सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ कागदाची पुडी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
आज सकाळी फुले आणायला गेले आणि बघतच राहिले.त्या मावशींनी एक वृत्तपत्राचा कागद घेतला त्यात फुले,तुळस,बेल ठेवले आणि मोठ्या निगुतीने छान पुडी बांधली.आणि त्यावर छान दोरा गुंडाळला.त्यांची एकाग्रता बघून असे वाटले,जणू त्या खूप मौल्यवान वस्तू किंवा औषध त्यात बांधत आहेत.आणि तसे तर ते होते.ज्या फुलांनी देवाची पूजा होणार आहे ती असामान्यच!
त्यांनी तो दोरा गुंडाळत असताना मनाने मला पण गुंडाळले ( फसवले नव्हे ).माझे भरकटत चाललेले मन जागेवर आणले.त्या फुलांच्या पुडीमुळे मी मात्र बालपणात पोहोचले.आणि आठवले कित्येक वर्षात आपण अशी कागदी पुडी पाहिलीच नाही.दुकानात जायचे आणि चकचकित प्लास्टिक मध्ये टाकून वस्तू आणायच्या.त्यातील बऱ्याच वस्तू मशीनमध्येच चकचकित कपडे घालून येतात.मग लक्षात आले,माझ्या लहानपणी सर्वच वस्तू कागदाच्या पुडी मधून यायच्या.ही आजची फूल पुडी बघून मन भूतकाळात शिरले.
मला चांगलेच आठवते प्रत्येक दुकानात वस्तू बांधून देण्याचे कागद वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलेले असायचे.त्या वरून दुकानदाराची पारख करता यायची.काही दुकानदार त्या कागदांची प्रतवारी करून ठेवायचे.म्हणजे प्रत्येक वस्तू साठी व वस्तूच्या वजना प्रमाणे ( वजना प्रमाणे आकारमान पण बदलायचे ) कागदाचे वेगवेगळ्या आकारात तुकडे करुन ठेवलेले असायचे.काही जण ते लहान मोठे तुकडे वेगवेगळ्या कप्प्यात ठेवायचे.अगदी इस्त्री केल्यासारखे!आणि वस्तूचे वजन करून झाल्यावर मोठ्या काळजीने कागद काढून घ्यायचे.व व्यवस्थित घडीवर घडी घालून पदार्थ त्यात ठेवायचे.त्यावेळी असे वाटायचे जणू हे त्या पदार्थला कपडेच घालत आहेत. काही जण दुकानातच वेगवेगळ्या सुतळीत किंवा जाड दोऱ्यात सर्व कागदाच्या तुकड्यांचे कोपरे जुळवून ओवून ठेवायचे.त्यातही लहान मोठे अशी वर्गवारी असायची.आही जण मात्र वृत्तपत्राचे गठ्ठेच एका कोपऱ्यात ठेवायचे.व वस्तू मापून झाली की टरकन कागद फाडून त्यात वस्तू गुंडाळायचे.त्या वस्तू कागदात बांधताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असायच्या.
आतील कागद बाहेरच्या कागदाला आधार देत असायचा.जणू लहानांचे महत्वच सांगत असायचा.त्या नंतर त्यावर दोरा बांधला जायचा.तो दोरा मात्र खूप ठिकाणी एकाच पद्धतीने दिसायचा.बहुतेक तराजूच्या अगदी बाजूला किंवा वरच्या बाजूला मोठे रिळ असायचे.व त्याचे एक टोक खाली लोंबत असायचे.आणि ते टोक ओढले गेल्यावर ते रिळ एकाच लयीत नाचत असायचे!दोरा संपत असेल तरी कोणाच्या तरी उपयोगी पडतो म्हणून त्यालाही आनंद होत असावा.
प्रत्येक दुकानाची पुड्या बांधायची खास शैली असायची.आणि ती बघूनच वस्तू कोणत्या दुकानातून आणली ते समजायचे.हे झाले दुकानदाराचे कौशल्य!
