा संकुचित दृष्टिकोन मुलाना त्यांची स्वत:ची पायवाट तयार करु देत नाही. मुलांना करियर निवडीचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. 

एका महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकणार्‍या एका मुलाने माझं भाषण होईपर्यंत माझंच स्केच काढलं. नंतर मला ते गिफ्ट दिलं.तेंव्हा म्हणाला,”स्केच काढणं ही माझी आवड आहे.आतापर्यंत मी १५० पेक्षा जास्त स्केचीस काढल्या आहेत. वडिलांची इच्छा म्हणून मी इकडे आलोय.”

दुसरा एक मुलगा भाषण होईपर्यंत रडत होता. नंतर जवळ बोलावून विचारलं. तेव्हा म्हणाला,” मला बेस्ट कोरिओग्राफर व्हायचंय.इथे माझा जीव गुदमरतोय. अभ्यासात लक्ष लागत नाही. फेल झालो तरी आई बाबा नाराज होणार पण मला हे करायचंच नाही. आई बाबा माझं काहीही ऐकून घेत नाहीत.”

एका मुलीला प्राण्यांचं मानसशास्त्र शिकायचं होतं. तिने पालकाना सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. किती वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण विषय आहे.पण पालकांच्या इच्छेपुढे तिचं काही चाललं नाही.

आज घडीला अशी शेकडो उदाहरणं देता येतील. अशा पालकाना मुलांच्या भविष्याची चिंता असते. परंतु त्यांचा वर्तमान चितेवर ठेवून कसलं भविष्य घडवण्याची भाषा हे पालक करत असतात तेच कळत नाही.  शिक्षण घेतल्यानंतरची आपल्याकडे नोकरीसाठी काय परिस्थिती आहे हे लक्षात यावं याकरता एक उदाहरण पाहूया. तमिळनाडू विधानसभेत १४ सफाई कामगार हवे होते. त्या नोकरीसाठी ४६०० इंजिनियर्स आणि एम बी ए पदवी प्राप्त मुलानी अर्ज केले होते… असं अनेक ठिकाणी घडतंय.

चांगलं शिक्षण घेऊनही जेंव्हा नोकरी मिळत नाही तेंव्हा करियर म्हणायचं तरी कशाला आणि शिक्षण घेऊन करायचं तरी काय असा प्रश्न  सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आणि पालकांना पडणं साहजिकच आहे. खरंतर शिक्षण घेत असतानाच करियरचा विचार व्हायला हवा. मार्कांवरती अवलंबून न राहता आपल्या आवडी निवडी वरही थोडा विश्वास ठेवायला हवा.

यशाची व्याख्येतील विविधता- प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी असते. भरपूर पैसै मिळवण्यात एखाद्याला यश वाटत असेल. तर कुणाला प्रसिध्दीमधे यश वाटत असेल. एखादा रोजची कामं नीट झाली यातच यश समजत असेल. एखाद्याला आज पोटभर खायला मिळालं यातच यश वाटत असेल. आपलं यश आपण कशात मोजतो हे समजणं महत्वाचं आहे. त्यानुसार यशप्राप्तीसाठी नियोजन करणं आवश्यक आहे.

वेगळी वाट शोधलीच पाहिजे – इतरांनी शोधलेल्या मार्गावर जाणे सहज सोपे असले तरी त्याच मार्गावरून हजारो आधीच पोहोचलेले असतात. त्या गर्दीत हरवून जाण्यापेक्षा वेगळी पायवाट निर्माण करणं कधीही खडतरच असतं. परंतु त्या मार्गावरून हजारो आपल्या मागे येतात. आणि काहीच दिवसात या पायवाटेचा महामार्ग होऊ शकतो. हा विश्वास तरुणांमध्ये निर्माण करायला हवा.

अपयशातही साथ देणारेच खरे पालक- शिक्षणानंतरही मुलांना जेव्हा नोकरी मिळत नाही तेव्हा मुलांपेक्षा जास्त पालकच खचून जातात. चिडचिड करतात. मुलांना अपशब्द बोलतात. मुलांच्या भावना समजून घेण्यापेक्षा स्वत:च्या अनियंत्रित भावना मुलांवर लादतात. मुलांना अपयशाचा सामना करायचा असतो. तिथे पालक साथ देत नाहीत. 