आमचे कौशल्य या पुड्या घरी आल्या नंतरचे!त्या कागदात काय आहे याची इतकी उत्सुकता असायची कारण कागद पारदर्शक नसल्याने आणि त्याला दोऱ्यात गुंडाळल्या मुळे आत काय आहे ते दिसायचेच नाही.ती पुडी दुसऱ्या कोणी आणली असेल तर ही उत्सुकता जरा जास्तच असायची.आणि स्वतः वस्तू आणलेली ( मोठ्यांच्या सांगण्यावरून ) असेल तर पोटात बारीक धडधड व छोटासा गोळा यायचा.कारण आणायला सांगितलेली वस्तू चांगली असेल तर कौतुक व शाबासकी,वस्तू ठीक असेल तर काही नाही पण जर वस्तू नीट नसेल तर जगबुडी झाल्या सारखी बोलणी आणि एक दोन धपाटे ठरलेले असायचे.नीट बघता आले नाही का ते काका कोणती वस्तू देतात? असा आमच्या अकलेचा उद्धार ठरलेला असायचा.आमचे कौशल्य या पुढचे.डब्यात गेलेल्या वस्तूने परिधान करुन आईच्या हाताने सोडलेला कागद घ्यायचा आणि त्यावर हात फिरवून छान सरळ करायचा.तो दोन्ही बाजूंनी वाचायचा.त्या वरची चित्रे बघायची व्यंग चित्रे असतील तर हसून घ्यायचे.सिनेमाच्या जाहिराती असतील तर मोठ्यांच्या चोरुन बघून घ्यायच्या.हो आमच्या लहानपणी तेवढेच करावे लागायचे.त्या नंतर तो कागद पलंगाच्या गादीच्या खाली राहिलेली इस्त्री करायला जायचे.त्यावेळी हे कागद फेकून दिले जात नसत.काही दिवसांनी तो कागद घरातील कोणती जागा मिळवणार आहे ते ठरायचे.म्हणजे काही कागद डब्यांच्या खाली जायचे.काही डब्यांच्या झाकणाच्या आत बसायचे.काहींच्या नशिबात चकलीचे चक्र असायचे तर काहींना तळलेली चकली मिळायची.आणि काही कागद तेलकट डबे,निरांजन पुसणे याच्या कामी यायचे.तिच व्यवस्था पुडी बरोबर आलेल्या दोऱ्याची.तो दोरा सोडल्यावर एखाद्या काडीला किंवा दोरा संपून राहिलेल्या रिकाम्या रिळाला गुंडाळून ठेवला जायचा.आणि योग्य ठिकाणी वापरला जायचा.त्या वेळी भराभर फेकून देणे हा प्रकार नव्हता.आणि हे सगळे करण्यात कोणाला कमीपणा पण वाटत नसे.तेव्हा कोणालाच प्लास्टिक चे वारे लागले नव्हते.आणि हायजीन च्या कल्पना वेगळ्या होत्या.समाजातील गरीब,श्रीमंत सगळेच एकाच दुकानातून व वृत्तपत्राच्याच कागदातून सामान आणायचे.कारण मॉल उदयाला आले नव्हते.विशेष म्हणजे रिड्यूस,रीयूज आणि रिसायकल ही त्रिसूत्री आचरणात आणली जायची.
आयुष्यात किराणामाल या शिवाय अनेक पुड्या यायच्या.कित्येक घरी फूल पुडी यायची ती पानात बांधलेली असायची.भेळेच्या गाडी वरची भेळ पण खायला व बांधून कागदातच मिळायची.आणि भेळ खाण्यासाठी चमचा पण जाड कागदाचाच असायचा.या शिवाय भाजलेले शेंगदाणे,फुटाणे शंकूच्या आकारातील निमूळत्या पुडीत मिळायचे.ती पुडी फारच मोहक दिसायची आणि ती पुडी घरात कोणी आणली की बाळ गोपाळ आनंदून जायचे.देवळातील अंगाऱ्याची चपटी पुडी परीक्षेला जाताना खूप आधार देऊन जायची.त्या वेळी केळी सुद्धा कागदात बांधून यायची.यात अजून विशेष पुडे आहेतच.बघायला आलेल्या मुलीला पेढ्यांचा मोठा पुडा मिळायचा.शिवाय साखर पुड्यात पण त्या ताटांमध्ये साखरेचे पुडे इतर साध्या पुड्यांमध्ये रंगीत कागदात ऐटीत बसायचे.
आता हे वाचून जर कोणाला असे वाटले की मी पुड्या सोडत आहे.तर त्याला माझा इलाज नाही.ज्यांनी तो काळ अनुभवला आहे त्यांना यातील सत्यता नक्कीच पटेल.आणि लहानपणात तेही थोडा फेरफटका मारुन येतील.
तर माझं हे असं होतं.अशी कोणतीही वस्तू मला आठवणीत घेऊन जाते.आणि मी असे काही लिहिते.असो!तुम्ही वाचता म्हणून किती लिहायचे ना?
या पुडीच्या निमित्ताने सगळ्या पुड्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.आणि ही आठवणींची एक पुडी मी सोडून दिली आहे. आता ही पुडी तुम्हाला कोणकोणत्या पुड्यांची आठवण देते ते आठवा बरं!
© सुश्री विभावरी कुलकर्णी
२९/९/२०२३
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