‘स्व’ चा शोध घेता आला पाहिजे – स्वत: मधील क्षमता आणि कमतरता माहित असल्या पाहिजेत. कोणतंही व्यावसायिक क्षेत्र निवडताना आपण हे का निवडत आहोत याची स्पष्टता असायला हवी. कोणत्याही कारणास्तव हे क्षेत्र जबरदस्तीने निवडले गेले असेल तर त्यात जाणीवपुर्वक आवड निर्माण करता येऊ शकते.

भविष्याचा वेध- पैसा,नोकरी, छोकरी सगळं हवंय पण त्यापलीकडे जाऊन आपल्याला आपलं काम मनापासून स्विकारता येतंय का याचा वेध घ्यायला हवा. तर भविष्य सुरळीत होतं. 

कौशल्याधिष्ठीत शिक्षण –  नोकरीसाठी शिक्षण, त्यासाठीच अभ्यास ही संकल्पना बदलली पाहिजे. व्यवसाय, छोटा उद्योग करण्यासाठीचं शिक्षण उपलब्ध व्हायला हवं. आयटीआय, नर्सिंग, आॅटोमोबाईल्स सारख्या शिक्षण संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला हव्यात.

अशा संधींचा विचार करायचा झाला तर फॅशन डिझाईनर,चामड्याच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधन, घड्याळं, दागिने, फरफ्युम्स, गाड्या, मयक्रोसाॅफ्ट, गुगल, फेसबुक, वाॅल मार्ट, फार्मास्युटिकल, इव्हेंट मॅनेजमेंट, फाॅरेन्सिक सायन्स, इंटिरियर डिझाईन, फिजिओथेरपी, नर्सिंग, पत्रकारिता, फोटो पत्रकार, अॅनिमेटर, गुन्हेगारी शास्त्र, मानसशास्त्र, लेखक, खेळाडू, शुज डिझाईनर, चित्रपट, नाट्य,नृत्य, संगीत, खेळातील पंच,ओशियनग्राफी, डिजिटल मार्केटर,ग्राफिक डिझाईनर,आय टी आय अशी अनेक क्षेत्रं लाखो रुपयांची कमाई करुन देऊ शकतात. त्यासाठी आपल्या आवडीचं क्षेत्र निवडण्याचं धाडस करायला हवं. नेमकं करियर शोधायला हवं. स्वत:चं निरीक्षण केलं तर निश्चितंच करियर सापडू शकतं.त्याला पालकांची साथ असेल तर मुलांची प्रगती होतंच असते.

क -क करियर म्हणजे फक्त रोजगार मिळवणं नाही तर कोणतंही काम करताना जगण्याचा आनंद घेणं होय. करियर शोधताना योग्य मार्गदर्शन करुन तरुणांची ऊर्जा टिकवून ठेवणं हे आव्हान पालकांनी स्वीकारायला हवं. काॅलेजमधून बाहेर पडल्याबरोबर  सर्वोच्च पद, मान सन्मान लगेचच मिळत नाही हे लक्षात घ्यायला हवं. त्यासाठी कष्ट करणं, नविन गोष्टी शिकून घेणं, संबंधित कामाचं ज्ञान आत्मसात करणं, प्रश्न समजून घेण्याच्या क्षमतेचा विकास करणं अशा गोष्टी जमायला हव्यात. आपले विचार मुक्तपणे आणि ठामपणे मांडता यायला हवेत. भावनांक चांगला असायला हवा. तरुणांचा देश असणार्‍या भारतात तरुणांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी सर्वानी मिळून घ्यायला हवी नाहीतर त्यांच्या हातात व्यसनाधिनतेचे पेले असतील. आणि त्यांचं डोकं मानसिकतेनं खचलेलं, अनेक छिद्र पडलेलं मडकं असेल.

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments